गुंतवणूक शास्त्र हे उपयोजित संख्याशास्त्र आहे, असे म्हटले जाते. बाजारातील अस्थिरता मोजण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. बाजारातील अस्थिरता म्हणजे निर्देशांकाचे प्रमाणित विचलन (स्टॅण्डर्ड डेव्हिएशन) होय. बाजारात जितकी अस्थिरता अधिक तितकी गुंतवणुकीतील जोखीम अधिक समजली जाते. भांडवली बाजारात अस्थिरता ही रोखे किंवा समभाग यांच्या किमतीतील बदलांशी संबंधित असते. उदाहरणार्थ, जेव्हा शेअर बाजार कमी कालावधीत १ टक्क्यापेक्षा अधिक वधारतो किंवा घसरतो, तेव्हा त्याला अस्थिर बाजार म्हणतात. गुंतवणुकीचे साधन निवडताना मालमत्तेसंबंधी अस्थिरता हा महत्त्वाचा घटक विचारात घ्यावा लागतो.

नजीकच्या काळात बाजार अस्थिर राहण्याची चार मुख्य कारणे सांगता येतील. पहिले कारण, अमेरिकेतील सत्तांतर. डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाल्यानंतर एसअँडपी ५०० निर्देशांकाबाबतचा अंदाज गोल्डमन सॅक्सने बदललेला नसला तरीही काही उद्योग क्षेत्रांच्या वाढीच्या अंदाजात बदल झाले आहेत. येत्या १२ महिन्यांत निर्देशांकांत ८.५० ते ९.०० टक्के वाढीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. वर्ष २०२५ मध्ये प्रति-शेअर कमाईमध्ये (ईपीएस) ११ टक्के आणि वर्ष २०२६ मध्ये ७ टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला असला, तरी नवीन प्रशासनाच्या धोरणात होणाऱ्या संभाव्य बदलामुळे हे अंदाज बदलू शकतात. अमेरिकेतील कंपन्यांच्या समाधानकारक कमाईतील वाढीच्या अंदाजामुळे पुढील वर्षात अमेरिकेतील समभाग गुंतवणूक लाभदायी असेल अशी चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा –  प्रतिशब्द :  अशाश्वती मूर्तिमंत दिसू लागली! 

नवीन अर्थसंकल्प जाहीर होण्यास एका महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. मागील जूनमध्ये भारतात मोदी तिसऱ्या वेळेला पंतप्रधानपदी आरूढ झल्यावर पूर्ण वर्षासाठी जाहीर होणारा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. केंद्र सरकारकडे वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) हे कमाईचे मोठे साधन आहे. लोकानुनय करणाऱ्या योजनांवर वारेमाप खर्च होत असल्याने विकासासाठी निधी अपुरा पडत असल्याची तक्रार अर्थतज्ज्ञांकडून केली जात आहे. विकासाच्या मुद्द्यावर निवडून आलेल्या सरकारला पायाभूत सुविधा आणि निर्मितीसाठी पोषक वातावरण राहील याची काळजी घ्यावी लागेल. जीएसटी आकारणीबाबत सुसूत्रतेचा अभाव असल्याचा आक्षेप घेतला जात आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत पॉपकॉर्नवरील कर आकारणीबाबत स्पष्टीकरणामुळे जीएसटी कर आकारणी पद्धतीचे जटिल स्वरूप समोर आले आहे. १ जुलै २०१७ पासून लागू झालेली कर व्यवस्था किती जटिल आहे, हे समोर आले आहे. काही वस्तू जीएसटी कक्षेबाहेर आहेत. जसे की पेट्रोलियम उत्पादने, खनिज तेल, विमानाचे इंधन (एटीएफ), नैसर्गिक वायू आणि उपभोगासाठी वापरण्यात येणारी अल्कोहोल उत्पादने. जीएसटी हा विषय अर्थसंकल्पाच्या कक्षेबाहेर असला तरी येत्या सहा आठ महिन्यांत यावर काही बदल संभवत आहेत. विद्यमान आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचा वृद्धिदर सात-तिमाहीतील नीचांकी पातळीवर होता. मागील वर्षी याच कालावधीतील ८.१ टक्के असलेला वृद्धिदर ५.४ टक्क्यांपर्यंत खाली आला. फेब्रुवारीच्या अखेरीस विद्यमान आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचा वृद्धिदर जाहीर होईल. हा दर ६ ते ६.५० टक्क्यांदरम्यान राहील. त्याआधी या आठवड्यात तिसऱ्या तिमाहीचे कंपन्यांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात होईल. बाजार विश्लेषकांच्या मते, कमकुवत उपभोग, ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांमुळे पायाभूत सुविधांवर कमी होणारा सरकारी खर्च आणि विपरीत हवामानाचा शेती उत्पादनांवर झालेला प्रतिकूल परिणाम कंपन्यांच्या तिमाही निकालात दिसून येईल. वर्ष २०२५ मध्ये निफ्टीच्या कमाईत ८-१० टक्के तर वर्ष २०२६ मध्ये १०-१२ टक्के वाढ अपेक्षित आहे. याचा अर्थ बाजार स्वस्त आहे, असे नाही. कंपन्यांच्या कमाईत पुरेशी वाढ नसणे हे लक्षात आल्यावर बाजार मोठ्या घसरणीला सामोरा जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. देशांतर्गत शेअर बाजार नजीकच्या काळात मोठ्या अस्थिरतेला सामोरे जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – माझा पोर्टफोलिओ: वस्तू खरेदी-विक्रीचा लाभदायी विश्वासू मंच, इंडियामार्ट इंटरमेश लिमिटेड (बीएसई कोड ५४२७२६)

बाजारातील अस्थिरता नवगुंतवणूकदाराला अस्वस्थ करणारी असू शकते. परंतु ही अस्थिरता गुंतवणुकीच्या संधी उपलब्धदेखील करून देईल. मागील कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये बाजाराचा बारकाईने मागोवा घेतल्यास, या अस्थिरतेच्या काळात शांत राहून सुरू असलेल्या ‘एसआयपीत’ फार बदल न करता एकरकमी गुंतवणूक टाळण्याचा माझा सल्ला असतो. गुंतवणुकीत (लिक्विड फंडात) पुरेशी रोकड राखून खरेदीच्या संधीची वाट पाहणे श्रेयस्कर ठरेल. या अस्थिरतेच्या काळात तुमच्या पोर्टफोलिओचा नियमित आढावा, गुंतवणुकीचे आत्मविश्वासपूर्ण निर्णय घेण्यास आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास सक्षम करेल. अस्थिरतेच्या काळात ‘हेजिंग’ हे सर्वोत्तम शस्त्र आहे. तुम्ही जानेवारी-फेब्रुवारी २०२० दरम्यान (करोना महासाथीच्या काळात) गुंतवणुकीला सुरुवात केली असेल, तर तुमच्या गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाली असेल. मात्र भू-राजकीय अनिश्चिततेमुळे, तुमच्या गुंतवणूकमूल्यात २५ ते ३० टक्के घट टाळण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मल्टीॲसेट फंड हे ‘हेजिंग’ची सर्वोत्तम रणनीती आहे. तुमच्या गुंतवणुकीत मल्टीॲसेट फंडांचा समावेश करणे योग्य ठरेल.

byjoshi09@gmail.com

Story img Loader