मार्चअखेरीस राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १६,८०० चा स्तर राखेल का? ही चिंता, फिकीर… धुएँ में उडाता चला गया, कारण आलेखावर १६,८०० वरून १७,८०० अशी १,००० अंशांच्या तेजीचे स्पष्ट संकेत दिसत असल्याने, ते वाचकांना वेळीच अवगत करून देत, आलेख-वाचकांसोबतचे नाते वृद्धिंगत करत ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया!’ या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.
शुक्रवारचा बंद भाव
सेन्सेक्स : ५९,६५५.०६
निफ्टी : १७,६२४.०५
निफ्टी निर्देशांकाची भविष्यकालीन वाटचाल रेखाटताना, सोबत कालमापन पद्धतीचा (टाइम सायकल) आधार घेतल्यास, निफ्टी निर्देशांकावरील १७,५०० ते १७,८०० या ३०० अंशांच्या परिघाला आणि मे महिन्याच्या ५ ते १० मे या कालावधीला अनन्यसाधारण महत्त्व असेल. निफ्टी निर्देशांकांनी १७,५०० चा स्तर राखत १७,८०० चा स्तर पार केल्यास, ५ ते १० मेच्या दरम्यान निफ्टी निर्देशांकाचे १८,१०० ते १८,२५० चे वरचे लक्ष्य साध्य होईल. हे लक्ष्य साध्य झाल्यावर मे महिन्याचा संपूर्ण कालावधीत निफ्टी निर्देशांकाने १८,००० चा स्तर राखण्याची नितांत गरज आहे. असे घडल्यास निफ्टी निर्देशांक मंदीच्या गर्ततेतून बाहेर पडून, निफ्टीसाठी तेजीचे नवीन दालन उघडेल व निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य १९,०००च्या समीप असेल. ही नाण्याची एक बाजू झाली.
५ ते १० मे या कालावधीत निफ्टी निर्देशांकांनी १८,१०० ते १८,२५० चे वरचे लक्ष्य साध्य होऊन, निफ्टीमध्ये घसरण सुरू झाल्यास आणि या घसरणीत १७,५०० चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास, निफ्टी निर्देशांक प्रथम १६,८०० व त्यानंतर १६,२०० ते १५,८०० पर्यंत खाली घसरू शकतो.
शिंपल्यातील मोती
एनसीसी लिमिटेड (नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनी)
शुक्रवार, २१ एप्रिल बंद भाव: ११३.५० रु.
कंपनीच्या नावातील कन्स्ट्रक्शन हा शब्द म्हणजे ‘शब्दापेक्षा कृती जास्त बोलकी, कन्स्ट्रक्टिव्ह असते’ या उक्तीचा प्रत्यंतर देणारी ही कंपनी आहे. गृहसंकुल व्यापारी संकुल, आयटी पार्क, मॉल, क्रीडासंकुल, इस्पितळे असे विविध बांधकामाचे प्रकार ही कंपनी गेली चार दशकांहून अधिक काळ हाताळत आहे. त्यात काळाच्या गरजेनुसार या कंपनीने जल संधारण, शेतीसाठी पाण्याचे नियोजन व पुरवठा, विदयुत, खनिज क्षेत्रात विस्तार केलेला आहे. आर्थिक आघाडीवर वार्षिक तुलना करता कंपनीने डिसेंबर २०२१ मध्ये २,७०३.९३ कोटींची विक्री केली. त्या तुलनेत डिसेंबर २०२२ मध्ये ३,३१२.६६ कोटींची विक्री केली. करपूर्व नफा हा १३०.१९ कोटींवरून २१७.५३ कोटींवर पोहोचला आहे, तर निव्वळ नफा ९०.९७ कोटींवरून १४९.८८ कोटींवर झेपावला.
मंदीसदृश अशा बांधकाम क्षेत्रातील कंपनीची ही कामगिरी निश्चितच उजवी आहे. ही आर्थिक कामगिरी कंपनीच्या भांडवली बाजारातील समभागावर परावर्तित होत इतके दिवस ७५ ते ९० रुपयांमध्ये रेंगाळणारा एनसीसीचा समभाग ११३ रुपयांवर झेपावला. एनसीसी कंपनीचा समभाग अल्पावधीत भरीव रीतीने वाढल्याने, जेव्हा बाजारात व समभागात मंदी येईल तेव्हा ९० ते ८० रुपयांच्या दरम्यान हा समभाग २० टक्क्यांच्या पाच तुकड्यांत प्रत्येक घसरणीत खरेदी करावा. एनसीसी समभागाचे दीर्घ मुदतीचे वरचे लक्ष्य हे अनुक्रमे १५० रुपये, १८० रुपये ते २०० रुपये असेल. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला ७० रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा. निकालपूर्व विश्लेषणाचे सदर काळाच्या कसोटीवर तपासता आनंद राठी वेल्थ लिमिटेडनी निकालापश्चात ७९० रुपयांचा निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखत ८६० रुपयांचे नमूद केलेले प्रथम वरचे लक्ष्य १३ एप्रिलला ८८४ चा उच्चांक मारत साध्य केले. तसेच २१ एप्रिलचा बंद भाव ८५८ रुपये आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टीसीएस व इन्फोसिसच्या तिमाही निकालांनी बाजाराची निराशा केली. परिणामी कंपन्यांनी निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर तोडत, टीसीएसने ३,१०० रुपयांचा नीचांक गाठला, तर इन्फोसिसने १,३४० रुपयांखाली घसरत २१ एप्रिलला १,२२७ रुपयांवर स्थिरावला.
निकालपूर्व विश्लेषण
१) बजाज ऑटो लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- मंगळवार, २५ एप्रिल
२१ एप्रिलचा बंद भाव- ४,३०८.३० रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ४,१५० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४,१५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४,४०० रुपये, द्वितीय लक्ष्य ४,६०० रुपये.
ब) निराशादायक निकाल : ४,१५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३,९५० रुपयांपर्यंत घसरण.
२) मारुती सुझुकी लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- बुधवार, २६ एप्रिल
२१ एप्रिलचा बंद भाव- ८,५५८.४५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ८,६०० रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ८,६०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८,८०० रुपये, द्वितीय लक्ष्य ९,००० रुपये.
ब) निराशादायक निकाल: ८,६०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ८,४०० रुपयांपर्यंत घसरण.
३) आयडीएफसी फर्स्ट बँक
तिमाही वित्तीय निकाल- शनिवार, २९ एप्रिल
२१ एप्रिलचा बंद भाव- ५६.४५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ५५ रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ५५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ६० रुपये, द्वितीय लक्ष्य ६४ रुपये.
ब) निराशादायक निकाल : ५५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ५२ रुपयांपर्यंत घसरण.
४) कोटक महिंद्र बँक
तिमाही वित्तीय निकाल – शनिवार, २९ एप्रिल
२१ एप्रिलचा बंद भाव – १,८९३.६५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १,८३० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,८३० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,००० रुपये, द्वितीय लक्ष्य २,१५० रुपये.
ब) निराशादायक निकाल : १,८३० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,७७० रुपयांपर्यंत घसरण.
५) टाटा स्टील लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- मंगळवार, २ मे
२१ एप्रिलचा बंद भाव – १०६.१५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १०४ रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १०४ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ११४ रुपये, द्वितीय लक्ष्य १२४ रुपये.
ब) निराशादायक निकाल : १०४ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ९८ रुपयांपर्यंत घसरण.
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
(ashishthakur1966@gmail.com)