सणोत्सवाचा नोव्हेंबर महिना सराफा बाजारासाठी लक्षणीय ठरला. पारंपरिकपणे धनत्रयोदशी, दिवाळी आणि पाठोपाठ येणारा लग्नसराईचा हंगाम या सोन्याच्या मागणीत मोठी वाढ करणाऱ्या कारणांमुळे सराफा बाजार उत्साही असतोच. मात्र मागील दीड-दोन वर्षे जागतिक अर्थव्यवस्थेत मध्यवर्ती बँकांकडून जोरदार व्याजदर वाढीचे सत्र सुरू राहिल्यामुळे सोने-चांदी मंदीच्या विळख्यात राहिली. परिणामी सराफा बाजाराला मरगळ आली होती. ती या नोव्हेंबर महिन्यात दूर झाली. नुसती दूरच झाली असे नव्हे तर सोन्याने अगदी अल्पकाळात सुमारे १० टक्क्यांची उसळी मारून भारतीय बाजारात किंमत जेव्हा दहा ग्रॅमसाठी ६४,००० रुपयांची विक्रमी पातळी ओलांडली तेव्हा गुंतवणूकदार आणि फंड यांनाच नव्हे तर अगदी व्यापाऱ्यांनादेखील आश्चर्यचकित केले. अर्थात नेहमीप्रमाणे सोन्याची विक्रमी पातळी काही क्षणांपुरतीच राहिली. कित्येकांना तर ही किंमत आलेली माहिती होईपर्यंत त्यात १,५०० रुपयांची घटदेखील झाली. व्यापारी भाषेत याला किंमत छापली गेली असेही म्हणतात.

साधारणपणे सोन्यातील प्रत्येक तेजी ही एका मोठ्या अप्रिय घटनेमुळे विक्रमात परिवर्तित होऊन नंतर लगेच किमती घसरतात असे दिसून आले आहेत. करोना काळातील तेजीनंतर सोने १५ टक्के घसरले होते. सध्या आलेली तेजीदेखील अशीच ठरून जागतिक बाजारात दोन दिवसांत प्रतिऔंस १२५ डॉलरची म्हणजे भारतीय बाजारात सुमारे २,४०० रुपयांची घसरण येऊन आठवड्याअखेरीस सोने दहा ग्रॅमसाठी ६१,६०० रुपयांच्या खाली स्थिरावले आहे. वरील किमती एमसीएक्स या कमॉडिटी एक्स्चेंजवरील असून हजर बाजारात किमतीत ३ टक्के जीएसटी समाविष्ट असतो. त्यामुळे सराफा बाजारात सोने ६६,५०० रुपये प्रतिदहा ग्रॅम ही विक्रमी पातळी ओलांडून गेले होते. ते आता ६४,००० रुपयांजवळ स्थिरावले आहे. मात्र या वेळी आलेली तेजी ही सोन्याच्या मागणीमधील वाढीपेक्षा थोडी वेगळी असून त्यात तांत्रिक कारणांचा सहभाग अधिक होता. कारण २,०१० डॉलर ते २,१३६ डॉलर ही साधारण १२५ डॉलरची झेप केवळ शनिवारी रात्री उशिरा काही वेळात मारली गेली. ज्यावेळी जागतिक बाजारातील सहभाग आणि व्यवहार अत्यंत कमी असतात. तसेच किमतीतील या तेजीसाठी ‘ट्रिगर’ होता एक उडत आलेली बातमी, ज्यानुसार अमेरिकी जहाजावर आखाती देशांकडून हल्ला झाल्यामुळे आता इस्राइल-हमास युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. मागील महिनाभर सोने आधीच खूप वाढल्यामुळे या बातमीनंतरही किंमत १०० ते १२५ डॉलर वाढण्याचे कारण नव्हते. परंतु अल्गोरिदम म्हणजे मानवी सहभाग नसलेल्या आणि संपूर्ण संगणकीय परिचालन प्रणालीमुळे गुंतवणूकदारांचे नुकसान प्रतिबंध पातळीला (स्टॉपलॉस) स्पर्शून गेल्याने एवढी तेजी आली. याला फार तर ‘सोने पे सुहागा’ असे म्हणता येईल. कारण त्यानंतर त्याच कारणाने ही तेजी संपूनदेखील गेली. तसाही अल्गोट्रेडिंग हा सतत वाढत जाणारा राक्षस असून तो सामान्य गुंतवणूकदारांसाठी किती घातक आहे हा स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे. वरील उदाहरणात त्याचे घातक रूप दिसून येईल.

