‘माझा पोर्टफोलियो’ या साप्ताहिक सदरातून गुंतवणुकीसाठी शेअर्स सुचविले जातात. हे सुचविलेले शेअर्स म्हणजे खरेदीची ‘टिप’ नसून एक अभ्यासपूर्ण विवेचन असते. तुमचा पोर्टफोलियो तयार करताना सदरात सुचवलेल्या शेअरचादेखील विचार करावा, परंतु तो स्वतः अभ्यासून. या सदराचे उद्दिष्ट केवळ सुचवलेले शेअर्स खरेदी करणे हे नसून वाचक गुंतवणूकदारांनी दिलेल्या गुणोत्तराखेरीज आपलेही इतर निकष लावून मगच गुंतणूक करावी हा आहे. अनेक वाचकांनी पोर्टफोलियो म्हणजे काय? तो कसा करावा, शेअर्स कसे निवडावेत किंवा शेअर्स निवडताना इतर कुठले निकष लावावेत असे प्रश्न विचारले होते. दर महिन्यातील दुसऱ्या सोमवारी आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे उमजून घेणार आहोत.
निवडीचे निकषपोर्टफोलियो सहसा मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असल्याने पोर्टफोलियोसाठी शेअर्स निवडताना कंपन्यांचे ‘फंडामेंटल ॲनालिसिस’ करून मगच निर्णय घ्यावा लागतो. तांत्रिक विश्लेषण हे मुख्यत्वे अल्प मुदतीच्या गुंतवणुकीसाठी उपयोगी पडते. कंपन्यांचे फंडामेंटल अनॅलिसिस करताना अनेक सूत्रे तसेच गुणोत्तरांचा आधार घ्यावा लागतो. यामध्ये कंपनीच्या आतापर्यंतच्या कामगिरी खेरीज बदलत्या परिस्थितीनुसार पुढील कामगिरी कशी असेल याचाही अंदाज घ्यावा लागतो. मागच्या आठवड्यात आपण प्राइस अर्निंग गुणोत्तर, प्राइस अर्निंग ग्रोथ आणि डेट इक्विटी गुणोत्तर ही गुणोत्तरे अभ्यासली होती. आता पुढील काही महत्त्वाची गुणोत्तरे अभ्यासू.
इंटरेस्ट कव्हरेज रेशो :
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तरातील ‘कव्हरेज’ म्हणजे कंपनी किती कालावधीपर्यंत – तिमाहींची संख्या किंवा आर्थिक वर्षांची संख्या – ज्यासाठी कंपनीच्या वर्तमान उपलब्ध कमाईसह व्याज देय दिले जाऊ शकते. सोप्या भाषेत, कंपनी तिच्या कमाईचा वापर करून किती वेळा त्याचे दायित्व अदा करू शकते हे दर्शवते. इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर हे कर्ज आणि नफा गुणोत्तर आहे जे कंपनी तिच्या थकीत कर्जावर किती सहजपणे व्याज देऊ शकते हे निर्धारित करण्यासाठी वापरले जाते. इंटरेस्ट कव्हरेज रेशोची गणना कंपनीच्या कमाईला व्याज आणि करांपूर्वी उत्पन्नाला (इबिटा) दिलेल्या कालावधीतील व्याज खर्चाद्वारे विभाजित करून केली जाते.
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर सूत्र : कर आणि व्याजपूर्व उत्पन्न / एकूण कर्जावरील वार्षिक देय व्याज हे प्रमाण जितके कमी असेल तितके कंपनीवर कर्ज खर्चाचा भार जास्त असतो आणि कमी भांडवल इतर मार्गांनी वापरावे लागते. जेव्हा एखाद्या कंपनीचे इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर केवळ १.५ किंवा त्याहून कमी असते, तेव्हा व्याज फेडीचा खर्च भागवण्याची तिची क्षमता संशयास्पद असू शकते.
डेट सर्व्हिस कव्हरेज गुणोत्तर : डेट सर्व्हिस कव्हरेज गुणोत्तर हे वर्तमान कर्ज दायित्वे भरण्यासाठी कंपनीच्या उपलब्ध रोख प्रवाहाचे (कॅश फ्लो) मोजमाप आहे. या गुणोत्तरामुळे कंपनीकडे कर्ज फेडण्यासाठी पुरेसे उत्पन्न आहे का याचा अंदाज येऊ शकतो. डेट-सर्व्हिस कव्हरेज रेशो हे कंपनीच्या आर्थिक आरोग्याचे निदर्शक आणि ते मापण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे सूत्र आहे. विशेषत: ज्या कंपन्यांवर खूप जास्त कर्ज आहे, त्यांच्या बाबतीत या सूत्राचा वापर अत्यावश्यक ठरतो. हे गुणोत्तर कंपनीच्या एकूण कर्ज दायित्वांची (मुद्दल परतफेड आणि काही भांडवली भाडेकरारांसह) त्याच्या ऑपरेटिंग उत्पन्नाशी तुलना करते.
