Paytm Share Price: पेटीएमची पालक कंपनी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन्सच्या शेअरच्या दरात शुक्रवारी (३० ऑगस्ट) १२ टक्क्यांची मोठी वाढ पाहायला मिळाली. काल पेटीएमच्या शेअर्सची किंमत ५५८ रुपये होती. आज गुंतवणुकदारांनी शेअर्सच्या खरेदीचा सपाटा सुरू ठेवल्यामुळे सुरुवातीला शेअरच्या किंमतीमध्ये १४ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. ६३१ वर गेलेला शेअरचा दर बाजार बंद होताना ६२४.९० वर आला. आज दिवसभरात शेअरच्या किंमतीमध्ये ७०.४० रुपयांची वाढ झाली. पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये डाउनस्ट्रीम गुंतवणुकीला केंद्र सरकारने परवानगी दिल्याची घोषणा वन ९७ कम्युनिकेशन्स कंपनीने गुरूवारी केली होती. तसेच पेमेंट ॲग्रीगेटर म्हणून पेटीएम पुन्हा एकदा अर्ज करणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.
तत्पूर्वी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आले असताना ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये बोलताना त्यांनी क्युआर कोड आणि साऊंडबॉक्स तंत्रज्ञानाचे कौतुक केले. या तंत्रज्ञानामुळे भारतात फिनटेक क्रांती झाली, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या या विधानाचा व्हिडीओ पेटीएमने एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले, साऊंडबॉक्स आणि क्युआर कोड पेमेंटची स्तुती केल्याबद्दल धन्यवाद. या तंत्रज्ञानामुळे व्यापारी आणि ग्राहक यांच्यामध्ये मोबाइल पेमेंटबद्दल विश्वास निर्माण झाला. देशाच्या कानाकोपऱ्यात हे तंत्रज्ञान स्वीकारले गेले. ज्याची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली.
हे वाचा >> Sensex ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, पडझडीनंतर गाठला उच्चांक; निफ्टीचीही सर्वोत्तम कामगिरी!
याआधी नोव्हेंबर २०२२ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएमचा पेमेंट ॲग्रीगेटर म्हणून परवाना मिळविण्याचा अर्ज फेटाळून लावला होता. तसेच थेट परकीय गुंतवणूक नियमावलीच्या आधारावर प्रेस नोट ३ चे पालन करत पुन्हा एकदा अर्ज करण्यास पेटीएमला सांगण्यात आले होते. भारतातीय भूभागाला लागून असलेल्या देशाची एखाद्या कंपनीत थेट गुंतवणूक होणार असले तर त्याआधी त्या कंपनीला रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागते. जेव्हा पेटीएमचा अर्ज फेटाळला गेला होता, तेव्हा चीनचा अलीबाबा समूह हा पेटीएमचा सर्वात मोठा भागीदार होता.
तीन महिन्यात पटीएमच्या शेअरमध्ये ६५ टक्क्यांची वाढ
मागच्या सहा महिन्यात पेटीएमचा शेअरमध्ये ५३ टक्के तर तीन महिन्यात ६५ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. कंपनीचे मार्केट कॅप आता ३९,६०० कोटींवर पोहोचले आहे. कंपनीमध्ये आता १०० टक्के सामान्य भागधारकांची भागीदारी आहे.