Pakistan Stock Exchange Crash : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर परस्पर आयात शुल्क लागू केल्यानंतर अनेक देशांमधील शेअर बाजार कोसळले आहेत. ७ एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजार सव्वातीन हजार अंकांनी कोसळला. त्यामुळे गुंतवणूकदारांना तब्बल १४ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. मात्र, पाकिस्तानमधील गुंतवणूकदारांचं याहून अधिक नुकसान झालं आहे. पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजमधील (पीएसएक्स) बेंचमार्क केएसई-१०० निर्देशांकात सोमवारी ८,६०० अंकांची घसरण झाली आहे. ही घसरगुंडी थांबवण्यासाठी एक तासासाठी व्यवहार थांबवण्यात आले होते.
अनेक तज्ज्ञांनी शेअर बाजारातील घसरणीसाठी जागतिक मंदी कारणीभूत असल्याचं मत नोंदवलं आहे. दरम्यान, पाकिस्तानी शेअर बाजाराची घसरगुंडी पाहून व्यापार एक तासासाठी थांबवण्यात आला होता. एक तासाच्या कूलिंग पीरियडचाही बाजारावर काही चांगला परिणाम झाला नाही. कूलिंग पीरियडनंतर व्यापार पुन्हा सुरू करण्यात आला. त्यानंतरही पीएसएक्सची घुसरगुंडी थांबली नाही. पीएसएक्स निर्देशांक आणखी दोन हजार अंकांनी घसरला. अखेर पीएसएक्स निर्देशांक १,१४,९०९.४८ अंकांवर बंद झाला.
पाकिस्तानमधील गुंतवणूकदार चिंतेत
आरिफ हबीर सिक्योरिटीजच्या आर्थिक विश्लेषक उज्मा खान म्हणाल्या, “ऑटोमॅटिक सर्किट ब्रेकर्स हे पॅनिक सेलिंग रोखण्यासाठी आणि बाजारातील अस्थिरतेच्या वेळी गुंतवणूकदारांना पुनर्मूल्यांकन करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. पीएसएक्समधील गुंतवणूकदारांना अमेरिकेने लावलेले आयात शुल्क व इतर जागतिक अर्थव्यवस्थांकडून येणाऱ्या प्रत्युत्तराची चिंता आहे.
दिवसभरात ८,६८७.६९ अंकांची घसरण
पाकिस्तानचा बेंचमार्क केएसई-१०० निर्देशांक सकाळी ११.५८ वाजेपर्यंत ६,२८७ अंकांनी (५.२९ टक्के) घसरला होता. त्यानंतर व्यवहार थांबवण्यात आले. त्यानंतर एका तासाने बाजार पुन्हा सुरू झल्यानंतर आणखी अडीच हजार अंकांची घसरण झाली. दिवसभरात निर्देशांक ८,६८७.६९ अंकांनी (७.३१ टक्के) गडगडला. दुपारी एक वाजता निर्देशांक १,१०,१०३.९७ अंकांवर होता.
पाकिस्तानमधील आघाडीचं दैनिक डॉनच्या अहवालानुसार पीएसएक्समध्ये इतकी मोठी घसरण यापूर्वी १९ डिसेंबर २०२४ रोजी झाली होती. त्यावेळी देशातील राजकीय अस्थिरता आणि अमेरिकेने पाकिस्ताननमधील कंपन्यांवर त्यांच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी संबंधित निर्बंध लादल्यामुळे केएसई-१०० निर्देशांक ४,७९५.३१ अकांनी घसरला होता.