पेटीएम पेमेंट्स बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर कंपनी अनेक संकटांचा सामना करत आहे. अशातच कंपनीने त्यांचे वेगवेगळे विभाग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्या त्या विभागांमधील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं जात आहे. तर बहुसंख्य कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक ‘स्वेच्छेने राजीनामा’ देण्यास सांगितलं आहे. त्याचबरोबर काही कर्मचाऱ्यांना त्यांचे जॉयनिंग आणि रिटेन्शन बोनस परत करण्यास सांगितल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलं आहे.
कामावरून काढून टाकण्यात आलेल्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं की, “मी त्या मीटिंगमध्ये (जिथे एचआर विभागातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत असल्याचा संदेश दिला) अक्षरशः रडायला सुरुवात केली. मी त्यांना (वरिष्ठांना आणि एचआर) सांगितलं की मी कमी पगारावर आणि खालच्या पदावरही काम करायला तयार आहे. परंतु, त्यांनी काही ऐकलं नाही.” एचआर विभागातील अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी कंपनीतील काही कर्मचाऱ्यांची मीटिंग घेऊन त्यांना सांगितलं की ते काम करत असलेला विभाग कंपनी बंद करत आहे.
दुसरा एक कर्मचारी म्हणाला, “कंपनीतील कर्मचऱ्यांना कामावरून काढताना कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाहीये. एचआर आमच्याबरोबर जी मीटिंगमधून किंवा गूगल मीट कॉल करतात त्याला केवळ ‘कनेक्ट’ अथवा ‘चर्चा’ असं लेबल लवलं जात आहे. कोणत्याही प्रकारचे औपचारिक किंवा अधिकृत दस्तऐवजीकरण केलं जात नाहीये.”
जॉयनिंग बोनस परत मागितला
काही कर्मचाऱ्यांना कंपनीने त्यांचा जॉयनिंग बोनस आणि रिटेन्शन बोनस परत करण्यास सांगितलं आहे. यावर काही कर्मचाऱ्यांनी आक्षेप नोंदवल्यावर एचआर विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की, “तुम्ही कंपनीत जॉईन होताना ऑफर लेटरवर सही केली होती, त्यावर नमूद केलं आहे की, १८ महिन्यांच्या आत तुम्ही नोकरी सोडली तर जॉयनिंग बोनस, रिटेन्शन बोनस तुमच्याकडून परत बसलू केला जाईल.”
हे ही वाचा >> LIC पेक्षाही मोठा IPO येतोय; ह्युंदाई मोटर इंडिया २५ हजार कोटी रुपये उभारणार
कंपनीने दिलं स्पष्टीकरण
दरम्यान, कर्मचाऱ्यांनी केलेले आरोप कंपनीने फेटाळले आहेत. कंपनीने म्हटलं आहे की “आम्ही कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती केलेली नाही. आमच्या एचआर विभागातील अधिकाऱ्यांनी अधिकृत चॅनेलद्वारे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना कामावरून कमी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच आम्ही कंपनीचे सर्व नियम पाळत आहोत. कर्मचाऱ्यांना कामावर घेताना जे नियम होते ते पाळले जात आहेत. आमच्या कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील वाटचालीत त्यांना मदत होईल असेही प्रयत्न केले जात आहेत. जसे की, आम्ही आऊटप्लेसमेंट आणि बोनसची प्रक्रिया राबवत आहोत. त्यांच्या अंतिम सेटलमेंटमध्ये त्रास होणार नाही याची काळजी घेत आहोत.”