गेल्या वर्षात जागतिक स्तरावर भारतीय भांडवली बाजाराने तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम परतावा दिला आहे. अमेरिकी शेअर बाजारांनी २५ टक्के तर भारतीय बाजारांनी १८ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. हाँगकाँगच्या बरोबरीने आता भारतीय कंपन्यांचे बाजारभांडवल पाच ट्रिलियन डॉलरच्या पलीकडे पोहोचले आहे. असे असताना गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांनी एक गोष्ट केली, ती म्हणजे बाजार तेजीत असल्याने कोणत्याही क्षेत्रातील, कोणत्याही कंपनीचा शेअर अभ्यास न करता खरेदी केला आणि नफा मिळवला. आता या वर्षी मात्र तसे चालणार नाही. वर्षभराचा विचार करायचा झाल्यास, बँक निफ्टीने अवघा पाच टक्के परतावा दिला आहे तर व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप, स्मॉलकॅप आणि मायक्रो कॅप आघाडीवर आहेत. प्रत्येक शेअर निवडताना त्या कंपनीचे व्यवस्थापन आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे अल्प-दीर्घकाळात होणारे परिणाम समजून घेऊनच गुंतवणूक करावी लागेल.
शेअर बाजारात गुंतवणूकदारांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे, त्यातील नवगुंतवणूकदारांमध्ये अजूनही कमी किमतीचा शेअर घ्यावा, शेअरची किंमत खूप कमी झाली म्हणून घ्यावा किंवा जी कंपनी बक्षीस समभाग आणि सतत शेअरचे विभाजन करते अशा कंपनीचे शेअर घेतात. बाजारात असे चुकीचे ‘फंडे’ अजमावणारे अजूनही आढळतात, त्या सर्व गुंतवणूकदारांसाठी येणारे वर्ष खूपच शिकवणारे असेल.
सगळी आकडेवारी एकसारखी नसते!
सकल देशांतर्गत उत्पादनासंबंधित (जीडीपी) आकडेवारी चांगली आली तर बाजार तेजीच्या दिशेने झेपावतात असे आपण अनुभवले आहे. आता मात्र प्रतीक्षा आहे ती कंपन्यांच्या तिमाही आर्थिक कामगिरी आणि अर्थसंकल्पाची. ‘मॅरिको’ या कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल आशादायक ठरले आहेत. दिवाळीनंतर शहरी आणि ग्रामीण बाजारपेठेतील खर्च करण्याची क्षमता घटली आहे, असा सूर ग्राहकोपयोगी (एफएमसीजी) कंपन्यांच्या शीर्ष व्यवस्थापनाकडून आळवला जात होता. त्याला या तिमाहीत आळा बसेल आणि पुन्हा बाजार वरच्या दिशेने झेपावेल, अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा >>> धन जोडावे : शेअर बाजारात अस्थिरतेची नांदी?
जागतिक बाजारातील खनिज तेलाच्या किमती हा एकूणच बाजारांसाठी चिंतेचा विषय ठरणार आहे. जागतिक भूराजकीय अस्थिरता लवकर संपेल अशी कोणतीही चिन्हे नसल्याने ७५ डॉलर प्रतिपिंपावर पोहोचलेले क्रूड ऑइल ८० च्या पलीकडे गेले तर त्याचा थेट फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार हे निश्चित. अमेरिकी शेअर बाजार २५ टक्के परतावा देत आहे, म्हणजे अमेरिकेची अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत आहे, असे सरसकट अनुमान काढता येणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारचा शंभर दिवसांचा आराखडा जाहीर झाला आणि तो प्रत्यक्ष शंभर दिवसांनंतर नक्की किती साध्य झाला यावरून पुढच्या तीन ते सहा महिन्यांचा अंदाज बांधता येईल. जेवढे अमेरिकेतील व्याजदर वाढतील तसे भारतीय शेअर बाजार परदेशी गुंतवणूकदारांसाठी कमी आकर्षक ठरणार आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसाठी ही बाब निराशाजनक ठरू शकते.
हेही वाचा >>> माझा पोर्टफोलिओ: वस्तू खरेदी-विक्रीचा लाभदायी विश्वासू मंच, इंडियामार्ट इंटरमेश लिमिटेड (बीएसई कोड ५४२७२६)
भांडवली खर्चाला पर्याय नाही
केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा भांडवली खर्चात वाढ होण्याची बाजाराला अपेक्षा आहे. जोपर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक आणि खर्च वाढत नाहीत तोपर्यंत बाजारात दीर्घकाळ टिकेल अशी तेजी येणार नाही हे आपण आता मान्य करायला हवे. आघाडीच्या पाचशे कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणावर रोखता उपलब्ध आहे, मात्र कंपन्यांकडून विस्ताराच्या योजना आखल्या जात नाहीत. कारण विक्रीमधील वाढ नक्की होईल की नाही याची कंपन्यांना खात्री दिसत नाही. ज्या क्षेत्रात सरकारी टेकू लावले जातात, तेच क्षेत्र वर जाते हा मागच्या तीन वर्षांचा अनुभव आहे. यामुळे येत्या काळात सरकारची खर्च करण्याची कटिबद्धता ही प्रत्यक्षात उतरते की नाही हे पाहायला लागेल. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींसाठी हा विषय का महत्त्वाचा आहे, हे समजून घ्यायला हवे. वाढलेला महागाई दर पाहता रिझर्व्ह बँकेला व्याजदर कपात करणे कितपत शक्य आहे? तसे नसेल तर व्यवस्थेत तरलता निर्माण करण्यासाठी भांडवली खर्चात वाढ करण्याशिवाय कोणताच पर्याय नाही
येत्या आठवड्यात येणारी अर्थव्यवस्थेबद्दलची पुढील आकडेवारी आपल्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. मंगळवारी देशाच्या विकासदराबाबत आकडेवारी जाहीर होणार आहे तर गुरुवारी अमेरिकेतील महागाई आणि बेरोजगारीचा लेखाजोखा प्रकाशित होईल.
हायब्रिड फंडांचा विसर पडायला नको! भारतीय गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचे सर्व पर्याय संपले असून आता हाच भरवशाचा एकमेव पर्याय आहे, असा विचार करून इक्विटी फंडात पैसे ठेवायला सुरुवात केली. याच म्युच्युअल फंडातील हायब्रिड हा पर्याय का महत्त्वाचा आहे? हे पुढच्या एक ते दीड वर्षात गुंतवणूकदारांना नक्की समजेल. हायब्रिड इक्विटी फंडात, बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड प्रकारच्या पर्यायात गुंतवणूक केल्यास अस्थिर बाजारतही आपल्याला बँकांमधील पारंपरिक पर्याय असलेल्या मुदत ठेवींपेक्षा अधिक परतावा मिळू शकतो. समाप्त