दीर्घकालीन संपत्ती निर्माणासाठी म्युच्युअल फंडातील शिस्तबद्ध गुंतवणुकीचे वळण अर्थात ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी)’ने लोकप्रियता मिळविली आहे. हे या माध्यमातून विक्रमी मासिक १३,००० कोटींवर पोहोचलेला गुंतवणूक ओघ स्पष्ट करतो. तथापि, निर्देशांक विक्रमी उच्चांकावर असताना निर्धोकपणे ‘एसआयपी’ सुरू ठेवण्याबाबत साशंक असणाऱ्या गुंतवणूकदारांच्या चिंतेवर ‘फ्रीडम एसआयपी’ हा सर्वोत्तम पर्याय ठरतो.
बाजारात गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती हे ठरविता येणे कठीण आहे आणि तसा प्रयत्नही विफल आहे. जर गुंतवणुकीमागे ध्येय ठरलेले असेल तर शिस्त, चिकाटी आणि संयमाने दीर्घावधीत गुंतवणूक करीत राहण्याचे योग्य ते फळ मिळतेच, असे दिसले आहे. म्हणूनच निर्देशांकाची पातळी काहीही असो, ध्येय-केंद्रित गुंतवणुकीच्या दिशेने, छोट्या स्वरूपात परंतु सातत्यपूर्ण योगदान सुरू ठेऊन, आर्थिक स्वातंत्र्याचे दरवाजे उघडण्यास ‘एसआयपी’ मदत करते. फीनिक्स फिनसर्व्हचे संस्थापक सचिन हटकर यांच्या मते, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फ्रीडम एसआयपी ही अशी सुविधा आहे जी गुंतवणूकदाराचा संपत्ती निर्मितीचा प्रवास एकाग्रपणे सुयोग्य मार्गावर ठेवण्यास मदत करते.
हटकर यांनी सांगितल्याप्रमाणे, फ्रीडम एसआयपीचे एक नावीन्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे ही ‘एसआयपी’ आणि ‘एसडब्ल्यूपी’चे मिश्रण आहे जे लक्ष्य-आधारित नियोजनाचा उपाय प्रदान करून गुंतवणूकदारांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत करते. ही अत्यंत सुलभ प्रक्रिया तीन भागांमध्ये कार्य करते. निवडलेल्या कालावधीसाठी नियत ‘एसआयपी’द्वारे संपत्तीत वाढ सुरू राहते, ठरावीक मुदतीनंतर लक्ष्य केलेल्या योजनेत पैसा हस्तांतरित करून गुंतवणूकदारांना ‘एसडब्ल्यूपी’द्वारे मासिक उत्पन्नाच्या स्वरूपात लाभ मिळविता येतो.
निश्चित केलेले आर्थिक उद्दिष्ट किती वर्षात साध्य करावयाचे आहे, त्यानुसार फ्रीडम एसआयपी ही ८, १०, १२, १५, २०, २५ आणि ३० वर्षांचा कार्यकाळ प्रदान करते. जर तुमची एसआयपी ८ वर्षांच्या कालावधीसाठी दरमहा १०,००० रुपये असल्यास, फ्रीडम एसआयपी तुम्हाला आठ वर्षांनंतर १०,००० रुपये मासिक पद्धतशीरपणे काढण्याची परवानगी देईल. जर कार्यकाळ १० वर्षांचा असेल तर काढता येणारी रक्कम १५,००० रुपये म्हणजेच एसआयपी हप्त्याच्या दीड पट असेल. हटकर यांच्या मते, १२ वर्षांसाठी केल्या जाणाऱ्या २०,००० रुपयांच्या एसआयपीमधून, पुढे १२ पट किंवा १.२ लाख रुपये मासिक उत्पन्न मिळविता येईल.