gold etfs witness record rs 1961 cr inflow in october
‘गोल्ड ईटीएफ’ना चमक; ऑक्टोबरमध्ये विक्रमी १,९६१ कोटींची गुंतवणूक
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Gold Silver Price Today 15 November 2024 in Marathi
Gold Price Today : फक्त १५ दिवसांमध्ये सोने ५००० रुपयांनी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा सोन्या-चांदीचा दर
gold prices dropping post Diwali it will reach 70000 per 10 grams soon
सोन्याचे दर ७० हजारांपर्यंत येणार? आणखी मोठी घसरण…
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…
Gold Silver Price Today 12 November 2024 in Marathi
Gold Price Today : खूशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही तब्बल इतक्या रुपयांनी स्वस्त; खरेदीपूर्वी पाहा आजचा भाव

हेही वाचा – Money Mantra: बँक निफ्टी ऐतिहासिक पातळीवर!

थोडे मागे जाऊन पाहिले तर या स्तंभातून सोने या विषयावर ऑगस्ट महिन्यात लिहिलेल्या लेखात सोने-चांदी खरेदीसाठी अनुक्रमे ५८,२०० रुपये आणि ६६,२०० रुपये या पातळया दिल्या गेल्या होत्या. त्या वेळी सोने प्रतिदहा ग्रॅमसाठी ६०,००० रुपयांच्या तर चांदी प्रतिकिलो ७३,००० रुपयांच्या आसपास होती आणि किमतीतील घसरण या वर्षअखेरपर्यंत राहील असे म्हटले होते. परंतु वायदे बाजारात किमती दिलेल्या लक्ष्याच्या खाली फारच कमी वेळात घसरल्या आणि तिथून जोरदार खरेदी सुरू झाली. याला अनेक अनपेक्षित घटना कारणीभूत ठरल्या. व्याजदर वाढ थांबण्याची अंधूक आशा, त्यामुळे डॉलरमधील घसरण, त्यानंतर इस्राइलवरील हल्ला अशा अनेक भू-राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततांमुळे जागतिक बाजारात हेजफंड आणि मध्यवर्ती बँका सोने खरेदीत उतरल्या आणि सोने वेगाने वाढू लागले. भारतात मात्र दिवाळी, लगीनसराईमुळे सोने वाढणार म्हणून सोन्यात गुंतवणूक वाढू लागली. प्रत्यक्ष दिवाळी आणि लक्षावधी लग्ने यामुळे सोने वाढत नसते तर जागतिक बाजारात मोठमोठ्या फंडांची आणि मध्यवर्ती बँकांच्या खरेदीमुळे किमती वाढतात याची फारशी माहिती आपल्या देशात नाही. कुठल्याही कारणाने असेना, परंतु किमती वाढल्याने गुंतवणूकदारांना चांगला फायदा झाला हे महत्त्वाचे.

