वसंत कुलकर्णी

संपत्ती निर्मितीची दशकपूर्ती केलेल्या मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाची ही शिफारस. या फंडाने सुरुवातीपासून म्हणजे फेब्रुवारी २०१४ पासून २५.४५ टक्के तर मागील दहा वर्षांत २१.७८ टक्के परतावा दिला आहे. याचाच अर्थ फेब्रुवारी २०१४ पासून गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदरांचे पैसे दर अडीच वर्षांत दुप्पट तर मागील दहा वर्षांपासून (ऑक्टोबर २०१४ पासून) गुंतवणूक करणाऱ्याचे पैसे साडेतीन वर्षांत दुप्पट झाले आहेत. सर्वाधिक वेगाने संपत्ती निर्माण करणाऱ्या पहिल्या पाच फंडांत या फंडाची गणना होते. मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाच्या एनएफओमध्ये १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे आजचे बाजार मूल्य १० लाखांहून अधिक झाले आहे. मिडकॅप फंडांना ६५ टक्के मालमत्ता बाजार भांडवलानुसार (मार्केटकॅप) आघाडीच्या म्हणजेच १०१ ते २५० क्रमांकात असलेल्या कंपन्यांत गुंतवावे लागतात. अनेक उद्योग व्यवसायांत गुंतवणुकीच्या संधी केवळ मिडकॅपमध्येच उपलब्ध आहेत. ही उद्योग क्षेत्रे लार्जकॅप कंपन्यांमध्ये उपलब्ध नाहीत उदा. कृषी, स्थावर मालमत्ता विकास, वाहन पूरक उत्पादने, रुग्णालये, बहुपडदा सिनेमागृहे (मल्टीप्लेक्स), संरक्षण उत्पादन, औद्योगिक उत्पादने, औद्योगिक वापराचे जिन्नस वगैरे उद्योग केवळ मिडकॅपमध्येच उपलब्ध आहेत. मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाला सुरुवात होऊन दहा वर्षे झाली असून ऑगस्टअखेरीस या फंडाची एकूण मालमत्ता १५,९६४ कोटी रुपये होती. फंडाच्या ‘रेग्युलर प्लान’चा व्यवस्थापन खर्च १.६५ टक्के आहे. योजनेचा मानदंड ‘निफ्टी मिडकॅप १५० टीआरआय’ आहे. निकेत शहा आणि राकेश शेट्टी या योजनेचे नियुक्त निधी व्यवस्थापक आहेत.

भारतीय शेअर बाजारातील मिडकॅप कंपन्यांनी मागील वर्षभरात (ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४) दरम्यान जोरदार कामगिरी केली आहे. भारतातील मिडकॅप कंपन्यांचे बाजार भांडवल साधारणपणे ५ ते २० हजार कोटी दरम्यान असते. मागील वर्षभराचा विचार केल्यास सर्वाधिक परतावा स्मॉलकॅप फंडांनी दिला असून त्या खालोखाल मिडकॅप निर्देशांकाची कामगिरी आहे आणि सर्वात कमी परतावा लार्जकॅप निर्देशांकांनी दिला आहे. मिडकॅप कंपन्यांची व्यवसाय वाढीची क्षमता आणि गुंतवणूकदारांना लार्जकॅप गुंतवणुकीच्या तुलनेत जास्त परतावा मिळणे यासारख्या घटकांनी प्रभावित होऊन अनेक गुंतवणूकदार स्मॉलकॅप, मिडकॅप आणि लार्ज ॲण्ड मिडकॅप फंडात गुंतवणूक करीत आहेत. करोनापश्चात भारताच्या मजबूत आर्थिक वृद्धीदरामुळे मिडकॅप कंपन्यांना लक्षणीय फायदा झाला आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये वाढलेली सरकारी गुंतवणूक, विविध उत्पादने आणि सेवांची वाढती मागणी, करोनापश्चात बदललेल्या ग्राहकांच्या गरजा, ग्राहकांच्या चैनीसाठी उपलब्ध (डिस्पोजेबल) उत्पन्नात झालेली वाढ यांसारख्या अनेक कारणांमुळे मिडकॅप कंपन्यांच्या वृद्धीदरात वाढ झाली आहे नवगुंतवणूकदारांची वाढ आणि नियोजनबद्ध गुंतवणूक योजनांचा (एसआयपी) व्यापक अवलंब हे मिडकॅप कंपन्यांच्या तेजीमागील प्रमुख कारण आहे. हे घटक काही मिडकॅप म्युच्युअल फंडांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी कारण ठरले आहेत. विशेषत: गेल्या पाच वर्षांमध्ये, असंख्य गुंतवणूकदारांना तुलनेने कमी कालावधीत मोठ्या संपत्तीची निर्मिती करण्यास सक्षम केले असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा >>>कृषिधोरण बदलांची क्षेपणास्त्रे ‘बूमरॅंग’ होणार?

