भारतातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा मिळवून देणारे एक क्षेत्र म्हणजे माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी सेक्टर आहे. उदारीकरणनंतरच्या काळात या एका क्षेत्रात उदयाला आलेल्या आणि बाजारात सूचिबद्ध (लिस्टेड) झालेल्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना कायमच मालामाल केले आहे. मोठ्या आकाराच्या, मध्यम आकाराच्या आणि लहान आकाराच्या सर्वच माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे शेअर घेऊन गुंतवणूकदारांना वेळोवेळी फायदा झाला आहे. तसे आयटी क्षेत्रातील टाटा उद्योग समुहाचे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) हे बाळ बरीच वर्षे कार्यरत होते, पण त्याला भांडवली बाजारात येण्यासाठी २१ वे शतक उजाडावे लागले. त्याआधीच इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्र म्हणजेच पूर्वाश्रमीची सत्यम कॉम्प्युटर्स या कंपन्यांनी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला होता.
२००० सालचा डॉट कॉमचा बुडबुडा फुटून नुकसान झाले असले तरीही त्यातून हे क्षेत्र लगेचच सावरले. आऊटसोर्सिंगमध्ये अमेरिका आणि त्यानंतरच्या काळात युरोपमध्ये भारतीय कंपन्यांचा कायमच बोलबाला राहिलेला आहे आणि याचे लाभार्थी ठरले आयटी कंपन्यांचे शेअर. फक्त शेअरच्या किमती वाढून नव्हे, त्यातून मिळणारा लाभांश, बक्षीस समभाग (बोनस शेअर) या माध्यमातून गुंतवणूकदारांसाठी हमखास परतावा देणारे शेअर अशी ओळख या क्षेत्राची झाली.
हेही वाचा – ITC देशातील ७ वी सर्वात मोठी कंपनी म्हणून आली समोर, ‘या’ दिग्गज कंपनीला सोडले मागे
टीसीएस या कंपनीचे बाजारमूल्य सुमारे ११.५६ लाख कोटींवर पोहोचले आहे आणि जगातील आकाराने मोठ्या अशा शंभर कंपन्यांमध्ये तिचा समावेश होतो. याचबरोबर निफ्टी आयटी इंडेक्समधील माइंडट्री, पर्सिस्टंट, एचसीएल टेक या कंपन्यांनीसुद्धा बाजाराला आणि गुंतवणूकदारांना निराश केले नाही. मात्र गेल्या तीन वर्षांपासून या क्षेत्राचे एका अर्थी रडगाणे सुरू झाले आहे. करोना महासाथीचा प्रादुर्भाव झाल्यावर तीन वर्षांपूर्वी टाळेबंदीची परिस्थिती उद्भवली त्या वेळी या क्षेत्राला सर्वाधिक नुकसानीचा सामना करावा लागेल अशी भाकिते नोंदवली गेली होती. आयटी कंपन्यांचा व्यवसाय दुसऱ्या कंपन्यांच्या व्यवसायातील खर्चावर अवलंबून असतो. म्हणजेच आयटी कंपनीला कोणी तरी काम देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे असले पाहिजेत. आयटी कंपन्या फक्त आऊटसोर्सिंगचे काम करतात हा समज चुकीचा आहे. माहिती तंत्रज्ञान सेवा पुरवणे, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, हार्डवेअर या क्षेत्रांत आयटी कंपन्या कार्यरत आहेत. रसायन, बँकिंग, विमा, डिजिटल व्यवसाय, धातू, पुरवठा साखळी, ई-कॉमर्स, संरक्षण, अवजड उद्योग, पायाभूत प्रकल्प अशा सर्वच क्षेत्रांत आयटी कंपनीचा कुठे तरी मोलाचा सहभाग असतोच. मग असे असले तरीही आयटी कंपन्यांना घसरणीचा सामना का करावा लागतोय? याची कारणे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
भारतातील आयटी कंपन्यांचा बहुतांश व्यवसाय सुरुवातीच्या काळात अमेरिकी कंपन्यांमार्फत येत असे. २००८ सालच्या जागतिक मंदीच्या काळात याचा प्रत्यय आला होता. अमेरिकेची अर्थव्यवस्था घसरणीला लागली की, आपोआपच भारतीय आयटी कंपन्यांचा तिकडून येणारा व्यवसाय कमी होणार म्हणून त्या कंपन्यांच्या शेअरवर परिणाम होत असे. आता तशी परिस्थिती उरलेली नाही, एकगठ्ठा भारतीय आयटी कंपन्या अमेरिकी बाजारपेठेवर अवलंबून नाहीत. अमेरिका, युरोप यासह आशियाई देशातील बाजारपेठही आयटी कंपन्यांना खुणावत आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीची आकडेवारी लक्षात घेतल्यास त्यांचे मनुष्यबळ भारतासहित उत्तर अमेरिका खंड, इंग्लंड, युरोपातील देश, ब्राझील, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका, आग्नेय आशियाई देशांत पसरले आहे. भारतातील सरकार आणि निमसरकारी क्षेत्रातून आयटी उद्योगाला भविष्यात बरीच कामे मिळणार आहेत. यामुळे आयटी कंपन्यांचे व्यवसायाचे स्वरूप थोडेफार बदलू शकेल.
