Zomato Share Prediction : शेअर बाजारात झोमॅटोचा शेअर गेल्या तीन ट्रेडिंग दिवसांत १८.१ टक्क्यांनी घसरला आहे. दरम्यान नुकत्याच जाहीर झालेल्या नकारात्मक तिसऱ्या तिमाहीच्या निकालांनंतर झोमॅटोमध्ये सतत घसरण सुरू आहे. दरम्यान या तीन दिवसांमध्ये झोमॅटोचे बाजार भांडवल ४४,६२० कोटी रुपयांनी कमी होत बुधवारी २,०१,८८५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. अशात मॅक्वेरी कॅपिटल सिक्युरिटीज या ब्रोकरेज फर्मने येत्या काही दिवसांमध्ये झोमॅटो शेअर तब्बल ४४ टक्क्यांपर्यंत घसरेल अशी शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान मॅक्वेरी कॅपिटल सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने, झोमॅटोसाठी त्यांचे ‘अंडरपरफॉर्म’ रेटिंग कायम ठेवले आहे. त्यांनी झोमॅटो शेअरचे टार्गेट प्रति शेअर १३० रुपये इतके ठेवले आहे. मॅक्वेरी कॅपिटलच्या मते, क्विक-कॉमर्स उद्योगातील स्पर्धेत लक्षणीय वाढ झाल्यामुळे झोमॅटोच्या शेअरच्या किंमतीला सुरक्षिततेची सीमा खूप कमी आहे. या फर्मने पुढे म्हटले आहे की, ते झोमॅटोला एक कार्यक्षम क्यू-कॉम आणि फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म मानतात परंतु स्टॉकच्या किमतीत ४४% घट होण्याची शक्यता आहे. मॅक्वेरीने कॅपिटलने जून २०२२ मध्ये, झोमॅटोला अंडरपरफॉर्म रेटिंग दिले, परंतु लवकरच ते बदलत झोमॅटो आउटपरफॉर्म करेल असे म्हटले होते.

झोमॅटोची तिमाही कामगिरी

झोमॅटोने या आठवड्याच्या सुरुवातील आर्थिक वर्ष २५ च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. यामध्ये झोमॅटोच्या निव्वळ नफ्यात ५७ टक्क्यांनी लक्षणीय घट झाली आहे. कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न ३,२८८ कोटी रुपयांवरून ५,४०५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. भक्कम वाढ होऊनही, ब्लिंकिटच्या विस्तारासाठी वाढत्या खर्चामुळे झोमॅटोचे नुकसान वाढले आहे. जे मागील वर्षीच्या तिमाहीत ८९ कोटी रुपये इतके होते.

झोमॅटो विरुद्ध निफ्टी ५०

गेल्या पाच ट्रेडिंग दिवसांमध्ये झोमॅटोचा शेअर १७ टक्क्यांपेक्षा जास्त घसरला आहे. गेल्या एका महिन्यात तो जवळजवळ २४ टक्के आणि मागील सहा महिन्यांत ५.६ टक्के घसरला आहे. असे असले तरी गेल्या एका वर्षात या शेअरने गुतंवणूकदारांना ६१ टक्के परतावा दिला आहे.

दुसरीकडे झोमॅटो शेअर आणि निफ्टी ५० या निर्देशांकाची तुलना केल्यास, निफ्टी ५० गेल्या पाच ट्रेडिंग दिवसांत १ टक्के घसरला असल्याचे पाहायला मिळाले आहे. तर गेल्या एका महिन्यात निफ्टी ५० २.७ टक्के आणि गेल्या सहा महिन्यांत ५.७ टक्के घसरला आहे. दरम्यान, गेल्या एका वर्षात निफ्टी ५० निर्देशांक अजूनही ८.८ टक्के वाढ कायम आहे.

Live Updates
Story img Loader