वर्ष २०११ मध्ये स्थापन झालेली डीसीएक्स सिस्टीम्स लिमिटेड ही कंपनी प्रामुख्याने सिस्टीम इंटिग्रेशन, केबल आणि वायर हार्नेस जुळवणीच्या सर्वसमावेशक ॲरेचे उत्पादन करते. कंपनी किटिंगमध्येदेखील कार्यरत आहे. डीसीएक्स परदेशी उपकरण निर्मात्यांसाठी विशेषत: एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित भारतीय ऑफसेट भागीदार (इंडियन ऑफसेट पार्टनर – आयओपी) म्हणून विकसित झाले आहेत. कंपनी एल्टा सिस्टीम्स आणि इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज लिमिटेड, सिस्टम मिसाइल्स आणि स्पेस डिव्हिजन (एकत्रित, आयएआय ग्रुप), इलेक्ट्रॉनिक उपप्रणाली आणि केबल आणि वायर हार्नेस जुळवणीच्या निर्मितीसाठी भारतीय संरक्षण बाजारासाठी सर्वात मोठे आयओपी आहेत.
आपल्या उत्पादनांसाठी डीसीएक्सने काही संयुक्त उपक्रम केले असून त्यासाठी पुढील उपकंपन्या स्थापन केल्या आहेत.
१. रानल ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स (आरएएसपीएल): ईएमएसच्या बॅकवर्ड इंटिग्रेशनसाठी आरएएसपीएल प्रिंटेड सर्किट बोर्ड असेम्ब्ली तयार करते.
२. एनआयएआरटी सिस्टीम्स लिमिटेड (एनआयएआरटी): इस्रायल येथे वर्ष २०२३ मध्ये स्थापित ही कंपनी एल्टा सिस्टीम्ससह संयुक्त विद्यमानाद्वारे नागरी उद्योगांसाठी, विशेषतः रेल्वे उद्योगासाठी रडार आणि ऑप्टिक्सवर आधारित महत्त्वाचे उत्पादन आणि जागतिक वितरण लवकरच सुरू करेल.
हेही वाचा >>> फंडभान : म्युच्युअल फंडाची निवड कशी करावी?
कंपनीचा ९० टक्क्यांहून अधिक महसूल सिस्टीम्स इंटिग्रेशनमधून होतो. कंपनीने रडार सिस्टीम, सेन्सर, इलेक्ट्रॉनिक युद्ध, क्षेपणास्त्रे आणि दळणवळण प्रणाली या क्षेत्रांमध्ये सिस्टीम्स इंटिग्रेशन हाती घेतले आहे. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते उत्पादन असेम्ब्ली आणि सिस्टीम्स इंटिग्रेशन सेवा प्रदान करतात. तसेच कंपनी संरक्षण उद्योगातील विविध वापरांसाठी केबल आणि वायर हार्नेस असेम्ब्ली करते यांत प्रामुख्याने रेडिओ फ्रिक्वेन्सी केबल, मिक्स्ड-सिग्नल, पॉवर आणि डेटा केबलची एक व्यापक श्रेणी तयार करते. सेन्सर, पाळत ठेवणारी यंत्रणा, क्षेपणास्त्र प्रणाली, लष्करी चिलखती वाहने आणि इतर एरोस्पेस आणि संरक्षण उद्योगांसाठी त्यांच्या ग्राहकांच्या गरजेनुसार इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीसाठी याचा वापर होतो. कंपनी संरक्षण आणि एरोस्पेस विभागामध्ये मायक्रोवेव्ह, हाय-स्पीड डिजिटल आणि मिश्रित सिग्नल ॲप्लिकेशन्ससाठी प्रिंटेड सर्किट बोर्ड असेम्ब्लीचे उत्पादन करते.
याव्यतिरिक्त, कंपनी काही जॉब वर्क सेवा घेते, ज्यात सामग्रीचे असेम्ब्ली आणि चाचणी समाविष्ट असते. तसेच कंपनी चाचणी आणि देखभाल प्रकल्पांसह देखभाल आणि दुरुस्ती सेवादेखील प्रदान करते.
