Black Monday Was Predictes By Jim Cramer: अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर अतिरिक्त व्यापारकर लादल्यानंतर शेअर बाजारावर त्यांच्या या निर्णयाचा परिणाम झाला आहे. यामुळे आज (सोमवारी) जगभरातील सर्वच शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान शेअर बाजार तज्ज्ञ आणि सीएनबीसीचे होस्ट जिम क्रॅमर काहीदिवसांपूर्वीच सोमवार (७ एप्रिल) शेअर बाजारासाठी ‘ब्लॅक मंडे’ ठरेल असे भाकीत केले होते. त्यांनी म्हटले होते की, बाजारात आज १९८७ च्या “ब्लॅक मंडे” नंतरची एका दिवसातील सर्वोत मोठी घसरण होईल. १९८७ मध्ये, अमेरिकेचा डाऊ जोन्स इंडस्ट्रियल निर्देशांक एका दिवसात सरासरी २२.६ टक्क्यांनी घसरला होता.

सीएनबीसीवरील त्यांच्या मॅड मनी शोमध्ये बोलताना, क्रॅमर यांनी असेही म्हटले होते की, जर डोनाल्ड ट्रम्प ज्या देशांनी अमेरिकेवर आतापर्यंत प्रत्युत्तरात्मक व्यापारकर लागू केला नाही त्या देशांशी संपर्क साधला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.

कोण आहेत जिम क्रॅमर?

जिम क्रॅमर हे सीएनबीसीवरील ‘मॅड मनी’ शोचे सूत्रसंचालन करतात. आपल्या बेडक बोलण्याच्या शैली आणि स्पष्टवक्तेपणासाठी ते ओळखले जातात. क्रॅमर, ‘स्क्वॉक ऑन द स्ट्रीट’ शोचे सह-सूत्रसंचालक देखील आहेत. सीएनबीसीवरील त्याच्या प्रोफाइलनुसार, क्रॅमर सीएनबीसी इन्व्हेस्टिंग क्लब देखील चालवतात, ज्याद्वारे गुंतवणूकदारांना शेअर बाजारात दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यास मार्गदर्शन केले जाते. ते द स्ट्रीटचे संस्थापक देखील आहेत. द स्ट्रीट ही एक आर्थिक संकेतस्थळ आहे. ज्यावर क्रॅमर शेअर बाजारावर भाष्य करतात.

शैक्षणिक पार्श्वभूमी

जिम क्रॅमर यांनी हार्वर्ड महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. हार्वर्ड महाविद्यालयात क्रॅमर प्रतिष्ठित दैनिक, द हार्वर्ड क्रिमसनचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक होते. पदवीधर झाल्यानंतर, ते टालाहासी डेमोक्रॅटचे वार्ताहर बनले आणि नंतर लॉस एंजेलिस हेराल्ड एक्झामिनरमध्ये नोकरीला लागले. इथे त्यांनी खूनांपासून ते क्रीडा स्पर्धांपर्यंतच्या बातम्या कव्हर केल्या.

प्रसिद्ध लेखक

याशिवाय, जिम क्रॅमर यांनी अनेक बेस्ट सेलिंग पुस्तके देखील लिहिली आहेत. यामध्ये, जिम क्रॅमर्स गेट रिच केअरली, जिम क्रॅमर्स गेटिंग बॅक टू इव्हन, स्टे मॅड फॉर लाइफ: गेट रिच आणि कन्फेशन्स ऑफ अ स्ट्रीट अॅडिक्ट या पुस्तकांचा समावेश आहे.

भारतीय शेअर बाजारात कोसळला

दरम्यान ट्रम्प यांच्या व्यापारकराचा भारतीय शेअर बाजारावरही नकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळी ११ पर्यंत सेन्सेक्स २,८२४.८२ अंकांनी किंवा ३.७५ टक्क्यांनी घसरून ७२,५३९.८७ वर आणि निफ्टी ९१६.४० अंकांनी किंवा ४.०० टक्क्यांनी घसरून २१,९८८.०५ वर व्यवहार करत होते. या दरम्यान सुमारे २५६ शेअर्स वधारले असून ३१८३ शेअर्स घसरले आहेत. तर, ९४ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.