पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यात भारताला UPI आघाडीवर मोठे यश मिळाले आहे. आता भारतीय UPI चा डंका फ्रान्समध्येही वाजणार आहे. पीएम नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात झालेल्या मोठ्या करारानंतर भारतीय यूपीआय फ्रान्समध्येही चालू शकणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आता भारतीय पर्यटकांना फ्रान्समध्ये भारतीय रुपयात पैसे वापरता येणार आहेत. UPI आघाडीवर भारताचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे यश आहे. तसेच भारतीय UPI लाँच करणारा फ्रान्स हा युरोपमधील पहिला देश ठरला आहे. परंतु याचा भारताची अर्थव्यवस्था आणि सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार आहे हे जाणून घेणार आहोत. पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी एवढं मोठं यश मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. संपूर्ण जगाच्या नजरा या करारावर खिळल्या होत्या. ज्याला आता अंतिम स्वरूप प्राप्त झाले आहे. IMF पासून अनेक जागतिक बँकांनी भारताच्या डिजिटल पेमेंट मोड UPI ची प्रशंसा केली आहे आणि जगाला भारताकडून शिकण्यास सांगितले आहे. तसेच UPI व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात फ्रान्स दौऱ्यात अनेक महत्त्वपूर्ण करार देखील केले जाणार आहेत.
UPI लाँच करणारा फ्रान्स हा पहिला युरोपीय देश ठरला
आता UPI संदर्भात भारत आणि फ्रान्समध्ये सर्वात मोठा करार झाला आहे. या करारामुळे UPI लाँच करणारा फ्रान्स हा पहिला युरोपिय देश बनला आहे. UPI च्या दृष्टिकोनातून २०२३ हे वर्ष खूप खास आहे. यंदा सिंगापूरच्या PayNow आणि UPI यांनीदेखील करार केला आहे, ज्यामुळे कोणत्याही देशातील वापरकर्ते क्रॉस बॉर्डर व्यवहारांसाठी UPI वापरू शकतात.
फ्रान्सच्या भारतीय UPI कराराचा काय फायदा होणार?
फ्रेंच आणि भारतीय UPI च्या मंजुरीमुळे त्या लोकांना फायदा होईल, जे भारतातून फिरण्यासाठी फ्रान्सला जातील. ते कोणत्याही त्रासाशिवाय आणि कोणत्याही अडचणीशिवाय चलनाची देवाणघेवाण न करता UPI द्वारे भारतात सहज पेमेंट करू शकतील. त्यामुळे देशात डिजिटल व्यवहारांची क्रेझ वाढेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल. देशातील लोक कमीत कमी रोख रक्कम वापरत आहेत. अशा परिस्थितीत देशात आणि परदेशात UPI सुरू झाल्यामुळे UPI व्यवहार वाढतील. आज लोक प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी UPI वापरतात. मग तो १० रुपयांचा चहा विकत घ्यायचा असो की ऑटोचे भाडे द्यायचे असो. त्याचबरोबर आता परदेशातही ही सुविधा सुरू झाल्याने भारतीय चलन आणि UPI आणखी मजबूत होणार आहेत. याबरोबरच भारताचा डंका आणि त्याची UPI पेमेंट पद्धत परदेशातही झळकणार आहे.
अशा पद्धतीने करू शकता वापर
पॅरिस किंवा आयफेल टॉवरला जाण्यासाठी भारतीय नागरिकांना आता तेथे चलन बदलण्याची गरज नाही. आता लोक तिथे जाऊन थेट UPI द्वारे भारतीय रुपयात पेमेंट करू शकतात. यामुळे चलन विनिमयाच्या त्रासातूनही सुटका होईल आणि UPI ला चालना मिळेल.
देशातील ८० टक्के पेमेंट UPI द्वारे केले जाते
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस भारतात वेगाने वाढत आहे आणि २०२६-२७ पर्यंत दररोज एक अब्ज व्यवहारांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार, देशातील ८० टक्के पेमेंट UPI द्वारे केले जात आहेत. भारतातील रिटेल डिजिटल पेमेंटच्या बाबतीत पुढील ३-४ वर्षांत UPI चा हिस्सा ९० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो.
भारतीय UPI ‘या’ देशांमध्ये सुरू झाले
सिंगापूरमध्येही आता लोक UPI द्वारे पेमेंट करू शकणार आहेत. सिंगापूरच्या Pay Now बरोबर UPI करार झाला आहे. तसेच नेपाळ आणि भूतान यांसारख्या देशांमध्ये UPI द्वारे पेमेंट आधीच केले जात आहे. फ्रान्समध्ये UPI सुरू केल्यानंतर लवकरच ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, हाँगकाँग, ओमान, कतार, UAE आणि UK यांसारख्या देशांमध्ये UPI द्वारे पेमेंट करता येईल. याशिवाय UPI पेमेंट पद्धत जी २० गटातील देशांचे नागरिक भारतात आल्यावर वापरू शकतात. भारतात आल्यावर काही आंतरराष्ट्रीय विमानतळांवर लोकांना UPI वापरण्याची सुविधा दिली जात आहे. यासह भारत डिजिटल पेमेंटमध्ये जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे.