– आशिष थट्टे
भावनाप्रधान व्यक्ती कोणतीही कला असल्यास तिच्याकडे अर्थार्जनाचे साधन म्हणून बघत नाही तर काही लोकांचा दृष्टिकोन अगदी विरुद्धदेखील असतो. ते एक गुंतवणूक किंवा अर्थार्जनाचे साधन म्हणूनदेखील बघतात. कलेचे कित्येक प्रकार आहेत, जे आपण अर्थार्जनाचे साधन म्हणून विचार करू शकतो. अर्थात त्यातील भावना बाजूला ठेवूनच. म्हणून आज आपण विचार करणार आहोत तो चित्रकलेचा. आपली गुंतवणूक आपण तशी सहजा सहजी कुणाला दाखवत नाही किंवा उघड करत नाही. शेअर बाजारात घेतलेले समभाग किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक याबाबत चर्चा करत नाही. मात्र याला निश्चित अपवाद म्हणजे चित्र. एखादे चित्र आपण विकत घेऊन दिवाणखान्यात ते चक्क लोकांना दाखवतो. शिवाय ते कोणाच्या पसंतीस उतरले आणि त्याची चांगली किंमत मिळाल्यास विकून दुसरे चित्र घेऊ शकतो.
२०२१ च्या दिवाळीमध्ये नायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या परिवाराचे छायाचित्र समाजमाध्यमावर टाकले होते. त्या वेळेला त्यांच्या छायाचित्रापेक्षा त्या मागे दिसणाऱ्या बैलाच्या चित्राची अधिक चर्चा झाली. मनजीत बावा (१९४१-२००८) यांनी ते चित्र काढले आणि ते छायाचित्र समाजमाध्यमावर आल्यानंतर त्या चित्रकाराच्या कामाची किंमत नक्कीच वाढली असेल. त्या चित्राची किंमत सुमारे ४ कोटी रुपये आहे, असे नंतर समाजमाध्यमातून सगळीकडे वृत्त पसरले. म्हणजे ते विकणारे व विकत घेणारे लोक आहेत. पण यासाठी थोडे अधिक पैसे आणि भरपूर संयम मात्र हवा. परत अशा चित्रकाराची पूर्ण माहिती असणे, चित्र ठेवायला भरपूर जागा, जमल्यास त्या चित्राचा विमा काढणे, त्याची देखभाल याचा खर्चदेखील करायला लागतो.
हेही वाचा – Money Mantra: आयुर्विमा प्रिमियम वेळेतच भरा
महिंद्र समुहाचे सर्वेसर्वा आनंद महिंद्र यांनी १० फेब्रुवारी २०२२ रोजी समाजमाध्यमावर सुमारे ७ कोटी रुपये मूल्याचे चित्र प्रसिद्ध केले होते. डोळे नसलेल्या चित्रातील माणसांना तिथल्या पहारेकऱ्याने चक्क डोळे काढले आणि चित्राचा भावच बदलला. त्यामुळे ७ कोटी रुपये मूल्याच्या चित्राचे नुकसान झाले. त्यामुळे अशा गोष्टींची काळजीदेखील घ्यावी लागते. गुंतवणूक म्हणून विचार करताना भावना मात्र पूर्णपणे बाजूला ठेवाव्या लागतात किंवा भावनिक गुंतवणुकीच्या कला वेगळ्या आणि निव्वळ अर्थार्जनासाठी केलेल्या गुंतवणुकीचे चित्र वेगळे ठेवावे. भारतामध्ये चित्र विकत घेणे किंवा विकणे यावर कायदेशीर बंधने नाहीत, पण इतर कायदे जसे की, स्वामित्व हक्क वगैरे प्रकाराने त्यावर नियंत्रण ठेवले जाते. चित्रे विकत घेताना त्यावर काही बंधने नाहीत ना हेदेखील बघावे लागते. उदा. फोर्टिसचे मालक सिंग बंधू आपली संपत्ती विकताना प्रसिद्ध कलाकारांची चित्रेदेखील विकत होते. मात्र न्यायालयाने ते विकण्यास नकार दिला. तेव्हा त्याबाबत थेट कायदे नसले तरी इतर कायदेशीर बाबी पडताळूनच खरेदी-विक्रीचे व्यवहार करावे लागतात.
हेही वाचा – Money Mantra: रिझर्व्ह बँक पॉलिसीचा परिणाम
कला संग्रहालयाला भेट देणे. आपल्याकडील चित्रांची माहिती नातेवाईक किंवा मित्रांना सतत देत राहणे. शिवाय काही संकेतस्थळांच्या माध्यमातून आपल्या चित्रांची जाहिरात करणे या गोष्टी तुमच्या चित्राच्या विक्रीच्या शक्यता वाढवतात. सध्या तर यंत्र किंवा काही ॲपदेखील मूळ चित्राचे दुसरे हुबेहूब चित्र काढून देतात अर्थात त्याची किंमत मूळ चित्रापेक्षा कमीच असते. तेव्हा जे जाणकार असतील त्यांच्या सल्ल्यानेच यामध्ये गुंतवणूक करावी. आधी सांगितल्याप्रमाणे, अपारंपरिक गुंतवणुकीचे मार्ग दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवून निवडावे. कारण यात लगेच खूप फायदा होईल असे नाही. तेव्हा एखाद्या नवकलाकाराचे चित्र घेऊन ठेवा कदाचित काही वर्षांनी तो नवकलाकार खूप मोठा होईल आणि तुमच्याकडे असलेल्या चित्राचेदेखील मूल्य वाढेल.
@AshishThatte
ashishpthatte@gmail.com