डॉ.आशीष थत्ते

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

आपण घरात एखादी वस्तू जुनी झाली की टाकून देतो. पण तुम्हाला साफ सफाई करताना १५० वर्षांपूर्वीची एखादी वस्तू मिळाली. उदा. तलवार, पुरातन मूर्ती, कागदपत्रे (हस्तलिखित किंवा टंकलिखित). यापैकी काही वस्तू मिळाल्या तर तुम्ही काय कराल? अर्थात त्याची आधी नोंदणी करावी लागेल. कारण नोंदणी केली नाही तर तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकता. नाणी व पुरातन वस्तू या तशा सारख्याच पण तरीही या दोघांमध्ये निश्चित फरक आहे.

भारतात पुरातन वस्तूंविषयी निश्चित कायदे आहेत त्यामुळे पुरातन वस्तू विकत घेताना त्याच्या कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. जसे पुरातन वस्तूंचा कायदा १९७२ आणि त्याचे नियम १९७३ प्रमाणे वस्तू जर १०० वर्षांपेक्षा जुनी असेल आणि कागदपत्र ७५ वर्षांपेक्षा जुने असेल तर त्याची कायद्याप्रमाणे नोंद करून घ्यावे लागते. पुरातन वस्तू विकताना देखील काळजी घ्यावी लागते. आपल्याकडे विविध कारणांमुळे लोक गुंतवणुकीच्या वेगळ्या वाटांचा विचार करत नाहीत. कारण आगळ्यावेगळ्या वस्तूंमधील गुंतवणूक महाग असते. तरलता जवळजवळ शून्य असते, अशा गुंतवणूकीची माहिती देखील नसते आणि अशा अनेक कारणांनी पुरातन वस्तूत फारशी गुंतवणूक होत नाही. अर्थात याचे फायदे देखील आहेत. जसे पुरातन वस्तू तुम्ही दिवाणखान्यात ठेवून दिवाणखान्याची श्रीमंती वाढवू शकता. पण घरातील सोने-चांदी रोख रक्कम याचे आपण प्रदर्शन करू शकत नाही.

आणखी वाचा-Money Mantra : ‘या’ बँकांमध्ये १ लाखांपर्यंतच्या ठेवींवर ४ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळणार, यादी पाहा

तुम्हाला जर असे वाटत असेल की, पुरातन वस्तूंचे व्यवहार फक्त लाखात किंवा कोटींमध्येच होतात तर असे ही नाही. हल्ली ऑनलाईन पद्धतीमुळे छोट्या किमतीच्या वस्तू देखील उपलब्ध होतात. आपल्या पोर्टफोलिओमध्ये याचा नक्की विचार करा. मात्र अशा वस्तू खरेदी करण्यामागे काही धोके देखील आहेत. त्याचे ‘मूर्तिमंत’ उदाहरण म्हणजे सुभाष कपूर. एकेकाळी तो अमेरिकेतील प्राचीन वस्तूंचा व्यापार करणारा मोठा व्यापारी होता. त्यांनी पुरातन वस्तूंच्या बाजारात बरेच नाव कमावले होते. मात्र तो दक्षिण भारतातील मंदिरातील जुन्या वस्तूंची चोरी करून त्या वस्तू परदेशात विकत असे. त्यासाठी खोटी कागदपत्रे तयार केली जात असे. २०११ दरम्यान हे प्रकरण बाहेर आले. त्यानंतर २०१२ मध्ये फ्रँकफर्ट विमानतळावर त्याला अटक करून भारताच्या स्वाधीन करण्यात आले. तेव्हापासून चेन्नईच्या तुरुंगात कैदेत आहे.

पुरातन वस्तूंमधील गुंतवणुकीत बरेच धोके आहेत. जसे की, महागड्या वस्तू, कोणताही लाभांश न मिळणे, भांडवल वृद्धी झाल्यास करपात्र उत्पन्न, बनावट वस्तूंचा असणारा सुळसुळाट आणि वस्तू हरवण्याची किंवा फुटण्याची शक्यता इत्यादी. पण तरीही काही गुंतवणूकदार तेवढी जोखीम पत्करायला तयार होतात. शेवटी जुने ते सोनेच मग ती वस्तू किंवा माणूस कुणीही असो.

ashishpthatte@gmail.com

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Antiques things stupidity or prosperous investment print eco news mrj