भारतातील कंपन्यांचे माहिती तंत्रज्ञानावरील खर्च वाढतेच राहणार आहेत. हा खर्च पुढील वर्षी १०० अब्ज डॉलर्सच्या पलीकडे जाणार आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांना देशांतर्गत बाजारपेठेतूनही व्यवसाय मिळणार आहेच. आपल्यासाठी ही सगळी माहिती का उपयोगाची आहे? याचे सोपे उत्तर म्हणजे आपला दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी राखीव असलेला पोर्टफोलिओ बळकट करण्यासाठी बाजारातील चढ-उतार कायमच कामाला येतात. इन्फोसिस १,२०० (१,७५१), टाटा कन्सल्टन्सी ३,१०० (४,०००), लार्सन अँड टुब्रो माइंडट्री ४,१०० (६,०००) कंसातील आकडे ५० आठवड्यांतील उच्चांकी भाव दर्शवतात; या आकर्षक किमतीला उपलब्ध आहेत. ज्यांनी गुंतवणुकीस नव्याने सुरुवात केली आहे किंवा आधीपासूनच चांगल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची सवय आहे त्यांच्यासाठी अशा पडत्या काळात चांगले शेअर निवडून प्रत्येक पडझडीच्या वेळी थोडीफार खरेदी करणे कायमच लाभाचे ठरणार आहे. या क्षेत्राला कोणताही धोका नाही असे आहे का? मुळीच नाही! युरोप आणि अमेरिकेमध्ये वाढलेली महागाई तेथील सरकारांसाठी चिंतेची बाब आहे. परिणामी अमेरिका आणि युरोपमध्ये आर्थिक परिस्थिती मंदावली तर त्याचा परिणाम या कंपन्यांच्या व्यवसायावर निश्चितच होऊ शकतो; पण हा कालावधी दीर्घकाळ नाही हे गुंतवणूकदाराने लक्षात घ्यायला हवे.
एकीकडे ही मोठी गोष्ट समजून घेतल्यावर या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. जसजसे रिझर्व्ह बँकेकडून व्याज दरवाढीचे सत्र सुरू होईल, तसतसे बँक आणि वित्त संस्थांकडून मुदत ठेवींवरील व्याजदर वाढायला सुरुवात होते. अपरिवर्तनीय कर्जरोखे (एनसीडी) या माध्यमातून कंपन्या आकर्षक व्याज दर देऊन पैसे गोळा करण्याच्या मार्गाला लागल्या आहेत. सरकारी बँकांच्या तुलनेत खासगी बँका अल्प आणि मध्यम कालावधीसाठी आकर्षक व्याज दर द्यायला सुरुवात करतील. तुम्ही कोणत्या करदराच्या श्रेणीत आहात? याचा विचार करून गुंतवणुकीचा निर्णय घ्यायला काहीच हरकत नाही. आपल्या पोर्टफोलिओचा एक छोटासा भाग म्हणून सोने आणि चांदीचा विचार करणाऱ्यांनी सध्याचे सोन्या-चांदीचे घसघशीत वाढलेले भाव नक्की लक्षात घ्यावेत आणि योग्य संधी येताच त्यात गुंतवणूक करावी.
(या लेखात उल्लेख केलेल्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी गुंतवणूकदारांनी आपल्या वैयक्तिक जोखमीवर करावी.)