-आशीष ठाकूर
तेजीच्या प्रांगणात निफ्टी निर्देशांकावरील गेल्या दोन-तीन महिन्यांतील त्या त्या वेळेचे उच्चांक, मग ते २१,५००, २१,८००, २२,१००, २२,५२६ अंश असोत, उच्चांकाच्या चांदण्या तेजीच्या प्रांगणात त्या त्या वेळेला उमलत होत्या. निफ्टी निर्देशांकावरील १७ जून २०२२ च्या १५,१८३ च्या नीचांकापासून निफ्टीला तेजीचा कल, अथवा मंदीचा कल या दोहोंपैकी एकाची निवड करत पुढचे मार्गक्रमण करायचे होते. त्या वेळेला निफ्टी निर्देशांकांने तेजीचा कल निवडल्याचे आपण अनुभवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१५,१८३ च्या नीचांकाच्या वेळीही तेजीचा प्रवास, मग रशिया युक्रेन युद्ध, इस्रायल हमास ठिणगी, अमेरिकेत उसळलेला महागाईचा आगडोंब व तो नियंत्रित करण्यासाठी कर्जावरील व्याजदर वाढीचे चक्र अशा निसरड्या वाटेवरील, खाचखळग्यातून सरकणारा होता. एकमेकाला सांभाळत या तेजीच्या निसरड्या वाटेवरून ‘दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे’ असे म्हणत निफ्टी निर्देशांकाने २२,६१९ पल्लाही बघता बघता गाठला. आता वाचकांलेखी प्रश्न हाच की, निफ्टी निर्देशांकावरील भविष्यातील मैलाचा दगड ठरू शकणारा ऐतिहासिक उच्चांक काय असेल? याची प्रतीक्षा म्हणजे ‘तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी’ याप्रमाणे उत्सुकता शिगेला पोहोचवणारी आहे. त्याचा विस्तृत आढावा चैत्र मासाच्या पूर्वसंध्येतील या लेखातून जाणून घेऊया, तत्पूर्वी निर्देशांकांचा सरलेल्या सप्ताहातील साप्ताहिक बंद जाणून घेऊया.

आणखी वाचा-बाजारातली माणसं : फंड वितरकांचा हक्काचा माणूस- प्रेम खत्री

शुक्रवारचा बंद भाव

सेन्सेक्स: ७४,२४८.२२ / निफ्टी: २२,५१३.७०

येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकावरील हलक्या-फुलक्या घसरणीत निफ्टी निर्देशांकाला २२,००० ते २१,८०० चा आधार असेल. या स्तरावर निफ्टी निर्देशांकांने पायाभरणी केल्यास, निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे २२,५०० अधिक ३०० अंश २२,८००, २३,१०० ते २३,४०० असे ३०० अंशांच्या परिघातील उच्चांक टप्प्याटप्प्याने दृष्टिपथात येतील.

निसर्गनियमाप्रमाणे सूर्योदयानंतर सूर्यास्त, भरतीनंतर ओहोटी त्याप्रमाणे तेजीनंतर मंदी. निफ्टी निर्देशांकावर २२,८०० ते २३,४०० हा तेजीच्या वाटचालीतील अवघड टप्पा असेल. तथापि, २२,८०० ते २३,४०० च्या दरम्यान दुहेरी अथवा तिहेरी उच्चांक (डबल, ट्रिपल टॉप)नोंदवून घसरण सुरू झाली तर ही घसरण हलकीफुलकी असेल की घातक उतार असेल, त्याचा आढावा घेऊया. मार्चच्या तेजीच्या हर्षोन्मादातदेखील निफ्टी निर्देशांकावर २२,५२६ वरून २१,७१० अशी ८१६ अंशांची हलकीफुलकी घसरण येऊन गेली (मिडकॅप क्षेत्रात घसरण मात्र २० ते ३० टक्क्यांनी झाली). त्यावरून नजीकच्या भविष्याचा असाच काहीसा अंदाज आपण आता बांधणार आहोत.

आणखी वाचा-वेष्टनांतील आकर्षक, टिकाऊ गुणवत्ता

निफ्टी निर्देशांकाचा संभावित उच्चांक हा २२,८०० ते २३,४०० दरम्यान प्रस्थापित झाल्यास या स्तरावरून निफ्टी निर्देशांक २२,३५० पर्यंत घसरल्यास, ही घसरण निफ्टी निर्देशांकावरील हलकीफुलकी घसरण म्हणून आपण संबोधू शकतो. जर निफ्टी निर्देशांक २१,८०० ते २१,५०० पर्यंत घसरल्यास मंदीची व्याप्ती जरा विस्तारली असे समजण्यास हरकत नाही. या घसरणीत निफ्टी निर्देशांकाला भरभक्कम आधार हा २१,००० ते २०,८०० स्तरावर असेल.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will nifty reach the difficult stage of 22800 to 23400 in bullish trend print eco news mrj