भारतातील पहिली एअरलाइन्स ‘एअर इंडिया’, भारतातील पहिले स्वदेशी लक्झरी हॉटेल ‘ताज हॉटेल’, भारतात तयार होणारी पहिली स्वदेशी कार ‘टाटा सिएरा’, भारतातील स्वदेशी पार्ट्सने पूर्णपणे भारतात बनवलेली पहिली स्वदेशी कार ‘टाटा इंडिका’, भारतातील पहिली सर्वात सुरक्षित कार ‘टाटा नेक्सॉन’ यादी वाचताना तुम्हाला कंटाळा येईल, पण टाटा समूहाने भारताला काय दिले आहे, याची यादी संपता संपणार नाही.
टाटा समूहाची दुसरी ओळख ‘ट्रस्ट’ या शब्दावरून आहे. कदाचित टाटा समूह चालवण्याचे कामही ‘ट्रस्ट’ म्हणजेच टाटा ट्रस्टद्वारे केले जाते, याचे हे एक कारण असावे. टाटा समूहाने भारताला केवळ व्यवसायाच्या क्षेत्रात प्रसिद्धी मिळवून दिली असे नव्हे, तर भारताला आधुनिक राज्य बनवणाऱ्या अनेक संस्था टाटा समूहाने स्थापन केल्या होत्या. यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल या संस्थांचा समावेश आहे. दुसरीकडे सम्राट अशोकाची राजधानी शोधण्यासाठी पुरातत्त्व खात्याने पाटलीपुत्रात काम सुरू केले, तेव्हाही टाटा समूहाचे सर रतन टाटा यांनी पैसे देऊन भारताच्या इतिहासाची ओळख करून दिली.
आज टाटा समूह हा भारतातील सर्वात मोठा व्यवसाय समूह आहे. मिठापासून विमानापर्यंत, ट्रक आणि बसपासून कारपर्यंत, स्वयंपाकघरातील मसाल्यापासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत आणि मनगटावरच्या घड्याळांपासून ते आयटी कंपन्यांपर्यंत, दागिने ते कपड्यांपर्यंत टाटा समूहाचे अस्तित्वात आहे.
टाटाची सुरुवात फक्त २१,००० रुपयांपासून झाली
टाटा समूहाच्या सुरुवातीची माहिती फार कमी लोकांना आहे. गुजरातमधील नवसारी येथे जन्मलेल्या जमशेदजी टाटा यांनी १८६८ मध्ये एक ट्रेडिंग कंपनी म्हणून टाटा समूहाची स्थापना केली. तेव्हा त्यांचे वय फक्त २९ वर्षे होते आणि भांडवली गुंतवणूक फक्त २१,००० रुपये होती, पण त्या काळात ही रक्कम खूप मोठी होती.
टाटांची कंपनी जहाजातून व्यापार करीत असे. पण लवकरच म्हणजे १८६९ मध्ये ते कापड व्यवसायात उतरले. त्यांनी मुंबई (तेव्हाची बॉम्बे) मध्ये बंद पडलेली तेल गिरणी विकत घेतली आणि तिचे रूपांतर कापड गिरणीत केले. कदाचित मुंबईत या बिझनेस हाऊसची पायाभरणी केल्यामुळे टाटा ग्रुपच्या मुख्यालयाचे नाव बॉम्बे हाऊस पडले असावे.
ताज हॉटेलची गोष्ट
जमशेदजी टाटा एकदा मुंबईतील वॉटसन हॉटेलमध्ये गेले होते, जिथे त्यांना वांशिक भेदभावाचा सामना करावा लागला होता. मग काय, त्यांनी आलिशान हॉटेल बांधण्याचा निर्णय घेतला आणि १९०२ मध्ये मुंबईत ताज हॉटेल सर्वांदेखत उभे राहिले, ही कथा तुम्ही आधी कुठेतरी वाचली किंवा ऐकली असेलच. काही वर्षांपूर्वी ‘ताज’ला जगातील सर्वात आलिशान हॉटेल ब्रँडची ओळख मिळाली. विशेष म्हणजे जमशेदजी टाटा यांची सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून निवड करण्यात आली.
टाटा स्टीलने नवा दर्जा दिला
१९०७ मध्ये जमशेदपूरमध्ये टाटा स्टीलची स्थापना झाल्यावर टाटा समूहाला मोठ्या औद्योगिक घराण्याचा दर्जा मिळाला. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्या नावावरून शहराचे नाव ठेवण्यात आले. हे त्यांचे एकमेव स्वप्न होते, परंतु त्यांचा मृत्यू १९०४ मध्येच झाला आणि शेवटी दोराबजी टाटांनी हे स्वप्न पूर्ण केले. टाटा स्टीलशी संबंधित एक किस्से दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित आहे. त्या काळात जेव्हा मित्र देशांना शस्त्रे आणि लढाऊ वाहनांची कमतरता भासू लागली, तेव्हा टाटा समूहाने ११० प्रकारचे स्टील बनवले आणि पुरवले. एवढेच नाही तर टाटा समूहाने १९४१ मध्ये एक विशेष चिलखती वाहन तयार केले, ज्यात फोर्ड व्ही ८ इंजिन बसवले होते. याला ‘इंडियन पॅटर्न कॅरियर’ असे नाव दिले गेले, परंतु हे वाहन ‘टाटानगर आर्मर्ड व्हेईकल’ म्हणून लोकप्रिय झाले.
जेआरडी टाटा आणि एअर इंडिया
एअर इंडिया हा टाटा समूहाच्या मुकुटातील कोहिनूर हिरा आहे. जेआरडी टाटा हे भारतातील पहिले व्यावसायिक पायलट ठरले. त्यांनीच १९३२ मध्ये टाटा एअरलाइन्स सुरू केली, जी नंतर एअर इंडिया बनली. अलीकडेच सरकारने एअर इंडियाचे खासगीकरण करून ती टाटांना परत दिली, तेव्हा सर्वसामान्यांनीही त्याचे स्वागत केले. जेआरडी टाटा यांना त्यांच्या उद्योगातील योगदानाबद्दल भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
TCS जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी
टाटा समूहाची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही जगातील दुसरी सर्वात मौल्यवान IT कंपनी आहे. रोजगार उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत ही जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या ६ लाखांहून अधिक आहे. ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजार मूल्यांकन कंपनी आहे.
९ लाख हातांना काम अन् भरपूर ब्रँड्स
सध्याचा काळ पाहिला तर टाटा समूहाकडे अनेक ब्रँड्स आहेत. टाटा समूह जगभरात ९ लाखांहून अधिक लोकांना रोजगार पुरवतो. तसेच त्याच्या ब्रँड यादीमध्ये सामान्य घरांमध्ये वापरल्या जाणार्या ब्रँडपासून ते लक्झरी ब्रँडपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे.
टाटाचे लोकप्रिय ब्रँड
टाटा सॉल्ट, टाटा टी, टाटा संपन्न, टेटली, हिमालयन वॉटर, टाटा कॉफी, स्टारबक्स, टायटन, टायटन आयप्लस, फास्ट्रॅक, तनिष्क, एअर इंडिया, ताज हॉटेल्स, ताज विवांता, टाटा न्यू, बिगबास्केट, टाटा १ एमजी, टाटा मोटार्स, टाटा एआयजी, टाटा कॅपिटल, क्रोमा असे टाटा समूहाचे अनेक ब्रँड लोकप्रिय आहेत.