कंपनीचा उत्पादन प्रकल्प बेंगळुरू, कर्नाटक येथील हाय-टेक डिफेन्स अँड एरोस्पेस पार्क येथे असून ही सुविधा ३०,००० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेली आहे. चाचणी आणि वायर प्रक्रिया, तसेच कंपनीची उपकंपनी, आरएएसपीएलने इलेक्ट्रॉनिक उत्पादन सेवांसाठी (ईएमएस) ४०,००० चौरस फूट क्षेत्रफळात उत्पादन सुविधा सुरू केली आहे.
हेही वाचा >>> ससा कासवाची गोष्ट, ‘सीआरआर’ कपात लाभदायी?
कंपनीचे इस्रायल, यूएसए, कोरिया आणि भारतात अनेक ग्राहक असून यात संरक्षण उद्योग, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि नवउद्यमींमधील ग्राहकांचा समावेश आहे. कंपनीच्या ग्राहकांमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आणि खासगी कंपन्या तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा भारतातील संरक्षण आणि एरोस्पेसपासून ते अंतराळ उपक्रम आणि रेल्वेपर्यंतच्या विविध क्षेत्रांत समावेश आहे.
कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल फारसे चांगले नाहीत. या कालावधीत कंपनीच्या उलाढालीत ३७ टक्के घट झाली असून नक्त नफ्यातदेखील मोठी (७४ टक्के) घट होऊन तो ५.२ कोटींपर्यंत खाली आला आहे. मात्र कंपनीला गेल्याच आठवड्यात ४८० कोटी रुपयांचा कार्यादेश (ऑर्डर) मिळाला असून कंपनीकडील एकूण कार्यादेश २,६०० कोटींवर गेले आहे. इस्राईल तसेच अमेरिकेकडून मोठ्या कार्यादेशाची अपेक्षा आहे. तसेच पुढील कारणामुळे आगामी काळात डीसीएक्स उत्तम कामगिरी करून दाखवेल अशी अपेक्षा आहे.
• दीर्घकालीन वाढीची क्षमता: संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात सतत विस्तार होण्याची शक्यता आहे.
• एकूण कार्यादेश: कंपनीकडे असलेल्या दीर्घकालीन कार्यादेशामुळे भविष्यातील उत्पन्न प्रवाह अधिक सुनिश्चित आहे.
• सरकारी धोरणांचा फायदा: भारत सरकारच्या संरक्षण उत्पादनाला चालना देण्याच्या धोरणांचा कंपनीला फायदा होईल.
याच स्तंभातून दोन वर्षांपूर्वी २५९ रुपयांना सुचवलेला हा समभाग सध्या ३६० रुपयांना उपलब्ध आहे. ज्यांनी अजूनही खरेदी केला नसेल त्यांनी हा समभाग प्रत्येक मंदीत खरेदी करावा असाच आहे. शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा समभाग सध्याच्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
डीसीएक्स सिस्टीम्स लिमिटेड (बीएसई कोड ५४३६५०)
वेबसाइट: www.dcxindia.com
प्रवर्तक: डॉ. एच. एस. राघवेन्द्र राव
बाजारभाव: रु. ३६४/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: इलेक्ट्रॉनिक्स, एरोस्पेस-डिफेन्स
भरणा झालेले भागभांडवल: रु. २२.२८ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५७.१३
परदेशी गुंतवणूकदार ०.७७
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ७.८८
इतर/ जनता ३४.२२
पुस्तकी मूल्य: रु. १२०/-
दर्शनी मूल्य: रु. २/-
लाभांश: –%
प्रति समभाग उत्पन्न: रु. ४.९
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ७१.२
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ७४.४
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०५
इंटरेस्ट कवरेज गुणोत्तर: ४.१२
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड (आरओसीई): ९.९८
बीटा : १.३
बाजार भांडवल: रु. ४,०६२ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ४५२/२३५
गुंतवणूक कालावधी : १८-२४ महिने
Stocksandwealth@gmail.com
• वरील लेख केवळ विश्लेषणात्मक संशोधन असून तो गुंतवणूक सल्ला नाही.
• प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या ०.१% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनी कडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तु घेतलेली नाही.
• लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअर मधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.