Mahindra & Mahindra : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या नेतृत्वाखालील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी लवकरच एक मोठा करार करणार आहे. त्या कराराअंतर्गत एसएमएल इसुझू (SML Isuzu) मधील बहुसंख्य हिस्सा महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी खरेदी करणार आहे. अवजड वाहन क्षेत्रातील एक मोठं नाव असलेल्या एसएमएल इसुझू लिमिटेडचा समावेश यानंतर महिंद्रा ग्रुपच्या पोर्टफोलिओमध्ये केला जाईल.
महिंद्रा अँड महिंद्रा मोठ्या व्यावसायिक वाहन क्षेत्रात आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी ५५५ कोटी रुपयांच्या करारात एसएमएल इसुझू लिमिटेडचे अधिग्रहण करणार आहे. एका अहवालानुसार महिंद्राने ५५५ कोटी रुपयांचा हा करार आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्ही प्रॉफीटने दिलं आहे.
एक्सचेंज फाइलिंगनुसार, स्कॉर्पिओ निर्माता कंपनी प्रमोटर सुमितोमो कॉर्पकडून ४३.९६ टक्के आणि एसएमएल इसुझूच्या सार्वजनिक शेअरहोल्डर इसुझू मोटर्स लिमिटेडकडून १५ टक्के हिस्सा खरेदी करेल. स्वतंत्रपणे एम अँड एम ६५० रुपये प्रति शेअर दराने २६ टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी खुली ऑफर देईल.
हे अधिग्रहण ३.५ टनांपेक्षा जास्त वजनाच्या सीव्ही विभागात उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न आहे, जिथे एम अँड एमचा ३ टक्के बाजार हिस्सा आहे. एम अँड एम म्हणतं की, या करारामुळे २०३० ते ३१ पर्यंत तो १० ते १२ टक्के आणि २०३५ ते ३६ पर्यंत २० टक्के पेक्षा जास्त वाढवण्याचा उद्देश असलेला त्यांचा बाजार हिस्सा तात्काळ दुप्पट होऊन ६ टक्के होईल.
५८.९६ टक्के भागभांडवलासाठी करार
रिपोर्ट्सनुसार, प्रति शेअर ६५० रुपयांच्या या करारात बाजार नियामक सेबीच्या अधिग्रहण नियमांनुसार अनिवार्य ओपन ऑफरचा समावेश आहे. याअंतर्गत कंपनी एसएमएल इसुझूमधील ५८.९६ टक्के हिस्सा खरेदी करेल. हे संपादन म्हणजे ३.५ टन पेक्षा जास्त क्षमतेच्या व्यावसायिक वाहन विभागात महिंद्राची उपस्थिती मजबूत करण्यासाठी एक मोठं पाऊल आहे. जिथे सध्या त्याचा बाजार हिस्सा फक्त ३ टक्के आहे. एसएमएलचा व्यवसाय विकत घेऊन महिंद्रा ग्रुपला तात्काळ प्रभावाने त्याचा हिस्सा दुप्पट करून ६ टक्के करण्याची आशा आहे.
कंपनीने काय म्हटलं?
महिंद्रा ग्रुपचे सीईओ आणि एमडी डॉ.अनिश शाह यांनी म्हटलं की, “एसएमएल इसुझूचे अधिग्रहण हे आमच्या व्यवसायांमध्ये ५ पट वाढीच्या आमच्या समूहाच्या दृष्टिकोनाकडे एक महत्त्वाचं पाऊल आहे. हा करार आमच्या भांडवल वाटप धोरणाशी सुसंगत आहे”, असं त्यांनी म्हटलं. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि सीईओ (ऑटो आणि फार्म सेक्टर) राजेश जेजुरीकर यांनी म्हटलं की, एसएमएल एक मजबूत वारसा, मोठा ग्राहक आधार आणि विश्वासार्ह उत्पादन पोर्टफोलिओ घेऊन येते. एकत्रितपणे आम्ही वेगाने विस्तार करण्यासाठी आणि फायदेशीर वाढ चालविण्यासाठी चांगल्या स्थितीत आहोत.