केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गुरुवारी ऑइल इंडियाचा महारत्न श्रेणीत आणि ONGC विदेश लिमिटेडचा नवरत्न कंपन्यांच्या श्रेणीत समावेश केला आहे. सरकारने ऑइल इंडियाचा सुधारित श्रेणीत समावेश केल्यामुळे आता देशात १३ महारत्न कंपन्या झाल्या आहेत.तर CPSE च्या यादीत ONGC विदेश ही १४वी नवरत्न कंपनी ठरली आहे.नवीन स्थितीमुळे कंपन्यांना भारतात आणि परदेशात मोठ्या गुंतवणुकीबाबत निर्णय घेण्यास मदत होणार आहे. ऑइल इंडिया ही आधी नवरत्न कंपनी होती, तर ONGC विदेश ही मिनीरत्न CPSE होती. आता त्यांच्या श्रेणीत बदल करण्यात आला आहे. ऑइल इंडियाने २०२२-२३ या आर्थिक वर्षात ४१,०३९ कोटी रुपयांचा महसूल आणि ९,८५४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. तर दुसरीकडे ONGC Videsh Ltd ही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाद्वारे चालवली जाते. ONGC Videsh Ltd ला नवरत्न कंपनीचा दर्जा मिळाल्यानंतर अधिक स्वायत्तता मिळणार आहे. कंपनी संयुक्त उपक्रम स्थापन करण्याबरोबरच गुंतवणूक आणि आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम होणार आहे. ONGC Videsh Ltd ची वार्षिक उलाढाल ११,६७६ कोटी रुपये आहे. २०२२-२३ या वर्षात निव्वळ नफा १७०० कोटी झाला आहे. या सर्व कंपन्या सार्वजनिक क्षेत्रातील आहेत, म्हणजे केंद्र सरकारच्या मालकीच्या आहेत. ‘रत्न’ दर्जा आणि त्यानुसार श्रेणीवार रचना ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसाठीच केली गेली आहे. त्यामुळे आता नवरत्न, महारत्न आणि मिनीरत्न कंपन्या म्हणजे काय यासंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.
महारत्न कंपनी
महारत्न कंपनीची स्थापना भारत सरकारने २००९ मध्ये केली होती. ज्याचा उद्देश मोठ्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यास सक्षम करणे आणि जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून उदयास येणे हा आहे. सध्या १३ महारत्न कंपन्या आहेत. खरं तर महारत्नचा दर्जा मिळवण्यासाठी नवरत्नचा दर्जा मिळवावा लागतो. कंपनी भारतीय स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध असणे आवश्यक आहे. तसेच गेल्या तीन वर्षांतील करानंतरचा कंपनीचा सरासरी वार्षिक निव्वळ नफा ५००० कोटींपेक्षा जास्त असावा. तसेच गेल्या तीन वर्षांत सरासरी वार्षिक निव्वळ संपत्ती १५००० कोटींपेक्षा जास्त असावी आणि गेल्या तीन वर्षांतील सरासरी वार्षिक उलाढाल २५००० कोटींपेक्षा जास्त असावी. तसेच जागतिक स्तरावर लक्षणीय उपस्थिती आवश्यक असून, परदेशातही व्यवसाय केलेला असावा, अशाही काही अटी आहेत. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), कोल इंडिया लिमिटेड (CIL), गेल (इंडिया) लिमिटेड (GIAL),इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), एनटीपीसी लिमिटेड (NTPC), तेल आणि प्राकृतिक गॅस निगम लिमिटेड (ONGC), रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL), पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL), ऑयल इंडिया लिमिटेड( OIL) या कंपन्यांचा महारत्नमध्ये समावेश आहे.
नवरत्न कंपनी
१९९७ मध्ये भारतातील मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना सरकारने नवरत्नांच्या श्रेणीत आणले. त्यात जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करण्याची क्षमता असलेल्या सार्वजनिक कंपन्यांचा समावेश होता. देशातील कंपन्यांना बाजारपेठेत जागतिक दर्जा मिळावा, हाच नवरत्न कंपनीचा दर्जा देण्यामागचा उद्देश आहे. सध्या १४ कंपन्यांना नवरत्न दर्जा आहे. नवरत्न कंपनीचा दर्जा मिळवण्यासाठी आधी मिनीरत्नाचा दर्जा मिळवावा लागतो.
त्याच्या संचालक मंडळावर चार स्वतंत्र संचालक असणे आवश्यक आहे. व्याज भरल्यानंतरचा नफा कंपनीच्या नफ्यापेक्षा जास्त असावा. कंपनीची कामगिरी चांगली असावी, असेही काही निकष आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL), इंजिनीयर्स इंडिया लिमिटेड (EIL), हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL), महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL), नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO), एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड (NBCC), एनएमडीसी लिमिटेड (NMDCL), एनएलसी इंडिया लिमिटेड (NLCIL), पावर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड( PFC), राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड (RINL), ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड (RECL), शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ओएनजीसी विदेश लिमिटेड कंपन्यांचा समावेश आहे.
मिनीरत्न कंपनी
भारत सरकारने २००२ मध्ये मिनीरत्न कंपनी सुरू केली. मिनीरत्न कंपन्यांना संयुक्त उपक्रमांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी आहे आणि ते काही मर्यादेत परदेशी कार्यालयेदेखील उघडू शकतात, मिनीरत्न कंपन्यांची श्रेणी १ आणि श्रेणी २ या दोन श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. मिनीरत्न I CPSE श्रेणीमध्ये एकूण ६२ कंपन्यांचा समावेश आहे. मिनीरत्न II CPSE यादीमध्ये एकूण ११ नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
मिनीरत्न कंपनी श्रेणी १
मिनीरत्न श्रेणी १ कंपनी होण्यासाठी कंपनीने गेल्या तीन वर्षांपासून सतत नफा कमावलेला असावा आणि तीन वर्षांत एकदा ३० कोटींचा निव्वळ नफा कमावलेला असावा. अशा पद्धतीने या निकषांची पूर्तता करणारी कोणतीही कंपनी मिनीरत्न श्रेणी १ अंतर्गत येऊ शकते.
मिनीरत्न कंपनी श्रेणी २
भारत सरकारची मिनीरत्न श्रेणी २ कंपनी अशा कंपनीमध्ये समाविष्ट आहे की, कंपनीने गेल्या तीन वर्षांपासून सतत नफा कमावला आहे आणि तिची निव्वळ संपत्ती सकारात्मक आहे. अशा पद्धतीने कंपनी मिनीरत्न श्रेणी २ मध्ये सामील होऊ शकते.