गेल्या अनेक वर्षांत मुंबईत अब्जाधिशांची संख्या वाढली आहे. प्रामुख्याने गेल्या वर्षभरात मुंबईतील अब्जाधिशांच्या यादीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे चीनची राजधानी असलेल्या बीजिंगलाही मुंबईने मागे पाडले आहे. म्हणजेच, आशिया खंडात मुंबई ही अब्जाधिशांची राजधानी बनली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
हुरुन रिसर्चच्या २०२४ ची जागतिक श्रीमंतांची यादी समोर आली आहे. आशिया खंडात अव्वल क्रमांक मिळावलेली मुंबई जागतिक स्तरावरही तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर न्युयॉर्क, दुसऱ्या क्रमांकावर लंडन आणि मग तिसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे. चीनमध्ये ८१४ अब्जाधिश असून भारतात २७१ आहेत. तर, शहरांच्या तुलनेत विचार करायचा झाल्यास, मुंबईमध्ये ९२ अब्जाधिश असून बीजिंगमध्ये ९१ अब्जाधिश आहेत, असं हुरून रिसर्च २०२४ च्या जागतिक श्रीमंतांच्या यादीतून स्पष्ट होत आहे.
जागतिक स्तरावर गेल्या वर्षभरात २६ नव्या अब्जाधिशांची वाढ झाल्याने चीनची राजकीय आणि सांस्कृतिक राजधानी असलेलं बीजिंग शहर मागे पडले आहे. बीजिंगमधून १८ अब्जाधिश यादीतून बाहेर पडले आहेत.
हेही वाचा >> आघाडीच्या १० कंपन्यांपैकी पाच कंपन्यांना बाजारभांडवलात १.९७ लाख कोटींची घट
मुंबईत किती संपत्ती?
मुंबईची एकूण अब्जाधिशांची संपत्ती ४४५ डॉलर अब्ज इतकी आहे. जी मागील वर्षांच्या तुलनेत ४७ टक्क्यांनी वाढली आहे. तर बीजिंगची एकूण अब्जाधिशांची संपत्ती २६५ डॉलर अब्ज इतकी असून गेल्यावर्षीच्या तुलनेत २८ टक्क्यांनी कमी झाली आहे.
उर्जा आणि फार्मास्युटिकल्स क्षेत्रातील अब्जाधिशांची सर्वाधिक संख्या आहे. तर, मुकेश अंबांनीसारखया अब्जाधिशांच्या नफ्यात लक्षणीय वाढ होत आहे. रिअल इस्टेटमधील मंगल प्रभात लोढा आणि कुटुंबीय हे सर्वात जास्त संपत्ती मिळवणारे कुटुंब आहेत.
जागतिक श्रीमंतांच्या यादीत भारताची स्थिती काय?
अब्जाधिशांची संख्या वाढत असताना जागिक श्रीमंतांच्या यादीत भारतीय अब्जाधिसांच्या जागतिक क्रमवारीत थोडी घसरण झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वाढ झाल्याने त्यांनी दहावा क्रमांक टिकवून ठेवला आहे. तर, गौतम अदानी तर पंधराव्या स्थानावर आले आहेत. एचसीएलचे शिव नाडर आणि त्यांचं कुटुंबीय जागतिक श्रीमंतांच्या यादीत ३४ व्या स्थानावर घसरले आहेत. तर, सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला यांची एकूण संपत्ती ८२ डॉलर अब्ज इतकी असून ते ५५ स्थानावर आले आहेत.