ऑगस्ट महिन्याची सुरुवातच मुळी चिंताजनक बातम्यांनी झाली. अमेरिकेतील रोजगार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या वाढत्या बेरोजगारीच्या आकडेवारीने, बाजार धुरिणांकडून त्या अर्थव्यवस्थेत मंदीची आशंका व्यक्त व्हायला लागली. यातून तेजीला खीळ बसत अमेरिकी भांडवली बाजार कोसळले. त्यातच बँक ऑफ जपानने कर्जावर व्याज आकारणीचे धोरण स्वीकारल्याने, या मंदीच्या ज्वाळांनी जपान, तैवान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग या देशांतील भांडवली बाजारांना लपेटलं. हे घडत असतानाच, बांगलादेशातील सरकार विरुद्ध जनतेचा उठाव आणि इराण-इस्रायल युद्धाने चालू असलेल्या मंदीच्या आगीत तेल ओतले. अशा विविध चिंताजनक, निराशाजनक घटना जराही उसंत न घेता ऑगस्ट महिन्याच्या पूर्वार्धात एकापाठोपाठ एक घडून आल्या.
जगातील प्रमुख भांडवली बाजार मंदीने प्रभावित होते, आशियाई बाजारही १० ते १३ टक्क्यांनी कोसळले. हे सर्व आर्थिक आघाडीवरील भूकंप, हादरे घडत असताना आपल्याकडे, आपला गुंतवणूकदार जराही न डगमगता म्युच्युअल फंडात आपले महिन्याचे उत्तरदायित्व (एसआयपी) करतच होता. किंबहुना वाढीव प्रमाणात गुंतवत होता. (या आर्थिक हादऱ्यांमध्ये २१ हजार कोटींचे एसआयपी संकलन झाले आहे.) एकुणात, ‘मुझे दर्द के काबिल बना दिया, तुफाँ को ही कश्ती का साहिल बना दिया’ असं म्हणत या आर्थिक वादळांना गुंतवणूकदार हसत खेळत सामोरे गेले. या पार्श्वभूमीवर या आठवडयाच्या वाटचालीकडे वळू या.
आणखी वाचा-घोटाळा, महिला आणि मृत्युदंड (भाग १)
शुक्रवारचा बंद भाव:
सेन्सेक्स: ७९,७०५.९१
निफ्टी: २४,३६७.५०
ऑगस्टच्या सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर, भांडवली बाजारात जो रक्तपात झाला त्या कारणांचा विस्तृतपणे आढावा घेत, निफ्टीची भविष्यकालीन वाटचाल रेखाटू या.
या आर्थिक वादळाची सुरुवात ही जपानच्या पतधोरणाशी निगडित आहे. गेली कित्येक वर्षे जपान हे कर्जावर शून्य टक्के व्याजदर आकारत असे. याचा फायदा जपान व अमेरिकेतील बडे गुंतवणूकदार घेत असत ते शून्य व्याजदरावर पैशाची उभारणी करत, ते पैसे अमेरिकी भांडवली बाजारात गुंतवत. याचा त्यांना दुहेरी फायदा होत असे. चलन विनिमय दरात सशक्त डॉलर व अशक्त येन असे समीकरण असायचे. त्याचा फायदा असा… समजा एक कोटीचे बिनव्याजी कर्ज घेतले तर परतफेडीच्या वेळेला चलन विनिमय दरात डॉलर सशक्त तर अशक्त येन असल्याने, परतफेडीच्या वेळेला एक कोटीऐवजी ९७ लाख परत करावे लागत. तेव्हा चलन विनिमय दरातील फायदा व अमेरिकन भांडवली बाजारदेखील तेजीत होता.
आणखी वाचा-बाजार-रंग : अर्थसंकल्पातील आकडेमोड जुळवताना
ऑक्टोबर २०२२ मधील २८,६६६ वरून, डाऊ जोन्सने १८ जुलै २०२४ मध्ये ४१,३७६चा उच्चांक मारला. इथपर्यंत सर्व ठीक होते. गुंतवणूकदार दोन्ही हातांनी (चलन विनिमय दरातील तफावत व डाऊ जोन्समधील तेजी) फायदा कमावत होते. ३१ जुलैला बँक ऑफ जपानने कर्जावरील व्याजदर हा शून्य टक्क्याहून ०.२५ टक्क्यांनी वाढवल्याने चलन विनिमय दरातील कमकुवत असलेला येन सशक्त झाला, त्याच सुमारास अमेरिकेतील रोजगार मंत्रालयाने वाढत्या बेरोजगारीची आकडेवारी प्रसिद्ध केली. बाजारधुरिणांनी अर्थव्यवस्थेत मंदीची शक्यता व्यक्त केल्याने, २२ महिने चालू असलेल्या तेजीला खीळ बसत अमेरिका-जपानचे भांडवली बाजार कोसळले. आशियाई बाजार १० ते १३ टक्के घसरले. त्या प्रमाणात आपल्या निफ्टी निर्देशांकावर अवघी ४.७ टक्के घसरण झाली. या सर्व जागतिक घटनांचा प्रभाव, व्याप्ती लक्षात घेऊन निफ्टी निर्देशांकाची भविष्यकालीन वाटचाल रेखाटू या.
या स्तंभातील २२ जुलैच्या ‘अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येवर’ या लेखात अर्थसंकल्प सादर झाल्यावर निफ्टी निर्देशांकाने सातत्याने १५ दिवस २४,००० चा स्तर राखला तरच ‘शिंपल्यातील मोती’ सदरातील अगोदर सुचवलेले समभाग खरेदी करावेत असे नमूद केलेले त्याप्रमाणे ६ ऑगस्टचा अपवाद वगळता या घुसळणीत, उलथापालथीत निफ्टी निर्देशांक २४,०००चा स्तर राखण्यात यशस्वी ठरला आहे. आता काळाच्या कसोटीवर २४,००० हा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू’असून हा स्तर निफ्टी निर्देशांकांनी सातत्याने राखल्यास निफ्टी निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य २४,५०० ते २४,६५० तर, द्वितीय लक्ष्य २४,९५० ते २५,२०० असेल. ही नाण्याची एक बाजू झाली. निफ्टी निर्देशांक २४,००० चा स्तर राखण्यात अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य हे २३,८०० ते २३,६०० तर, द्वितीय लक्ष्य २३,३०० ते २३,००० असेल.
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.