पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वकांशी बुलेट ट्रेन प्रकल्प वेगाने पुढे सरकताना दिसत आहे. रेल्वे मंत्रालयाने मंगळवारी (२ जुलै) एक व्हिडीओ शेअर करत या प्रकल्पातील महत्त्वाचे अपडेट्स जाहीर केले आहेत. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र, गुजरातसह दादरा नगर हवेली येथे १०० टक्के भूसंपादन पूर्ण झालं असून रेल्वेस्थानकं, रेल्वेचे पूल, बोगदे आणि कारशेडचं काम वेगाने चालू आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर मुंबई ते अहमदाबाद प्रवासाच्या कालावधीत कमालीची घट होणार आहे. दमण गंगा, पार, औरंगा, खरेडा, वेंगनिया, अंबिका, पूर्णा, मिंढोला, माही, मोहार, साबरमती, तापी व नर्मदेसह अनेक नद्यांवरील पूलांचं काम वेगाने चालू आहे. यापैकी काही पूल तयार आहेत, तर काही पूलांचे खांब उभे राहिल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
घणसोली, शिळफाटा, वलसाड येथील मोक्याच्या ठिकाणी बोगद्यांचं काम चालू असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या तिन्ही बोगद्यांचं खोदकाम पूर्ण झालेलं असून बोगद्यांमधील रुळ, वीज जोडणीसह इतर आवश्यक कामं हाती घेण्यात आली आहेत. मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनमधील मुख्य आकर्षणाचा भाग म्हणजे २१ किमी लांबीचा वांद्रे-कुर्ला संकुल ते शीळफाटा (डोंबिवली) बोगदा. २१ किमी बोगद्यापैकी ठाणे खाडीतील ७ किमी लांबीचा देशातील पहिला समुद्राखालील बोगदा असणार आहे.
वापी, बिलिमोरा, सुरत, भारूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, साबरमती येथे बुलेट ट्रेन स्थानकांचं बांधकाम चालू आहे. व्हिडीओमधील अर्ध्याहून अधिक बांधकाम झालेली स्थानकं पाहून अंदाज येईल ही स्थानकं अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहेत.
व्हिडीओच्या शेवटी सुरत आणि साबरमतीमधील बांधकाम चालू असलेले रोलिंग स्टॉक डेपो पाहायला मिळत आहेत. येथे हायस्पीड बुलेट ट्रेनची देखभाल केली जाईल. याच ठिकाणी बुलेट ट्रेन बांधणी व दुरुस्ती केली जाईल. हायस्पीड ट्रेन येथे अद्ययावत केल्या जातील.
हे ही वाचा >> देशांतर्गत उत्पादित खनिज तेलावरील विंडफॉल करात वाढ; टनामागे ३,२५० रुपयांवरून आता ६,००० रुपयांचा कर
१०० टक्के भूसंपादन पूर्ण
दरम्यान, या प्रकल्पासाठी महाराष्ट्र, गुजरात, दादरा नगर हवेली येथील १,३८९.४९ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१६ रोजी नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडची (एनएचएसआरसीएल) स्थापना केली. देशभरात बुलेट ट्रेनचं जाळं उभारण्यासाठी, प्रकल्पांची आखणी व अंमलबजावणी करण्याचे काम एनएचएसआरसीएलकडे सोपवण्यात आलं आहे. या कंपनीने देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम हाती घेतलं आहे.