मुंबई: कमकुवत जागतिक संकेतांमुळे बँकिंग, धातू आणि तेल समभागांमध्ये जोरदार विक्री झाल्यानंतर प्रमुख निर्देशांकांमध्ये दोन टक्क्यांहून अधिक घसरण झाली. सेन्सेक्समध्ये बुधवारच्या सत्रात १,६२८ अंशांची म्हणजेच २.२३ टक्क्यांची पडझड झाली, ही गेल्या दिड वर्षातील एका सत्रात झालेली सर्वाधिक मोठी घसरण आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,६२८.०१ अंशांनी घसरून ७१,५००.७६ पातळीवर स्थिरावला आणि त्यातील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी २४ कंपन्यांचे समभाग नकारात्मक पातळीवर बंद झाले. दिवसभरात, त्याने १,६९९.४७ अंश गमावत ७१,४२९.३० ही सत्रातील नीचांकी पातळी गाठली. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी सलग दुसऱ्या दिवशी ४६०.३५ अंशांनी म्हणजेच २.०९ टक्क्यांनी घसरून २१,५७१.९५ वर स्थिरावला. १३ जून २०२२ नंतर एका सत्रात झालेली ही मोठी घसरण आहे.
हेही वाचा… शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स १६०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २१,६०० च्या खाली
सेन्सेक्समध्ये टाटा स्टील, कोटक महिंद्र बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फिनसर्व्ह, मारुती, इंडसइंड बँक आणि स्टेट बँकेच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर एचसीएल टेक्नॉलॉजीज, इन्फोसिस, टेक महिंद्र, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, नेस्ले आणि लार्सन अँड टुब्रो यांचे समभाग सकारात्मक राहिले.
फेडकडून तातडीने व्याजदर कपातीची शक्यता नसल्याने बँकांच्या समभागात जोरदार घसरण झाली, परिणामी निर्देशांकावर त्याचे पडसाद उमटले. समभागांचे उच्च मूल्यमापन, तिमाहीतील कंपन्यांची वाढलेली कमाई आणि जीडीपी वाढीबाबत आशावाद अशा एकंदर परिणामामुळे भांडवली बाजाराने नवीन उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र त्यांनतर नफावसुलीमुळे बाजारात घसरण होणे अपेक्षित होते, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
दर कपातीच्या विलंबाबद्दल चिंता
अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर क्रिस्टोफर वॉलर यांनी दर कपात अपेक्षेपेक्षा मंद गतीने होऊ शकते, असा इशारा दिल्यानंतर त्याचे प्रतिकूल पडसाद जगभरातील भांडवली बाजारांवर उमटले.
अमेरिकी रोखे उत्पन्न आणि डॉलर निर्देशांकात वाढ
वॉलर यांच्या वक्तव्यानंतर अमेरिकी १० वर्ष मुदतीच्या रोख्यांवरील उत्पन्नात वाढ झाली आहे. शिवाय डॉलर निर्देशांक ४ टक्क्यांनी वधारून एका महिन्याच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.
जागतिक कमकुवत संकेत
व्याजदर कपातीस होणार विलंब आणि त्यापरिणामी रोखे उत्पन्न व डॉलर निर्देशांक वधारल्याने जगभरातील भांडवली बाजारांमध्ये मंदीवाल्यांनी बाजाराचा ताबा घेतला. अमेरिकी भांडवली बाजारात डाऊ जोन्स इंडस्ट्रियल निर्देशांक, एसअँडपी ५०० आणि नॅसडॅक १०० मध्ये घसरण झाली.
आशिया-पॅसिफिकमधील बाजारांनाही समभाग विक्रीच्या दबावाचा सामना करावा लागला. हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि चीनमधील बाजारात देखील पडझड झाली.
एचडीएफसी बँकेकडून निराशा
बुधवारच्या सत्रात झालेल्या पडझडीचा सर्वाधिक परिणाम एचडीएफसी बँकेच्या समभागांवर झाला. डिसेंबर अखेर सरलेल्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमकुवत आल्याने त्याची परिणती समभाग पडझडीत झाली. निफ्टी ५० निर्देशांकात १३.५२ टक्के असे या समभागाचा सर्वाधिक भार आहे आणि त्यामुळे या समभागातील विक्रीमुळे निर्देशांकावर दबाव निर्माण झाला.
व्यापक घसरण
माहिती तंत्रज्ञान क्षेत्र वगळता सर्व क्षेत्र नकारात्मक पातळीवर स्थिरावले. डॉलर निर्देशांकात वाढ झाल्याने धातू कंपन्यांच्या समभागात देखील घसरण झाली ज्यामुळे निफ्टी मेटल निर्देशांक ३ टक्क्यांहून अधिक घसरला. वाहन निर्मिती, औषध निर्माण, ग्राहकपयोगी वस्तू, ऊर्जा, सार्वजनिक क्षेत्रातील बँक क्षेत्र निर्देशांकात प्रत्येकी १ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. व्यापक बाजारपेठेचे प्रतिनिधित्व करणारे निफ्टी स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकही प्रत्येकी १ टक्क्यांहून अधिक घसरले.