Investment Tips : बँका, शेअर बाजार, म्युच्युल फंड किंवा इतर कुठेही आर्थिक गुंतवणूक करताना काळजी घेण्याची गरज असते. कारण त्यात आर्थिक जोखीम असते आणि आपल्या चुकीच्या निर्णयामुळे नुकसान होऊ शकते. बाजारातील चढ-उतार, फसवणूक किंवा चुकीची माहिती यामुळे आपल्याला आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो. त्यामुळे गुंतवणूक करताना काळजीपूर्वक संशोधन केल्याने, माहिती गोळा करून गुंतवणुकीबाबतचे निर्णय घेतल्याने हे धोके कमी होतात.

प्रत्येक गुंतवणूकदाराची उद्दिष्ट्ये (अल्पकालीन नफा, त्वरित नफा, दीर्घकालीन संपत्ती, सुरक्षित गुंतवणूक) वेगवेगळी असतात. योग्य नियोजनाशिवाय ती उद्दीष्ट्ये साध्य होत नाहीत. त्यामुळे गुंतवणूक करताना खूप काळजी घ्यावी लागते. आज आम्ही तुम्हाला गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी यासंबंधीच्या टिप्स देणार आहोत.

१. तुमचं लक्ष्य निश्चित करा

तुम्ही गुंतवणूक का करत आहात? निवृत्तीचा विचार करून, मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, संपत्ती वाढवण्यासाठी की इतर कुठल्या कारणासाठी गुंतवणूक करताय ते आधी ठरवा. किती काळासाठी तुम्हाला गुंतवणूक करायची आहे ते देखील ठरवा. गुंतवलेले पैसे तुम्हाला परत कधी हवे आहेत ते निश्चित असलं पाहिजे.

२. जोखीम समजून घ्या

प्रत्येक गुंतवणूक प्रकारात कुठली ना कुठली जोखीम असतेच. तुम्ही किती जोखीम घेऊ शकता त्यानुसार तुमचा गुंतवणुकीचा पर्याय निवडा. काही लोक जोखीम घ्यायला घाबरतात. त्यांनी कमी परतावा देणाऱ्या पण सुरक्षित गुंतवणूक पर्यायांचा स्वीकार करायला हवा. तर काही लोक जोखीम घेण्यास घाबरत नाहीत ते त्वरित व अधिक परतावा देणाऱ्या योजनांकडे, गुंतवणुकीच्या पर्यायांकडे वळतात.

३. गुंतवणूक पर्यायांचा अभ्यास करा

स्टॉक्स, म्युच्युअल फंड्स, सोने, रियल इस्टेट (बांधकाम व्यवसाय) असे गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. प्रत्येक पर्यायात वेगवेगळे फायदे-तोटे आहेत. त्यांचा अभ्यास करावा. तसेच प्रत्येक ठिकाणी परतावा देखील वेगवेगळा आहे. त्या आधारावर तुमचा निर्णय घ्या.

४. गुंतवणुकीत वैविध्य असावं (Diversification)

एकाच गुंतवणूक पर्यायावर अवलंबून राहू नका. वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक करणं उत्तम. जेणेकरून गुंतवणुकीचं एखादं क्षेत्र तोट्यात असलं तरी तुम्ही इतर माध्यमातून मिळणाऱ्या नफ्यामुळे नुकसानापासून दूर राहता.

५. लिक्विडिटी

लिक्विडिटी म्हणजे तुम्हाला जेव्हा पैशांची गरज भासेल तेव्हा तुम्ही तुमचे गुंतवलेले पैसे किती लवकर रोखीत रुपांतरीत करू शकता त्याचा विचार करा. शेअर्स, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवलेले पैसे खूप कमी वेळात रोखीत बदलता येतात. मात्र रिअल इस्टेटमध्ये गुंतवलेले पैसे लगेच रोखीत बदलता येत नाहीत. या क्षेत्रात गुंतवलेले पैसे त्वरित रोखीत बदलण्याच्या प्रयत्न केल्यास मोठा आर्थिक फटका सहन करावा लागू शकतो.

६. अभ्यास महत्त्वाचा

तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला बाजाराच्या स्थितीची माहिती असायला हवी. शेअर बाजारात गुंतवणूक करणं अवघड वाटत असेल तर तुमच्यासमोर म्युच्युअल फंडांचा पर्याय आहे. तर सोने, चांदी व रिअल इस्टेट हा गुंतवणुकीचा पारंपरिक पर्याय आहे. या क्षेत्रात स्थिरता आहे.

७. आर्थिक नियोजन करणं आवश्यक

गुंतवणूक करण्याआधी आर्थिक नियोजन करणं आवश्यक आहे. यामध्ये तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असणं आवश्यक आहे. कुठल्याही आपत्कालीन स्थितीत खर्च करण्यासाठी तुमच्याकडे रोख पैसे असणं आवश्यक आहे.

८. दूरचा विचार करून पैसे गुंतवा

कुठल्याही क्षेत्रात जितका जास्त काळ तुम्ही पैसे गुंतवून ठेवाल तितका नफा मिळतो. त्यामुळे दूरचा विचार करून पैसे गुंतवा.