सप्टेंबर महिना संपायला अवघे काहीच दिवस बाकी आहेत. पुढच्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून (१ ऑक्टोबर) म्युच्युअल फंड, डीमॅट अकाउंटसह पर्सनल फायनान्सशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. लाईव्ह मिंटने दिलेल्या वृत्तानुसार पुढच्या महिन्यापासून नवीन टीसीएस नियम परदेशी खर्चांवरही लागू होतील. तुम्ही जर तुमच्या म्युच्युअल फंड फोलियो डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंटमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत नॉमिनीचं (वारसदार) नाव समाविष्ट केलं नाही तर या अकाउंटसाठी १ ऑक्टोबरपासून वेगळे नियम असतील.
तुम्ही या नियमांच्या कक्षेत आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी नवे नियम तुम्हाला माहिती असायला हवेत. चला तर मग जाणून घेऊयात टीएसीएसशी संबंधित नवे नियम
१) म्युच्युअल फंड फोलिओत तुमच्या नॉमिनीचं (वारसदार) नाव जोडण्यासाठी ३० सप्टेंबरची मुदत दिली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत नॉमिनीचं नाव जोडलं नाही तर असे फोलिओ डेबिटसाठी गोठवले जातील.
२) १ ऑक्टोबर २०२३ पासून क्रेडिट कार्डवर ७ लाख रुपयांपेक्षा जास्त परदेशी खर्च २० टक्के टीसीएसच्या कक्षेत असेल. परंतु, वैद्यकीय किंवा शैक्षणिक गरजांसाठी हा खर्च केला असेल तर त्यावर ५ टक्के टीएसीएस लागू होईल. तर परदेशी शिक्षणासाठी कर्ज घेणाऱ्यांना ७ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कमेसाठी ०.५ टक्के टीसीएस दर लागू केला जाईल.
३) तुम्ही भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी योजना, पोस्ट ऑफिस डिपॉझिट आणि इतर लहान बचत योजनांतर्गत अकाउंट वापरत असाल तर तुम्हाला १ ऑक्टोबरपर्यंत तुमचा आधार क्रमांक सबमिट करावा लागेल. तुम्ही असं केलं नाही तर तुम्हाला स्मॉल सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये गुंतवणूक करता येणार नाही. पीपीएफ, एसएसवाय आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसह इतर लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पॅन आणि आधार नंबर देणं आवश्यक आहे. अर्थ मंत्रालयाने ३१ मार्च २०२३ रोजी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
४) तुमच्याकडे २००० रुपयांच्या नोटा असतील तर त्या ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बँकांमध्ये जमा करा. भारतीय रिझर्व्ह बँकेने या नोटा जमा करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.
हे ही वाचा >> Money Mantra: स्टार्टअपची व्याख्या, कर सवलती व अन्य फायदे
५) सेबीच्या नियमांनुसार पात्र ट्रेडिंग आणि डिमॅट खातेधारकांना नामांकन करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत नामांकन न केल्यास खातं गोठवण्याचा निर्णय २४ फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आला होता. खातं गोठवण्यात आल्यानंतर तुम्ही या खात्यातून व्यवहार करू शकणार नाही. त्यामुळे ३० सप्टेंबरआधी ट्रेडिंग आणि डीमॅट खातेधारकांनी नामांकन दाखल करणं गरजेचं आहे.