मुंबईः ग्राहकोपयोगी उत्पादनांतील अग्रणी आयटीसी लिमिटेडमधून हॉटेल व्यवसायाचे विलगीकरण हे भागधारकांसाठी सोमवारपासून अंमलात आले. शेअर बाजारातील विशेष सत्रात हॉटेल व्यवसायाच्या समभागांसाठी किंमत निर्धारणानंतर, पालक कंपनीचा समभाग २.७५ टक्क्यांनी मूल्य सौम्य होऊन ४५५.६० रुपयांपर्यंत खाली आला.
भांडवली बाजारातील सकाळी ठरावीक कालावधीसाठी आयटीसी हॉटेल्सच्या समभागासाठी किंमत निर्धारणासाठी विशेष सत्र सोमवारी योजण्यात आले. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात अनुक्रमे २६ रुपये आणि २७ रुपये अशी प्रारंभिक मूल्य निर्धारीत केले गेले. ते वजा जाता मूळ पालक कंपनी आयटीसीच्या समभागाचे व्यवहार हे राष्ट्रीय शेअर बाजारात शुक्रवारच्या तुलनेत ५.५ टक्के नुकसानीसह ४५५.६० रुपये किंमतीवर सुरू झाले.
आयटीसी हॉटेलच्या समभागाचे मूल्यांकन हे प्रत्येकी १५ ते २० रुपयांच्या घरात राहील, अशी गुंतवणूकदारवर्गाची अपेक्षा होती. प्रत्यक्षात त्यापेक्षा किती तरी सरस २६ ते २७ रुपयांच्या पातळीवर संशोधित किंमत आली. हे विलगीकरण अंमलात आले त्या १ जानेवारी २०२५ या खातेनोंद (रेकॉर्ड) तारखेच्या आधीपासून आयटीसी लिमिटेडचे विद्यमान भागधारक हे त्यांच्याकडील प्रत्येक १० समभागांमागे आयटीसी हॉटेल्सचा एक समभाग मिळवू शकणार आहेत. लवकरच या नवीन कंपनीचे समभाग हे भांडवली बाजारात सूचिबद्ध होऊन, त्यात नित्य व्यवहार सुरू होतील. एकंदर बाजारात पडझड सुरू असल्याने आयटीसीचा समभाग दिवसअखेर शुक्रवारच्या तुलनेत राष्ट्रीय शेअर बाजारात ८.०९ टक्के घसरणीसह, ४४२.६५ वर स्थिरावला.