माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी विप्रो लिमिटेडच्या भागधारकांनी १२,००० कोटी रुपयांच्या प्रस्तावित समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) योजनेला मंजुरी दिल्याचे, सोमवारी कंपनीकडून भांडवली बाजाराला अधिकृतपणे कळविण्यात आले. विप्रोच्या संचालक मंडळाने मंजुरी दिलेल्या योजनेनुसार, कंपनीकडून सुमारे २६.९६ कोटी समभाग हे प्रत्येकी ४४५ रुपये किमतीला खरेदी केले जाणार आहेत. समभाग पुनर्खरेदीच्या या विशेष ठरावावर टपाली आणि ऑनलाइन (ई-व्होटिंग) मतदान प्रक्रियेद्वारे छाननीकर्त्याच्या अहवालानुसार, ९९.९ टक्के भागधारकांनी ठरावाच्या बाजूने मत दिले. मतदानाचा कालावधी ३ मे रोजी सकाळी सुरू झाला आणि १ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता तो संपला.
हेही वाचाः पीएफमध्ये जमा केलेले आपले कष्टाचे पैसे धोक्यात? EPFOचा शेअर्समधील गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय
दरम्यान कंपनीने या समभाग पुनर्खरेदी योजनेत सहभागासाठी भागधारकांची पात्रता निश्चित करण्याच्या उद्देशाने शुक्रवार, १६ जून २०२३ ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. म्हणजेच या तारखेपूर्वी विप्रोचे समभाग हाती असणारे भागधारक या योजनेत त्यांच्याकडील समभाग विकण्यास पात्र ठरतील, असे विप्रोने बाजाराला निवेदनांत स्पष्ट केले आहे.
हेही वाचाः आदित्य बिर्ला समूह आता ज्वेलरी रिटेल व्यवसायात उतरणार; ५००० कोटींची गुंतवणूक करणार
बेंगळुरूमध्ये मुख्यालय असलेल्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कंपनीने यापूर्वी २०१६ सालात २,५०० कोटींची, २०१७ सालात ११,००० कोटींची आणि २०२०-२१ मध्ये ९,५०० कोटी रुपये अशा रकमा समभाग पुनर्खरेदी योजनांवर खर्च करून भागधारकांच्या पदरी भरभरून फायदा दिला आहे.