EPFO to introduce UPI: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) डिजिटल प्रणाली आत्मसात करत भविष्य निर्वाह निधीशी संबंधित अनेक कामे सोपी केली आहेत. आता नव्या बदलानुसार पीएफचे पैसे काढणे आणखी सोपे होणार आहे. यापुढे युपीआयद्वारे अतिशय सोप्या आणि वेगवान पद्धतीने पैसे काढता येणार आहेत. या नव्या बदलाच्या माध्यमातून पीएफ व्यवहारांसाठी लागणारा वेळ वाचणार असल्याचे कामगार आणि रोजगार विभागाच्या सचिव सुमिता दावरा यांनी सांगितले.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सुमिता दावरा म्हणाल्या की, युपीआय प्रणालीला आत्मसात करणे, ही आमच्यासमोरचे पुढचे महत्त्वाचे काम आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून याबाबतचा प्रस्ताव आम्हाला मिळाला होता. ईपीएफओमध्ये युपीआय अंतर्भूत करण्याचा प्रस्ताव मिळाल्यानंतर याबाबत आम्ही नियोजन करत आहोत.
ईपीएफओ आता केंद्रीय डेटाबेस तयार करत असून त्यानंतर आवश्यक त्या चाचण्या करण्यात येतील. मे महिन्याच्या अखेरिस युपीआयद्वारे ईपीएफओमधून पैसे काढता येतील, असेही त्या म्हणाल्या.
या माध्यमातून पीएफ खातेधारक युपीआयमध्येच त्यांचे खाते तपासू शकतील आणि तिथून क्लेमही करू शकतील. याशिवाय क्लेमला मंजूरी देण्याचीही प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे. जेणेकरून खातेधारकाला जलदगतीने पैसे मिळू शकतील. केंद्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी दोन ते तीन आठवड्यांचा वेळ लागेल, त्यानंतर युपीआयद्वारे पैसे काढण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती सुमिता दावरा यांनी दिली.
सध्या ईपीएफओ खातेधारकांना क्लेमचा दावा करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागायचा. जर युपीआयशी पीएफ खाते जोडले गेले तर काही तासांत किंवा मिनिटांमध्ये पीएफमधील पैसे काढणे सोपे होणार आहे. या नव्या सुविधेमुळे भविष्य निर्वाह निधीमध्येही युपीआयप्रमाणे नवी क्रांती होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
युपीआयमधून पैसे काढण्याशिवाय पैशांच्या वापरासंबंधीही नवे नियमही करण्यात येत आहेत. पीएफच्या पैशांच्या वापराची व्याप्ती वाढविण्यात येत आहे. आता पीएफ खातेधारक सध्या असलेल्या आजारपणाच्या तरतुदींशिवाय गृह, शिक्षण आणि लग्नासाठी पैसे काढू शकतात, असेही सुचिता डावरा यांनी सांगितले.
किती रक्कम काढता येणार?
दावरा पुढे म्हणाल्या की, सध्या ईपीएफओचे ७.५ कोटी सक्रिय सदस्य आहेत. जे त्यांचे पीएफ खाते चालवत असून त्यात योगदान देत आहेत. युपीआयच्या माध्यमातून यापुढे खातेधारक एक लाखांपर्यंतची रक्कम लगेच काढू शकतील, असेही त्यांनी म्हटले.