जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी दुसऱ्या क्रमांकावरून थेट २३व्या क्रमांकावर घसरले आहेत. M3M हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२३ बुधवारी जारी करण्यात आली, ज्यामध्ये ही माहिती समोर आली आहे. अदाणींच्या संपत्तीत दरवर्षी ३५ टक्क्यांची घसरण होत असून, अदाणींची एकूण संपत्ती ५३ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. हुरुनच्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात अदाणींना २८ अब्ज डॉलर्स म्हणजेच दर आठवड्याला ३,००० कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. दुसरीकडे जागतिक श्रीमंतांच्या यादीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष मुकेश अंबानी हे जगातील अव्वल १० अब्जाधीशांच्या यादीत ८२ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह एकमेव भारतीय आहेत. संपत्तीत २० टक्के घट होऊनही त्यांनी सलग तिसऱ्या वर्षी सर्वात श्रीमंत आशियाई व्यक्ती होण्याचा किताब पटकावला आहे.
हिंडेनबर्गने २४ जानेवारीला अहवाल केला प्रसिद्ध
२४ जानेवारीला अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्गने एक अहवाल जारी केला, ज्यात अदाणी समूहाने मनी लॉन्ड्रिंगसाठी शेअर्समध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर अदाणी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स एकाच वेळी सुमारे ३,५०० रुपयांवरून थेट १,००० रुपयांपर्यंत घसरले. सध्या शेअरची किंमत १,८०० च्या आसपास आहे.
भारतीयांमध्ये सायरस पूनावाला तिसऱ्या क्रमांकावर
इतर भारतीय अब्जाधीशांच्या यादीत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सायरस पूनावाला २७ अब्ज डॉलर संपत्तीसह तिसरे आहेत. तर शिव नाडर अँड फॅमिली २६ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह चौथ्या क्रमांकावर, लक्ष्मी मित्तल २० अब्ज डॉलरसह पाचव्या स्थानावर आहेत. यानंतर एसपी हिंदुजा कुटुंब, दिलीप संघवी कुटुंब, राधाकिशन दमानी, कुमार मंगलम बिर्ला आणि उदय कोटक असे अनुक्रमे दहाव्या क्रमांकावर आहेत.
भारत हे जगातील तिसरे सर्वात मोठे अब्जाधीश राष्ट्र
भारतात १८७ अब्जाधीश राहत असून, हुरुन यादीनुसार भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा अब्जाधीश देश आहे. यावर्षी १६ नवीन भारतीय अब्जाधीश यादीत सामील झाले आहेत. त्याचबरोबर भारतीय वंशाच्या अब्जाधीशांची संख्या २१७ गेली आहे. हुरुनच्या मते, मुंबईत ६६ अब्जाधीश आहेत, त्यानंतर नवी दिल्ली (३९) आणि त्यानंतर बंगळुरू (२१) अब्जाधीश आहेत.
जागतिक क्रमवारीत मुकेश अंबानी ९व्या क्रमांकावर
जागतिक क्रमवारीत मुकेश अंबानी ९व्या क्रमांकावर आहेत. तर गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावरून थेट २३ व्या क्रमांकावर फेकले गेलेत, तर सायरस एस पूनावाला ४६ व्या क्रमांकावर आहे. शिव नाडर ५०व्या क्रमांकावर, तर लक्ष्मी एन मित्तल ७६व्या क्रमांकावर आहेत.