डॉ. आशीष थत्ते
कॅनफिनाच्या घोटाळ्यात केतन पारेख याचे नाव जरी आले तरी मनात काहीतरी वेगळेच चालले होते. त्यातच हर्षद मेहतांचा घोटाळादेखील उघडकीस आला होता. म्हणजे तसा पुढच्यास ठेच आणि मागच्याने शहाणे होणे गरजेचे होते. पण घोटाळेबाजांच्या मनात काहीतरी वेगळेच चालते. हर्षद मेहताने जे केले त्यापासून धडा घेऊन त्याला सुधारायचे नव्हते तर अशा सुधारणा करायच्या होत्या, ज्यामुळे तो पकडला जाऊ नये! म्हणून आधी समजून घेऊया की, हर्षद मेहता काय करत होता. दुसऱ्याचे पैसे शेअर बाजारात लावून समभागांचे भाव कृत्रिमरीत्या वाढवणे अशा प्रकारे हर्षद मेहता काम करत होता. त्यातही दुसऱ्यांचे म्हणजे बँकांचे पैसे तेसुद्धा गैरमार्गाने मिळवून समभागांमध्ये लावून एक प्रकारची हवा बनवायची आणि शेअरचा भाव वाढला की, शेअर विकून मोकळे व्हायचे. बरे हा व्यवहार शे- दोनशेचा नसून हजारो कोटींचा करायचा.
हेही वाचा >>> Money Mantra : मार्ग सुबत्तेचा : आरोग्य निधीचे आर्थिक नियोजन
केतन पारेखलासुद्धा हेच करायचे होते, पण थोड्याशा सुधारणा करून. त्यासाठी त्याने माहिती, दूरसंचार आणि मनोरंजन क्षेत्र निवडले. त्याच्या दृष्टीने ही वाढणारी क्षेत्रे होती आणि परदेशी गुंतवणूकदारांना त्यातच अधिक रस होता. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदार आणि त्यांच्या भावना याबद्दल त्याला काही अप्रूप नव्हते. पण परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार त्याला खुणावत होते आणि तोदेखील त्यांच्या थेट संपर्कात होता. त्याला हे माहीत होते की, परदेशी गुंतवणूकदार ज्या समभागांमध्ये जास्त उलाढाल असते तिथे गुंतवणूक करतात. मग काय त्याने आणि त्याच्या दलाल मित्रांनी ठरवलेल्या समभागांची एकमेकांच्यातच उलाढाल सुरू केली. एकाने ज्या भावात घ्यायचे आणि त्याच भावात दुसऱ्याला विकायचे मग तिसऱ्याने पण त्याच भावात दुसऱ्याकडून घ्यायचे आणि चौथ्याला विकायचे आणि मग पहिल्याने ते परत विकत घ्यायचे.
हेही वाचा >>> Money Mantra : नॉमिनेशन नुसार मिळालेल्या संपत्तीवर नॉमिनीचा कायदेशीर हक्क असतो का?
म्हणजे ना नफा-ना तोटा पण उलाढाल मात्र प्रचंड दाखवायची. मग परदेशी संस्थामक गुंतवणूकदारांना ही उलाढाल दाखवून त्यांना त्या समभागांमध्ये पैसे गुंतवायला सांगायचे. या समभागांना के-१० म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यात झी टेलिफिल्म्स, टिप्स, मुक्ता आर्टस्, पेंट मीडिया ग्राफिक्स यांचा समावेश होता. या उलाढाली तो प्रामुख्याने कोलकाता स्टॉक एक्सचेंजमध्ये करायचा जिथे सरकारचे नियंत्रण आणि लक्ष इतरांपेक्षा थोडे कमी होते. थोडे पैसे मिळवून गप्प बसेल तर तो घोटाळेबाज कसला किंवा एकदा घोटाळा केला की मनुष्य त्या दुष्टचक्रामध्ये अडकून जात असावा. केतन पारेखचा अतिलोभीपणा वाढतच चालला होता. ज्याचे भाव तो वाढवत होता त्याच्या प्रवर्तकांकडेसुद्धा तो पोहोचला आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन कृत्रिमरीत्या भाव वाढवू लागला. कंपनीचे प्रवर्तकसुद्धा आपला हिस्सा विकण्यापूर्वी अशा प्रकारे भाव वाढवून घ्यायचे आणि नफा कमवायचे. पण नक्की गुन्हा कुठे झाला आणि तो कसा उघडकीला आला ते बघू पुढल्या भागात.
@AshishThatte
ashishpthatte@gmail.com
लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत.