सुधीर जोशी
अमेरिकेपाठोपाठ भारतातदेखील चलनवाढीच्या दराने उसासा घेतला. परिणामी महागाईने पोळलेल्या भांडवली बाजाराला देखील दिलासा मिळाला. जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून गेल्या वर्षभरात सुरू असलेली आक्रमक व्याजदर वाढ काहीशी सौम्य होण्याची आशा आता बाजाराला वाटू लागली आहे. सेन्सेक्सने सरलेल्या सप्ताहात ५२ आठवड्यातील उच्चांकी पातळी गाठली तर बँक निफ्टीने ऐतिहासिक उच्चांकी पातळीला स्पर्श केला. भांडवली बाजार उच्चांकी पातळीवर पोहोचल्यावर गुंतवणूकदारांकडून नफावसुली झाली. मात्र बाजार आशादायी वातावरणात स्थिरावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिंडा कॉर्पोरेशन:
उत्पादनांमध्ये विविधता असणारी मिंडा कॉर्पोरेशन ही कंपनी वाहनांसाठी इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल सुटे भाग बनवते. वाहनांच्या सुरक्षितता प्रणालीमध्ये त्यांचा वापर होतो. वाहनांसाठी आणि घरगुती उपकरणांसाठी वापरले जाणारे प्लॅस्टिकचे भागदेखील कंपनी बनविते. कंपनीची २० टक्के उत्पादने निर्यात केली जातात. कंपनीने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीतील विक्रीत ५६ टक्के वाढ साध्य केली. कच्च्या मालाच्या किमतीमधील वाढीमुळे नफ्याच्या टक्केवारीवर दबाव असला तरी खर्चावरील नियंत्रणामुळे नफ्याचे प्रमाणही कंपनीला कायम राखता आले. कंपनीला ५८ टक्के उत्पन्न दुचाकी व तीनचाकी वाहनांच्या निर्मात्यांकडून मिळते. आता संवाहकाचा पुरवठा सुधारला असल्यामुळे या क्षेत्रातील व्यवसाय स्थिर झाला आहे. विद्युत शक्तीवर चालणारी वाहने आणि त्यांचे चार्जर यांना लागणारे सुटे भागही कंपनीने विकसित केले आहेत. सध्या २१० रुपयांजवळ आलेला बाजारभाव कंपनीत गुंतवणूक करायला फायदेशीर आहे.

महिंद्र अँड महिंद्र:
कंपनीने सप्टेंबरअखेर सरलेल्या आणखी एका तिमाहीत दमदार निकाल जाहीर केले. कंपनीच्या एकूण विक्रीमध्ये ३९ टक्क्यांची वाढ होऊन ती ३० हजार कोटींच्याजवळ पोहोचली तर नफा ४३ टक्क्यांनी वाढून २,७७२ कोटींवर पोहोचला आहे. एसयूव्ही प्रकारातील वाहनांना सध्या ग्राहकांची जास्त पसंती मिळत आहे, ज्यामधे या कंपनीचा पहिल्यापासून दबदबा आहे. कंपनी एसयूव्ही वाहनांची उत्पादन क्षमता दहा हजारने वाढवत आहे. कंपनी शेतीला लागणाऱ्या उपकरणांसाठी देखील क्षमता विस्तार करत आहे. ट्रॅक्टर उत्पादनात कंपनी पहिल्यापासूनच अग्रेसर आहे. यावेळी झालेल्या समाधानकारक पावसामुळे त्यांची मागणी समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. सध्याच्या १,२३० रुपयांच्या पातळीवर गुंतवणुकीचा विचार करता येईल.

