मागील वर्षात आपण ‘अर्थामागील अर्थभान’ या सदरातून विविध आर्थिक संकल्पना आणि त्याचा आपल्या रोजच्या जीवनात आपण कळत-नकळतपणे कसा वापर करत असतो हे बघितले. यावर्षी थोडेसे मनोरंजन आणि त्यासोबत थोडीशी जुनीच माहिती नव्याने घेऊया. ‘अर्थामागील अर्थभान’ मध्ये काही आर्थिक संकल्पना होत्या, ज्या आचरणात आणल्यावर थोडा फायदा होण्याची शक्यता होती. यावेळेस आर्थिक बाबींचे मनोरंजन आहे, जे पूर्वी घडून गेले आहे मात्र थोडेसे विस्मरणात गेले आहे. म्हणजे पुढचे पन्नास भाग काहीतरी वाचल्यावर त्याची अजून माहिती घ्यावी असे नक्की वाटेल किंवा काहीतरी नवीन शिकायला मिळेल पण अर्थातच वित्त, व्यवस्थापन आणि अर्थशास्त्रातलेच.
हेही वाचा- पीपीएफ अकाउंटमध्ये दीड लाख रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करता येते? जाणून घ्या
पुढील महिन्यात १ फेब्रुवारी २०२३ ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. पण आपल्यापैकी किती जणांना पहिला अर्थसंकल्प कुणी सादर केला ते माहीत आहे? प्रत्येक वेळेला अर्थसंकल्पाचा आकार म्हणजे किती खर्च अध्याहृत केला होता याबद्दल माहिती आहे. या सगळ्या गोष्टी अतिशयक रंजक आहेत आणि माहितीपूर्ण देखील. देशात असे कित्येक मंत्री आणि सनदी अधिकारी होऊन गेले आहेत, ज्यांनी अर्थ मंत्रालय सांभाळले आणि आपल्या उत्तम कामाची छाप देखील सोडली. देशासह जगात कित्येक असे आर्थिक जादूगार (फायनान्स विझार्ड) होऊन गेले, त्यांची माहिती आपल्यापैकी किती जणांना आहे? देशात आणि जगात अशा कित्येक घटना होऊन गेल्या, ज्यामुळे त्या देशाचा किंवा जगाचा वित्तीय दृष्टिकोन बदलण्यास मदत झाली आणि त्याचा संपूर्ण जगाला फायदा झाला. आपल्या देशात अनेक असे वित्तीय कायदे होऊन गेले, जे आताच्या नवीन पिढीला वाचताना अगदी अविश्वनीय वाटतील.
हेही वाचा- लहान मुलांनाही भरावा लागतो कर? जाणून घ्या काय आहे नियम
वित्तीय क्षेत्रात काही उत्तम पुस्तके आहेत जी आज देखील वाचनीय आहेत. त्यातील काही विशेष पुस्तकांची माहिती या लेखमालिकेत घेऊया. जगभरात वित्तीय घडामोडीचे केंद्र असणाऱ्या कित्येक संस्था कार्यरत आहेत त्यांची जन्मकहाणी आणि प्रवास वाचणे रंजक असेल. आपण वित्त म्हणजे फक्त केंद्रीय अर्थसंकल्प किंवा वैयक्तिक गुंतवणूक एवढाच विचार करतो, पण त्याचे देखील सगळे नियम आपल्याला माहिती असतात असे नाही. वैयक्तिक गुंतवणूक करताना आपली धाव समभाग, वायदा किंवा म्युच्युअल फंडपर्यंत असते. मात्र त्याव्यतिरिक्त अजूनही काही मार्ग उपलब्ध आहेत. वित्त म्हणजे पैसा आणि पैसे म्हटले की घोटाळे, गैरव्यवहार आणि फसवणूक आलीच. कितीही कायदे केले तरी त्यातून पळवाट शोधली जातेच. इतिहासात अशा काही लहान-मोठ्या घोटाळ्यांची नोंद आहे ती माहिती करून घेणे गरजेचे आहे. हर्षद मेहताचा घोटाळा चक्क वेबसीरिजमुळे बारकाव्यांसहित समजला. वित्त शास्त्र म्हणजे नुसते एक शास्त्र असून त्याच्यासुद्धा कित्येक उपशाखा आहेत आणि त्या फार काही अन्वेषित आहेत असे नाही. तेव्हा त्याची माहिती या लेखमालिकेतून आपण घेऊया. तुमच्याकडे याबाबत काही विचार किंवा कल्पना असतील जरूर कळवा.
हेही वाचा- करावे करसमाधान: भांडवली नफ्यावरील सवलती – भाग २
तेव्हा प्रत्येक सोमवारी तयार राहा काहीतरी तरी नवीन, अपेक्षित तरीही अनपेक्षित आणि कदाचित कंटाळवाणे मात्र त्यातून वित्तरंजन होईल याची नक्की खात्री आहे.
Twitter : @AshishThatte
Email : ashishpthatte@gmail.com