Share Market Roundup: रशिया-युक्रेन युद्धविरामाच्या शक्येतेने गुरुवारी जगभरातील बहुतांश शेअर बाजारात दमदार वाढ झाली. फ्रान्स, जर्मनीचे निर्देशांक एका टक्क्यांहून अधिक उसळले. जपानचा निक्केई आणि कोरियाचा कोस्पी निर्देशांक जवळपास दीड टक्क्यांची वाढीसह बंद झाले. मात्र भारतीय शेअर बाजारात ‘सेन्सेक्स-निफ्टी’ने गुरुवारी घसरणीचे सप्तक पूर्ण केले. उल्लेखनीय सलग दुसऱ्या सत्रात निर्देशांकांनी सत्रांतर्गत व्यवहारात केलेली चांगली कमाई दिवस संपत असताना नफावसुलीने पूर्णपणे गमावल्याचे आढळून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन नेते व्लादिमीर पुतिन यांच्याशी युक्रेनमधील युद्ध संपवण्याबाबत चर्चा सुरू करण्यास सहमती दर्शविल्याचे वृत्त गुरुवारी जागतिक गुंतवणूकदारांसाठी सुखद दिलासा ठरले. त्याचवेळी ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या काही व्यापार शुल्क वाढ त्यांच्याकडून थांबविली जाण्याच्या शक्यता आशियाई बाजारांमध्ये आशावाद निर्माण करणारी ठरली.

भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यान्हाला खुला झालेला फ्रान्सचा निर्देशांक CAC 40 ने एक टक्क्यांच्या तेजीने सुरुवात केली, तर जर्मनीचा DAX निर्देशांक १.२% वाढून २२,४१८.१६ वर पोहोचला. ब्रिटनचा FTSE 100 निर्देशांकांत मात्र  0.8% घसरण दिसून आली. अमेरिकेत चलनवाढीचा दर वाढत असल्याच्या बुधवारी आलेल्या आकडेवारीनंतर अमेरिकेत वॉल स्ट्रीटवर घसरण झाली असूनही युरोपीय बाजारात ही वाढ झाली.

युरोपीय बाजारांची तेजीमय सुरुवात पाहून, दुपारच्या सत्रात सेन्सेक्सनेही ७६,७६४.५३ अंश असा जवळपास ५९३ अंशांनी उसळला होता. किरकोळ महागाई दर तीन महिन्यांच्या नीचांकी म्हणजे ४.३१ टक्क्यांनी घसरल्याचा दिलासादायी घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सकाळी सत्रारंभच त्याने चांगल्या वाढीसह सकारात्मक केला होता. युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी रशियाच्या अध्यक्षांशी ‘वाटाघाटी’ सुरू करण्यास ट्रम्प यांनी सहमती दर्शविल्यानंतर तेलाच्या किमतींमध्येही झालेली घसरण स्थानिक बाजारात गुंतवणूकदारांना सुखावणारी होती.

मात्र बुधवारप्रमाणेच हा तेजीचा फेरा बाजारात फार काळ टिकून राहू शकला नाही. शेअर्सचे भाव वरच्या स्तरावर असताना सुरू झालेल्या नफावसुलीने सेन्सेक्स-निफ्टीने कमावलेले सारे काही फस्त केले. दिवसअखेरीस सेन्सेक्स ३२.११ अंशांच्या घसरणीसह, ७६,१३८.९७ वर बंद झाला. तर निफ्टी निर्देशांक १३.८५ अंशांच्या घसरणीसह, २३,०३१.४० वर दिवसअखेर स्थिरावला. दोन्ही निर्देशांकांत अनुक्रमे ०.४ टक्के आणि ०.६ टक्के अशी नाममात्र झालेल्या नुकसानीतून त्यांनी सलग सातवे घसरणीचे सत्र नोंदविले. उल्लेखनीय बाब इतकीच सेन्सेक्सला ७६ हजारांची, तर निफ्टीला अति महत्त्वपूर्ण २३,००० ही पातळी कायम राखता आली. 

रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांतून नऊ महिन्यांनंतर मुक्त झालेली कोटक महिंद्र बँक आणि गेले काही सतत आपटी खात असलेला झोमॅटोचा शेअरने गुरुवारच्या सत्रात सर्वाधिक कमाई केली.