Over Trading: झेरोधाचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामथ यांनी ट्रेडर्सना शेअर बाजारात शाश्वत यश मिळवण्यासाठी जोखीम व्यवस्थापनाचा (Risk Management) हुशारीने वापर करण्याचा सल्ला दिला आहे. कामथ यांनी नुकतेच एक्सवरील एका पोस्टमध्ये, कामथ यांनी बाजारात भीतीचे वातावरण असल्याची कबुली दिली आणि म्हटले की अशा अशांत काळात मानसिकता राखणे कठीण असते.
गुंतवणूकदारांना मदत करण्यासाठी, कामथ यांनी दिग्गज ट्रेडर जेरी पार्कर यांच्या एका जुन्या मुलाखतीतील काही मुद्दे पुन्हा एकदा शेअर केले आहेत. यासह कामथ यांनी जेरी पार्कर यांनी अवलंबलेल्या ‘टर्टल रुल’सह अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.
काय आहे टर्टल रुल?
पार्कर यांनी त्यांच्या मुलाखतीत ट्रेडर्सनी मोठे नुकसान टाळण्यासाठी ड्रॉडाऊनच्या दुप्पट वेगाने पोझिशन्स कमी करण्याचा सल्ला दिला. “हा टर्टल रुल आहे. जेव्हा तुमचा ड्रॉडाऊन असतो तेव्हा तुम्ही ड्रॉडाऊनच्या दुप्पट वेगाने तुमची पोझिशन्स कमी करता. जर तुम्ही १०% तोट्यात असाल तर तुम्ही तुमच्या पोझिशन्स २०% कमी कराव्यात. यामुळे तुमचा जास्त तोटा होत नाही आणि तुम्हाला ट्रेडिंग करण्यासाठी आणखी एक दिवस मिळतो,” असे पार्कर यांनी म्हटले होते.
अयशस्वी होण्याचे सर्वात मोठे कारण
पार्कर कबूल करतात की, “ट्रेडिंगमधील बहुतेक चुका बाजाराचे चुकीचे आकलन केल्यामुळे नव्हे तर त्या स्वतःहून घडलेल्या असतात. ओव्हर ट्रेडिंग करणे हे शेअर बाजारात अयशस्वी होण्याचे सर्वात मोठे कारण आहे.”
बाजारात असे प्रसंग येत राहतील
नितीन कामथ यांनी आपल्या पोस्टबरोबर जेरी पार्कर यांच्या एका जुन्या मुलाखतीची लिंकही शेअर केली आहे. ज्यामध्ये पार्कर यांनी २०२० मध्ये कोविड-१९ मुळे शेअर बाजारात झालेल्या घसरणीवर भाष्य केले आहे. यामध्ये त्यांनी ट्रेडर्सना असा सल्लाही दिला की, असे कठीण प्रसंग दर काही वर्षांनी येतील आणि रिस्क मॅनेजमेंट करण्यासाठी ट्रेडर्सनी त्यांच्या पोझिशन्सचे (गुंतवणुकीचे) योग्य नियोजन केले पाहिजे.
कोण आहेत निथीन कामत?
निथीन कामत हे झेरोधा या भारतातील प्रमुख ऑनलाइन ट्रेडिंग प्लेटफॉर्मचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. निथीन कामत आणि त्यांचे भाऊ, निखिल कामत, यांनी २०१० मध्ये झेरोधाची स्थापना केली आहे. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी झेरोधाला भारतातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय स्टॉक ब्रोकरिंग फर्म बनवले.
याचबरोबर निथीन कामत हे शेअर बाजाराच्या क्षेत्रातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आहेत. ते सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन देतात.