म्युच्युअल फंड पोर्टफ़ोलिओ सतत बदलत असतात. या बदलांचा मागोवा घेणे आव्हानात्मक असते. गुंतवणूकदार विविध कारणांनी विविध फंडांकडे आकर्षित होतात. एक गैरसमज असा आहे की, न्यू फंड ऑफरमध्ये गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांच्या वैयक्तिक पोर्टफोलिओमध्ये वैविध्य येते. तथापि अनेक म्युच्युअल फंड एकाच कंपनीत गुंतवणूक करतात (रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक). विशेषतः एकाच फंड गटात पोर्टफोलिओचा बराचसा भाग समान असतो. म्युच्युअल फंड पोर्टफोलिओचा मागोवा घेण्यासाठी ‘पोर्टफोलिओ ओव्हरलॅप टूल’ तुमच्या पोर्टफोलिओचे स्पष्ट चित्र प्रदान करून एकाहून अधिक फंडात असलेल्या समान कंपन्यांचे प्रमाण ओळखण्यास मदत करतात. मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड हा मिडकॅप फंड गटात सर्वात कमी कंपन्यांत गुंतवणूक करणारा फंड आहे. प्रत्येक कंपनीत गुंतवणूक जरी जास्त असली, तरी कठोर जोखीम नियंत्रणामुळे जोखीम समायोजित परतावा मिडकॅप फंड गटात सरासरीहून अधिक आहे. फंडाच्या गुंतवणुकीत जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत २० कंपन्यांचा समावेश होता तर मे जून महिन्यांत २४ कंपन्या होत्या. मिडकॅप फंडाचे निधी व्यवस्थापक जोखीम नियंत्रित करण्यासाठी कंपन्यांची संख्या वाढवतात. परिणामी प्रति कंपनी गुंतवणूक कमी होते. एखाद्या कंपनीने चांगला परतावा दिला तरी कंपन्यांची संख्या अधिक असल्याने त्या कंपनीची कामगिरी परताव्यात प्रतिबिंबित होत नाही. या फंडाचे निधी व्यवस्थापक सखोल संशोधनाअंती निवडक कंपन्यांचा गुंतवणुकीत समावेश करतात. ‘हाय कन्व्हिक्शन कंपनी’ हे पोर्टफोलिओ धोरण असल्याने पोर्टफ़ोलिओ मोठ्या प्रमाणात स्थिर असल्याचे दिसते. मागील महिन्यांत केवळ सोनाटा सॉफ्टवेअरला वगळण्यात आले आणि टाटा एलॅक्सीचा गुंतवणुकीत समावेश करण्यात आला. जुलै महिन्यात चंबल फर्टिलायझर, एंजलवन, व्होडाफोन-आयडिया, इंडस टॉवर्स, भारत इलेक्ट्रोनिक्स यांना वगळ्यात आले. अलीकडे निधी व्यवस्थापक गुंतवणुकीतील कंपन्यांची संख्या कमी करून अनावश्यक अतिवैविध्य टाळत असल्याचे दिसत आहे. हा पोर्टफ़ोलिओ तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांशी आणि जोखीम सहनशीलतेशी संरेखित होईल. याव्यतिरिक्त, पोर्टफोलिओतील कंपन्यांची संख्या कमी केल्याने वित्तीय उद्दिष्टे लवकर साध्य होण्यास साहाय्यभूत ठरते.

भारतातील सध्याच्या समष्टी अर्थशास्त्रीय परिमाणे मिड-कॅप कंपन्यांत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरण्याची शक्यता वर्तवत आहेत. मिडकॅप फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत. लार्जकॅपच्या तुलनेत मिडकॅप कंपन्या साधारणपणे व्यवसायात नवीन असल्याने ‘प्रॉडक्ट लाइफ सायकल’च्या उच्च-वाढीच्या टप्प्यात असतात. या उच्च वृद्धीमुळे गुंतवणूकदारांना कंपन्यांच्या समभागांच्या किमतींमध्ये वेगाने वाढ झाल्याचा फायदा होतो. मिडकॅप फंडातील गुंतवणूक विविध उद्योगक्षेत्रांत असल्याने मिड-कॅप फंडात तुमची गुंतवणूक वैविध्य देते. यामुळे जोखीम कमी होते. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, मिडकॅप कंपन्या या लार्जकॅप कंपन्यांच्या तुलनेत अधिक अस्थिर असतात. मिडकॅप कंपन्यांच्या समभागांच्या किमतीत वेगाने चढ-उतार होतात. गुंतवणूकदारांनी आपली मानसिकता संभाव्य अस्थिरतेसाठी तयार करणे गरजेचे आहे. मिडकॅप कंपन्यांचे सध्याचे मूल्यांकन पाहता, पाच ते दहा वर्षांच्या गुंतवणुकीच्या उद्देशाने गुंतवणूकदारांनी मिडकॅप फंडांचा विचार केला पाहिजे. तथापि, याचा अर्थ असा नाही की, तुम्ही कोणत्याही मिडकॅप फंडात आंधळेपणाने गुंतवणूक करावी. उत्कृष्ट कामगिरीचा इतिहास आणि प्रतिष्ठित निधी व्यवस्थापक असलेल्या या फंडाची निवड केल्यास वेगाने संपत्ती निर्मितीला हातभार लाभेल. मिडकॅप फंडात गुंतवणूक करीत असताना संबंधित जोखमींबद्दल जागरूक असले पाहिजे. गुंतवणूक करण्यापूर्वी मिडकॅप फंड तुमच्या जोखीम सहिष्णुता आणि आर्थिक उद्दिष्टांशी जुळत असल्याची खात्री केल्यानंतर गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्यावा.