पॉलिकॅब:
इलेक्ट्रिकल वायर आणि केबल्सच्या व्यवसायातील ही आघाडीची कंपनी आहे. भारतातील या व्यवसायातील २२ ते २४ टक्के वाटा या कंपनीकडे आहे. याबरोबर घरगुती वापराचे पंखे, दिवे, ट्युबलाइट अशा उपकरणांच्या व्यवसायामध्ये देखील कंपनीने पाय रोवले आहेत. कंपनी वायर व केबल्सचे अकरा हजार प्रकार तर विजेवर चालणाऱ्या घरगुती उपकरणांचे सहा हजार प्रकार उपलब्ध करते. सध्या बारा हजार कोटींची विक्री करणाऱ्या या कंपनीने पुढील तीन वर्षात वीस हजार कोटींचे उद्धिष्ट ठेवले आहे. कंपनीच्या कच्च्या मालाच्या (रबर, तांबे, ॲल्युमिनियम) किमतीत काही महिन्यांपूर्वी बरीच वाढ झाली, पण आपल्या गुणवत्तेच्या आणि नाममुद्रेच्या बळावर कंपनी ही वाढ ग्राहकांकडून वसूल करण्यात यशस्वी झाली आहे. आता या किमती स्थिर होऊन थोड्या खाली येत आहेत. ज्यामुळे कंपनीच्या नफ्यामध्ये सुधारणा होईल. गेल्या तिमाहीत कंपनीने विक्रीमध्ये ११ टक्के तर नफ्यात ३५ टक्के भर घातली होती. सध्याच्या २,५२७ रुपयांच्या पातळीवरील खरेदी पुढील एक दोन वर्षाचा विचार करता फायद्याची ठरेल.

देवयानी इंटरनॅशनल:
केएफसी, कोस्टा कॉफी आणि पिझ्झा हटसारखे तत्पर खानपान सेवा व्यवसाय चालविणारी देवयानी इंटरनॅशनल ही ज्युबिलंट फूडवर्क्सच्या तोडीची नवीन कंपनी आहे. गेल्या काही महिन्यांत अन्नधान्यांच्या वाढत्या किमतींमुळे कंपनी आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागला. तरीही कंपनीने दुसऱ्या तिमाहीत विक्रीमध्ये ४४ टक्के तर नफ्यात २१ टक्के वाढ साधली. या तिमाहीत नवीन ८८ दालने उघडल्यामुळे कंपनीच्या सेवा दालनांची संख्या आता १,०९६ वर पोहोचली आहे. भारतामध्ये तत्पर खानपान सेवा देणाऱ्या व्यवसायांची वृद्धी सरासरी १५ टक्क्यांनी होत आहे. महागाईचा दरही कमी होत आहे. या कंपनीला व्यवसाय वृद्धीसाठी भरपूर वाव आहे. सध्या १८० रुपयांच्या पातळीवर असणारे हे समभाग गुंतवणुकीसाठी योग्य वाटतात.

सेन्सेक्सने पुन्हा एकदा वर्षभरातील उच्चांकी पातळी गाठली असताना बाजारात उत्साही वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे. पुढील महिन्यांत होणाऱ्या व्याजदर वाढीत थोडी कपात होईल असे संकेत महागाईच्या ताज्या आकडेवारीने दिले आहेत. युरोपमध्ये मात्र परिस्थिती तेवढी नियंत्रणात आलेली नाही. अशावेळी भारतीय भांडवली बाजारातील तेजी टिकणार का? हा कळीचा मुद्दा आहे. गेल्या सहा महिन्यांचे कंपन्यांचे निकाल पाहता कारखानदारी कंपन्यांचे नफ्याचे प्रमाण कमी झाले आहे. कारण इंधन, कच्चा माल आणि वाहतुकीच्या दरात झालेली वाढ. कंपन्यांच्या विक्रीत झालेली वाढ ही किमती वाढवल्यामुळे की वस्तूंची विक्री वाढल्यामुळे हे तपासून पहावे लागेल. भारताच्या निर्यातीत गेल्या दोन वर्षात पहिल्यांदाच झालेली ऑक्टोबर महिन्यांतील घट जागतिक बाजारातील मंदीचे संकेत देत आहे. भारतीय भांडवली बाजाराचे मूल्य जगात तुलनेने उच्च आहे. चीनमधील धोरण बदल, परदेशी गुंतवणूक तिकडे वळवू शकतो. मध्यवर्ती बँकांचे महागाई रोखण्याचे प्रयत्न फळाला आले, तर पुढील वर्ष दोन वर्षांत बाजार आणखी नवीन उच्चांकी पातळी गाठेल. मात्र या दरम्यानच्या काळात बाजार सावध भूमिका घेईल.

सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Markets now hoping some easing aggressive interest rate hikes by central banks around world over the past year tmb 01