डेट सर्व्हिस कव्हरेज सूत्र : नेट ऑपरेटिंग इन्कम (कर आणि व्याजपूर्व) / एकूण कर्ज
कंपनीस कुठलेही कर्ज नसेल तर उत्तम. परंतु व्यवसाय विस्तार आणि गुंतवणुकीवर परतावा (आरओई) चांगला होण्यासाठी अनेक कंपन्या कर्ज काढून त्याचा योग्य विनियोग करताना दिसतात. डेट सर्व्हिस कव्हरेज गुणोत्तर जितके जास्त तितके चांगले. हे गुणोत्तर किमान ३ किंवा त्याहून अधिक असावे.
रिटर्न ऑन इक्विटी (आरओई) : रिटर्न ऑन इक्विटी (आरओई) हे कंपनीच्या निव्वळ उत्पन्नाला भागधारकांकडे असलेल्या इक्विटी अर्थात भागभांडवलाने भागून मिळविले जाणारे मोजमाप आहे. हे कंपनीच्या नफ्याचे आणि ते नफा किती कार्यक्षमतेने उत्पन्न करते याचे मापक आहे. आरओई जितके जास्त असेल तितकी कंपनी तिच्या इक्विटी फायनान्सिंगला नफ्यात रुपांतरित करते. कंपनी ज्या उद्योगात किंवा क्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्यानुसार आरओई बदलू शकतात. आरओई १५ टक्के किंवा जास्त असल्यास उत्तम.
आरओई सूत्र : इक्विटी – भाग भांडवल / निव्वळ उत्पन्नआरओई अभ्यासताना, ते समान व्यवसायात/ उद्योग क्षेत्रात असलेल्या कंपन्यांच्या सरासरीच्या बरोबरीचे किंवा त्यापेक्षा जास्त आहे हे तपासून घ्यावे. उदाहरणार्थ, एखाद्या इंजिनिअरिंग कंपनीने गेल्या काही वर्षांमध्ये त्या क्षेत्रातील कंपन्यांच्या सरासरीच्या (१५%) तुलनेत १७ टक्के आरओई राखला आहे. याचा अर्थ निवडलेल्या इंजिनिअरिंग कंपनीचे व्यवस्थापन नफा मिळविण्यासाठी कंपनीच्या मालमत्तेचा वापर योग्य पद्धतीने करत आहे.
हेही वाचा – बाजारातील माणसं : चार्ल्स हेन्री डाऊ : निर्देशांकाचा जन्मदाता
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड (आरओसीई) : रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड किंवा आरओसीई हे एक नफा गुणोत्तर असून, कंपनी वापरलेल्या भांडवलामधून किती कार्यक्षमतेने नफा कमावते हे ते दर्शविते. तथापि आरओसीईमध्ये इक्विटी आणि डेट कॅपिटल समाविष्ट आहे, परंतु अल्प-मुदतीच्या कर्जाचे मूल्यांकन यातून केले जात नाही.
आरओसीई सूत्र : कर आणि व्याजपूर्व उत्पन्न / कॅपिटल एम्प्लॉइड ( भरणा झालेले भागभांडवल एकूण कर्ज)
कॅपिटल एम्प्लॉइडची व्याख्या कंपनीची एकूण मालमत्ता वजा चालू दायित्वे किंवा स्थिर मालमत्ता आणि खेळते भांडवल यांची बेरीज म्हणून केली जाते. हे कंपनीमध्ये गुंतवलेल्या इक्विटीची निव्वळ रक्कम दर्शविते. नियोजित भांडवलाची कंपनीची एकूण इक्विटी आणि एकूण कर्ज म्हणूनदेखील व्याख्या केली जाते. एकीकडे आरओई हे भागधारकांच्या इक्विटीवर व्युत्पन्न केलेल्या नफ्याचा विचार करते, तर अतिरिक्त नफा मिळविण्यासाठी कंपनी उपलब्ध भांडवलाचा किती कार्यक्षमतेने वापर करते हे आरओसीई दर्शवते. युटिलिटिज आणि टेलिकॉमसारख्या भांडवल-केंद्रित क्षेत्रातील कंपन्यांच्या कामगिरीची तुलना करताना आरओसीई विशेषतः अधिक उपयुक्त ठरते. कारण इतर मूलभूत गोष्टींप्रमाणेच, या सूत्रात कर्ज आणि इतर दायित्वांचादेखील समावेश होतो. हे लक्षणीय कर्ज असलेल्या कंपन्यांसाठी आर्थिक कामगिरीचे चांगले संकेत देते.
– अजय वाळिंबे
(Stocksandwealth@gmail.com)