Market Week Ahead: मागील संपूर्ण आठवडाच नव्हे, तर ४ फेब्रुवारीपासून शेअर बाजारात व्यवहार झालेल्या सलग आठ सत्रांमध्ये सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांच्या नुकसानीची मालिका सुरू आहे. रिझर्व्ह बँकेने अलिकडेच केलेली रेपो दर कपात, तर त्या आधी अर्थसंकल्पातील कर-सवलतीच्या तरतुदीही बाजारात आनंद निर्माण करू शकलेल्या नाहीत. उल्लेखनीय म्हणजे, आधीच्या तीन सत्रांमध्ये दिवसांतर्गत व्यवहारात केलेली चांगली कमाई टिकवून ठेवण्यात बाजाराला अपयश आले आणि निर्देशांकांनी बाजार बंद होता होता नकारात्मक वळण घेतल्याचे आढळून आले. बाजारातील व्हॅलेंटाइन सप्ताह हा गुंतवणूकदारांचा हिरमोड करणारा ठरला. १० ते १४ फेब्रुवारीदरम्यान सेन्सेक्स १,९२१ अंशांनी (२.६४%), तर निफ्टी ६३० अंशांनी (२.७०%) गडगडला.
बाजारातील ही घसरण आणखी कुठवर सुरू राहणार? निर्देशांकांनी फेरउसळी घेतली तर नफावसुलीने पुन्हा बाजार घसरणपदाला येणार काय? बाजार मंदीच्या फेऱ्यात गेला असे म्हणता येईल काय? नाही तर मग बाजार सावरून तेजी परत कधी दिसेल? असे गुंतवणूकदारांपुढे अनेक प्रश्न आहेत.
येत्या आठवड्यात बाजारावर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख घडामोडींच्या पार्श्वभूमीवर याची वरील प्रश्नांची उत्तरे काय ते जाणून घेऊ.
आगामी १७ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी या आठवड्यातील पाच लक्षणीय घडामोडीः
१. कंपन्यांची तिमाही कामगिरी
आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या (ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४) तिमाहीच्या निकाल हंगामाचा हा शेवटचा हप्ता असेल. या आठवड्यात सोमवारी (१७ फेब्रुवारी) एबीबी, पोद्दार हाऊसिंग, तर बुधवारी (१९ फेब्रुवारी) गणेश इन्फ्रा, त्यानंतर सप्ताहअखेरीस सीआयई ऑटोमोबाईल्स, सुप्रीम फॅसिलिटी या मोजक्या कंपन्यांचे निकाल नियोजित आहेत. कंपन्यांच्या आर्थिक कामगिरी संमिश्र, किंबहुना निराशादायी राहण्याचा गत महिनाभरात बाजारावर सर्वाधिक नकारात्मक परिणाम राहिला आहे. या अंगाने निकाल हंगाम एकदाचा संपल्याने बाजारावरील एक नकारार्थी घटक संपुष्टात येणे खरे तर स्वागतार्हच ठरावे.
२. लाभांशरूपी धनलाभः
आगामी आठवड्यात विविध ४० कंपन्यांचे लाभांश हे शेअरहोल्डर गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा होतील. सुरुवात सोमवारी दालमिया भारतचा २२५% लाभांश, नंतर जिलेट इंडिया ६५०%, हिंदुस्थान एअरोनॉटिक्स ५००% लाभांश (१८ फेब्रुवारी), पी अँण्ड जी हायजीन ११००% लाभांश (२० फेब्रुवारी), बॉम्बे बर्मा ६५०%, पी अँण्ड जी हेल्थ ८००% आणि इंडिया निप्पॉन इलेक्ट्रिक २५०% (२१ फेब्रुवारी) या प्रमुख मोठ्या धनलाभ देणाऱ्या कंपन्या आहेत.
३. अमेरिकेचे जशास तसे व्यापार युद्ध:
अमेरिकेकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क लादणाऱ्या भारतासह प्रत्येक देशावर जशास तसे नीतीने अमेरिकाही व्यापार कर लागू करेल, या भूमिकेचा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमक्षमच पुनरूच्चार केला. शुक्रवारी वर चढलेल्या बाजाराला नकारात्मक वळण देण्यास ही गोष्ट कारणीभूत ठरली. मात्र वॉशिंग्टनमधील या ट्रम्प-मोदी बैठकीत, द्विपक्षीय व्यापार २०३० पर्यंत दुप्पट करून ५०० अब्ज डॉलरवर नेण्याचे लक्ष्य आणि त्यायोगे राष्ट्रीय सुरक्षा आणि रोजगार निर्मितीवर भर देण्यावर दोन्ही नेत्यांनी दाखविलेली वचनबद्धता देखील आश्वासक आहे, असे कोटक सिक्युरिटीजचे संशोधनप्रमुख श्रीकांत चौहान म्हणाले.
४. घसरणीतून सावरून स्थिरता:
गेल्या काही दिवसांतील ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांसंबंधाने आक्रमकता आणि त्याला असलेला अनिश्चिततेचा पैलू, कंपन्यांच्या तिमाही कामगिरीतील निराशा, परकीयांची अथक विक्री या घटकांनी शेअर बाजारावर भलताच ताण आणला. स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्सना तर इतके झोडपून काढले गेले की त्यांचे भाव मंदीच्या टप्प्यांत पोहोचले आहेत. म्हणजेच अलिकडच्या उच्चांक स्तरापासून त्यांचे भाव २० टक्के वा अधिक आपटले आहेत. त्यामुळे हा बाजाराचे मूल्यांकन वाजवी पातळीवर आल्याचा संकेत ठरावा. लार्ज कॅप शेअर्सच्या मूल्यांकनाबाबत तसे फारसे चिंतेचे कारण आधीही नव्हते आणि आताही नाही. बाजार घसरणीतून सावरून पुन्हा चोखंदळ खरेदीची ही गुंतवणूकदारांसाठी संधी ठरावी, असे जिओजित फायनान्शिय सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले.
५. भारताचा उत्पादन पीएमआय:
भारताच्या कारखानदारी क्षेत्रातील सक्रियतेचे मोजमाप असलेला ‘एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय’ सरलेल्या जानेवारी २०२५ साठी ५७.७ गुणांवर नोंदवला गेला. जो गत सहा महिन्यांतील म्हणजेच जुलैनंतरचा सर्वात जलद विस्तार ठरला. सहा महिन्यांतील नवीन कार्यादेशांमधील सर्वात वेगवान वाढ जानेवारीने नोंदविली. तसेच जवळजवळ १४ वर्षांतील निर्यातीत झालेली सर्वात मोठी मासिक वाढ देखील या महिन्यांतच दिसली. आता फेब्रुवारीतील क्रियाकलापांमध्ये वाढीचे नवीनतम आकडे शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) सकाळी जाहीर होणे अपेक्षित आहे. वाढीचे आकडे शेअर बाजाराला सुखावणारे निश्चितच ठरतील.