New TDS Rules Updates : केंद्र सरकारने गेल्या महिन्यात देशाचा आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सरकारने टॅक्सबाबत अनेक घोषणा केल्या होत्या. १ एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होत असल्यामुळे अर्थसंकल्पाद्वारे केलेल्या योजना या दिवसापासून लागू होतील. १ एप्रिलपासून टीडीएसचे नियम देखील बदलणार आहेत. टीडीएस नियमांमधील बदलांमुळे करदाते, गुंतवणूकदार, ज्येष्ठ नागरिक व कमिशन एजंटांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
टीडीएसमधील सूट वाढवण्यात आल्यामुळे गुंतवणूकदारांना डिव्हिडेंट इन्कम (लाभांश उत्पन्न) व म्युच्युअल फंडांद्वारे झालेल्या कमाईवर अधिक सूट मिळेल. अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये, सरकारने १ एप्रिलपासून शेअर्स व म्युच्युअल फंड युनिट्सद्वारे मिळणाऱ्या लाभांशावरील टीडीएस सूट मर्यादा ५,००० रुपयांवरून १०,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक टीडीएस सूट
ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारने व्याज उत्पन्नावरील टीडीएस सूट मर्यादा दुप्पट केली आहे. डिपॉझिट व रेकरिंग डिपॉझिटद्वारे ज्येष्ठ नागरिकांच्या मिळणाऱ्या व्याज उत्पन्नावर बँका फिक्स्ड टीडीएस कापून घेतात. १ एप्रिलपासून ज्या ज्येष्ठ नागरिकाचं आर्थिक वर्षातील एकूण व्याज उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तरच त्या एक लाखाच्या पुढील रकमेवरील टीडीएस कापून घेतला जाईल. याचाच अर्थ ज्या ज्येष्ठ नागरिकाचं वार्षिक व्याज उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी असेल त्यांच्या उत्पन्नावरील टीडीएस कापून घेतला जाणार नाही.
६० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांनाही आर्थिक दिलासा
दरम्यान, सरकारने ज्येष्ठ नागरिकांप्रमाणे ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी व्याज उत्पन्नावरील टीडीएस सूट मर्यादा वाढवली आहे. ज्या लोकांचं (६० वर्षांपेक्षा कमी वय असलेले) आर्थिक वर्षातील एकूण व्याज उत्पन्न ५०,००० रुपयांपेक्षा अधिक असेल तरच त्यांचा टीडीएस कापून घेतला जाईल. याचाच अर्थ या नागरिकांचं वार्षिक व्याज उत्पन्न ५० हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यांच्या उत्पन्नावरील टीडीएस कापून घेतला जाणार नाही.
लॉटरी, हॉर्स रेसिंग आणि गेमिंगवरील टीडीएसमध्ये बदल
लॉटरी, हॉर्स रेसिंग आणि गेमिंगवरील टीडीएस मर्यादेत सुधारणा करण्यात आली आहे. पूर्वी एका आर्थिक वर्षात १०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम जिंकली तर त्या रकमेवर टीडीएस लागू होत होता. मात्र, नवीन नियमांनुसार, आता केवळ एकाच व्यवहारात (single transaction) १०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम जिंकली तरच त्यांच्याकडून टीडीएस कापला जाईल. यामुळे लॉटरी, हॉर्स रेसिंग आणि गेमिंगद्वारे जिंकलेल्या छोट्या-छोट्या रकमांवर टीडीएसचा बोजा नसेल
विमा आणि ब्रोकरेज कमिशनवरील TDS मर्यादा वाढ
विमा कमिशन व ब्रोकरेज उत्पन्नावरील टीडीएस मर्यादा १५,००० रुपयांवरून २०,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच विमा व ब्रोकरेजच्या माध्यमातून मिळालेल्या २०,००० रुपयांपर्यंतच्या कमिशनवर टीडीएस कापला जाणार नाही.