अयोध्येत (उत्तर प्रदेश) नव्याने बांधल्या जात असलेल्या मंदिरात सोमवारी (२२ जानेवारी) श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. संपूर्ण देशभर या सोहळ्याची चर्चा आहे. श्री रामजन्मभूमी ट्रस्टने सोमवारी अयोध्येत मोठ्या उत्सवाचं आयोजन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत या तिघांच्या प्रमुख उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडेल. दरम्यान, रामजन्मभूमी ट्रस्टने या उत्सवाचं हजारो लोकांना निमंत्रण पाठवलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री, अनेक संघटनांचे प्रमुख, राम मंदिरासाठी आंदोलन करणारे कारसेवक, खेळाडू, कलाकार आणि साधू-संतांसह तब्बल ७,००० हून अधिक लोकांना या सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, देशातल्या अनेक उद्योगपतींनाही या सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.
टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी, अदाणी समुहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्यासह अनेक दिग्गज उद्योगपतींना राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.
अंबानी कुटुंबातील सदस्यांमध्ये मुकेश अंबानी, त्यांची आई कोकीलाबेन, पत्नी नीता, मुलं आकाश आणि अनंत, सून श्लोका आणि होणारी सून राधिका मर्चंट यांना या सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. रतन टाटा यांच्यासह टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन आणि त्यांची पत्नी ललिता यांनादेखील या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.
हे ही वाचा >> बलात्कारप्रकरणी फरार आरोपी स्वामी नित्यानंद प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावणार? निमंत्रण मिळाल्याचा दावा करत म्हणाला…
हिंदुजा समुहाचे अशोक हिंदुजा, विप्रोचे अझीम प्रेमजी, बॉम्बे डाईंगचे नुस्ली वाडिया, टॉरंट समुहाचे सुधीर महेता, जीएमआर समुहाचे जी. एम. आर. राव आणि मोठे बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांनादेखील या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं आहे.