आता डिसेंबर अर्धा संपेल आणि जागतिक बाजारात सुट्ट्यांचा हंगाम सुरू होईल म्हणजे हेजफंड, बँका, व्यापारी यांचा बाजारातील सहभाग लक्षणीयरीत्या कमी होईल. मात्र वर्षअखेरीस गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्यासाठी चढाओढ या कारणांमुळे शेअर आणि कमॉडिटी बाजारात जोरदार चढ-उतार होतात. त्यामुळे सराफा बाजारात पुढील काळात काय कल राहील हे सांगणे कठीण असले तरी येऊ घातलेल्या घटनांचा ऊहापोह करू या. यामध्ये विद्यमान आठवड्यात होणाऱ्या अमेरिकी मध्यवर्ती बँकेच्या बैठकीकडे सर्व जगाचे लक्ष् लागले आहे. कारण मागील दोन महिन्यांपासून व्याजदर वाढ थांबण्याचे आणि मार्च-एप्रिल महिन्यापासून कपातीची आशा वाढली आहे. मात्र मध्यवर्ती बँकेच्या अनेक विभागीय मुख्य अधिकाऱ्यांनी अजून व्याजदर वाढीची आवश्यकता व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर जर अध्यक्षांनी अजून एक व्याजदर वाढ करण्याचे संकेत दिले तर बाजाराला जोरदार धक्का बसून सोने-चांदी, शेअर या सर्वच बाजारात जोरदार घसरण येऊ शकेल. तसेही अमेरिकी भांडवली बाजारात एकतर्फी तेजी चालू असून ‘करेक्शन’साठी एका धक्क्याची प्रतीक्षा आहे. तो धक्का मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष पॉवेल देतात की व्याजदर वाढ संपल्याचे संकेत देतात याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे. त्याबरोबरच सोन्याच्या आणि शेअर बाजाराच्या विरुद्ध चालणाऱ्या डॉलर निर्देशांकामध्ये आलेली घसरण वर्षअखेरीच्या नफारूपी विक्रीमुळे थांबून निर्देशांक थोडासा वाढू शकेल. शेअर आणि सराफा बाजार नरम होतील. त्यामुळे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर सोन्यासाठी नजीकच्या काळातील तेजीचे वातावरण निवळले असून बाजारातील कल पूर्ववत झाला आहे. तेजी आणि मंदीवाले समोरासमोर उभे ठाकले असून मार्च अखेरपर्यंत त्यात स्पष्टता येईल. तोपर्यंत सोने सध्याच्या २,०२० डॉलरपासून १,९२१ ते १,८८२ डॉलरपर्यंत मंदावू शकेल. तर पूर्वीचा विक्रम असलेली २,०७५ डॉलर ही पातळी मोठा अडथळा ठरेल असे जाणकारांचे म्हणणे आहे. नोव्हेंबरमध्ये ‘ईटीएफ’च्या माध्यमातून पाश्चिमात्य देशांकडून सोने विक्री आणि मध्यवर्ती बँकांची मंदावलेली खरेदी सोन्यातील कल थोडा मंदीचा राहील असे सुचवत आहे. मात्र पॉवेल यांनी व्याजदरवाढ संपल्याचे संकेत अधिकृतपणे दिले किंवा बाजारात असलेल्या अपेक्षेपेक्षा आधीच आणि मोठ्या कपातीचे संकेत दिल्यास दोन्ही बाजारात असलेली तेजी अजून वाढेल. ही शक्यता अगदीच कमी असली तरी बाजार नेहमी विचाराच्या पलीकडले घडत असते हा इतिहास आहे.

हेही वाचा – Money Mantra : म्युच्युअल फंड एसआयपी आता २५० रुपयांपासून सुरू करता येणार, सेबी प्रमुखांनी सांगितली योजना

पुढील वर्षी भारतासकट जगातील बहुतांश देशांमध्ये राष्ट्रांच्या प्रमुखांची निवड होणार आहे. त्यामुळे भू-राजकीय समीकरणे नव्याने अस्तित्वात येतील. त्याचा चलनबाजार आणि वित्तीय बाजारावर होणारे परिणाम सराफा बाजारासाठी दिशादर्शक ठरतील. एक नक्की आहे, ते म्हणजे सोन्याच्या किमतीतील चढ-उतार अलीकडील काळात अधिक वेगवान झाले आहेत. यासाठी अल्गोट्रेडिंग बऱ्याच प्रमाणात जबाबदार असावे.

कालाय तस्मै नम:!