Stock Market Roundup : भांडवली बाजारात सोमवारी झालेल्या मोठ्या समभाग विक्रीचा माहिती-तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सलग पाचव्या घसरणीने, ८५७ अंशांच्या नुकसानीसह, ७४,५०० खाली बंद झाला. उल्लेखनीय म्हणजे ‘सेन्सेक्स’च्या ३० समभागांमध्ये, सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या पाचपैकी चार समभाग हे आयटी क्षेत्रातील होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेअर बाजारात एचसीएल टेक ३.३६ टक्क्यांनी, त्यानंतर टीसीएस (३.०३ टक्के), इन्फोसिस (२.८३ टक्के) आणि टेक महिंद्र (२.४२ टक्के घसरले) असा आयटी क्षेत्रात घसरणीचा क्रम राहिला. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेची मंदावलेली वाढ आणि तेथील चलनवाढीच्या चिंताजनक ताजी आकडेवारी ही तेथील भांडवली बाजाराप्रमाणेच भारताच्या निर्यातप्रवण सॉफ्टवेअर सेवा क्षेत्राची देखील काळजी वाढविणारी ठरली. भारताच्या या २८२ अब्ज अमेरिकी डॉलरच्या निर्यातप्रवण क्षेत्रासाठी अमेरिका ही सर्वात मोठी बाजारपेठ असून, ती संकोचलेली असणे हे या क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यावसायिक कामगिरीसाठी आव्हानात्मक ठरेल. याच काळजीची प्रतिबिंब सोमवारच्या या समभागांच्या घसरणीत उमटले. शुक्रवारच्या सत्रात याच चिंतेपायी वॉलस्ट्रीटवर डाऊ जोन्स, एस अँड पी ५०० हे प्रमुख निर्देशांक पावणेदोन टक्क्यांनी, तर नॅसडॅक तब्बल २.२० टक्क्यांनी आपटला आहे.

‘निफ्टी’साठी २८ वर्षांतील सर्वात वाईट महिना!

देशांतर्गत बाजारात सोमवारी दिवसअखेर सेन्सेक्स ८५६.६५ अंश (१.१४ टक्के) घसरणीसह ७४,४५४.४१ पातळीवर स्थिरावला. दुसरीकडे निफ्टी निर्देशांक २४२.५५ अंश (१.०६ टक्के) तुटीसह २२,५५३.३५ वर बंद झाला. सलग पाचव्या घसरणीतून सेन्सेक्सने १,५४२.४५ अंश (२ टक्के) आणि निफ्टी निर्देशांक ४०६.१५ अंश अर्थात १.७६ टक्के गडगडला आहे. गंभीर बाब म्हणजे फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून १४ कामकाज सत्रात निर्देशांकांसाठी केवळ दोन वाढीची राहिली असून, घसरणीची मालिका अशीच सुरू राहिली तर निफ्टीसाठी फेब्रुवारी महिना हा गत २८ वर्षांतील सर्वात वाईट महिना ठरेल, अशी शक्यता आहे. चालू महिन्यांत परकीय गुंतवणूकदार संस्थांनी २३,७१० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची बाजारात विक्री केली असून, २०२५ मधील त्यांची एकूण विक्री १ लाख कोटी रुपयांच्या घरात जाणारी आहे.

सेन्सेक्समधील महिंद्र अँड महिंद्र, कोटक महिंद्र बँक, नेस्ले आणि आयटीसी हे मोजके समभाग काहीशी वाढ साधताना दिसले. व्यापक बाजारात विक्रीचा जोर अधिक होता. परिणामी बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक १.३१ टक्के आणि मिडकॅप निर्देशांक ०.७८ टक्क्यांनी गडगडला.