प्रमोद पुराणिक
भारतीय युनिट ट्रस्ट अर्थात यूटीआय या संस्थेचे मनोहर जे. फेरवाणी १९८४ ते १९९० अशी ६ वर्षे अध्यक्ष होते. चालणाऱ्या संस्थेला अतिशय वेगाने पळवण्याचे काम त्यांनी केले आणि त्यामुळे बाजारात संस्थेला एक नावलौकिक तर मिळालाच, पण त्यामुळे बाजाराची प्रगतीही झाली. या माणसाचे बाजारावर वादातीत प्रभुत्व होते.
आर्थिक क्षेत्राचा दांडगा अनुभव फेरवाणी यांच्या पाठीशी होता. वर्ष १९६४ ला संस्थेची स्थापना झाली होती, परंतु २० वर्षे होऊनसुद्धा भारतीय यूनिट ट्रस्ट बाल्यावस्थेतच होती. योगायोग सगळे जुळून जसे येतात, त्याप्रमाणे वर्ष १९८४ ला फेरवाणी तिचे अध्यक्ष झाले. वर्ष १९८५ ला तत्कालीन अर्थमंत्री व्ही.पी. सिंग यांनी जो अर्थसंकल्प सादर केला, तितक्या ताकदीचा नवा विचार देणारा अर्थसंकल्प आजपर्यंत तरी कोणीही दिलेला नाही, हे माझे प्रांजळ मत आहे. या पायावरच ट्रस्टने १९८६ ला संपूर्णपणे शेअर बाजारात गुंतवणूक असलेली योजना बाजारात आणली.
हेही वाचा >>> Money Mantra : क्षेत्र अभ्यास : नवतेचा चेहरा – माहिती तंत्रज्ञान उद्योग
ए.पी.कुरियन वर्ष १९७५ मध्ये यूटीआयमध्ये गुंतवणूक संचालक (डायरेक्टर इन्व्हेस्टमेंट) म्हणून रुजू झाले होते, परंतु यूटीआयकडे विपणनाची टीम तयार नव्हती. त्यावेळचे यूटीआयचे अध्यक्ष जेम्स राज यांनी कुरियन साहेबांवर ही नवी जबाबदारी टाकली आणि मग नंतर नियोजन आणि विकास हा नवीन विभाग सुरू झाला. या विभागात माणसे किती तर दोन. एक स्वतः कुरियन आणि दुसरा त्यांचा सहाय्यक होता. त्यांनी कामाला सुरुवात केली आणि फेरवाणींसारखा धाडसी आक्रमक अध्यक्ष संस्थेला मिळाला.
एक दिवस एका शाखेचे उद्घाटन करण्यासाठी जात असताना कुरियन यांनी फेरवाणी यांना मास्टर शेअर ही संकल्पना सांगितली. या नव्या योजनेचे नावसुद्धा ठरले होते. दि शेअर ऑफ शेअर आणि पुढे नंतर १९ सप्टेंबर १९८६ ला बाजारात नोंदणी असलेली ७ वर्षे मुदतीची क्लोज एंडेड योजना यूनिट ट्रस्टने आणली. ५० कोटी रुपये गोळा करण्याचे उद्दिष्ट ठरवलेले होते. प्रत्यक्षात १५० कोटी रुपये जमा झाले. अर्थखात्याकडून ही अतिरिक्त रक्कम ठेवण्याची परवानगी मिळवणे, हा तर फेरवाणींचा पहिला विजय होता. यानंतर वर्ष १९८७ मध्ये बाजारात मंदी आली, परंतु ८६ ते ९३ या ७ वर्षांत जे मास्टर शेअरने दिले ते कोणीही देऊ शकणार नाही.
“झाले बहु होतील बहु परंतु या सम हा” अलीकडे या योजनेचे यूटीआय लार्ज कॅप असे नाव झाले आहे. क्लोज एंडेंड योजनेनंतर खुली योजना झाली. हा सर्व मोठा इतिहास आहे, परंतु मास्टर शेअरची कथा सांगणे हा लेखाचा हेतू नाही.
फेरवाणींनी काय केले, तर डीएसपी मेरिल लिंच या संस्थेबरोबर इंडिया फंड नावाची योजना आणली. हा खूप धाडसी उपक्रम होता. अनिवासी भारतीय आणि भारतात जन्मलेले परंतु परदेशात वास्तव्य असलेले (पीओआय) आणि वित्त संस्था यांच्यासाठी हा फंड आणला. त्याद्वारे आलेला पैसा भारतीय भांडवल बाजारात गुंतवण्यात आला. हे काम त्याअगोदर कोणालाही सुचलेले नव्हते. या फंडाच्या युनिट्सची लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणी करण्यात आलेली होती.
हेही वाचा >>> Money Mantra : माझा पोर्टफोलियो : सर्वप्रिय नाममुद्रांचे बळ
परदेशातला पैसा भारतीय शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी आणणे हे एक मोठे धाडस त्या काळात फेरवाणी यांनी केले, परंतु त्याचबरोबर भारतामध्ये ग्रामीण भागातून यूटीआयच्या योजनासाठी गुंतवणूक आणणे, हे परदेशी गुंतवणूक आणण्यापेक्षाही जास्त धाडसाचे होते. ते करण्यासाठी ग्रामीण भागात ज्या कंपन्यांची पाळेमुळे खोलपर्यंत रुजलेली आहे, अशा खताचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि पेट्रोल, डिझेलची विक्री होते, त्याठिकाणी युनिट ट्रस्टची जाहिरात लावणे, यूनिट ट्रस्टच्या योजनांची विक्री करण्यासाठी पेट्रोल वितरकांना यूटीआयचे एजंट बनवणे, पेट्रोल पंपावर फॉर्म ठेवणे अशा प्रकारे कोणलाही सुचणार नाही, अशा पद्धतीने गावोगावी, खेडोपाडी गुंतवणूक संस्कृती रुजवण्याचे काम कोणी केले असेल, तर ते यूटीआय या संस्थेने केले आणि त्या पाठीमागे फेरवाणी यांची प्रेरणा होती.
दरवर्षीच्या पत्रकार परिषदा यशस्वीपणे करण्याचे कौशल्य फेरवाणींकडे होते. त्यांच्या कारकीर्दीत या संस्थेचा १९९० ला रौप्य महोत्सव साजरा झाला. अर्थसंकल्पात यूटीआयचा उल्लेख नाही असा एकही अर्थसंकल्प या ६ वर्षांत आला नाही आणि आता अर्थसंकल्पाचा यूटीआयचा काहीही संबंध नाही. या रौप्य महोत्सवी वर्षात यूटीआय संस्थेची ८७ टक्के वृद्धी झाली आणि संस्थेची गुंतवणूक मालमत्ता १२ हजार कोटी रुपयांवर पोहोचली. या चार वर्षांत युनिट ट्रस्टने अनेक नव्या संस्थांना जन्म दिला, त्या संस्थांची फक्त नावे प्रसिद्ध करीत आहोत. कारण पुन्हा प्रत्येक संस्थेविषयी लिहिण्यासारखे बरेच काही आहे .
१) इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग ॲण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (आयएलअँडएफएस- वर्ष १९८६),
इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पासाठी वित्तपुरवठा उभा करणे.
२) क्रेडिट रेटिंग ॲण्ड इन्फाॅर्मेशन सर्व्हिसेस लिमिटेड (क्रिसिल – वर्ष १९८७)
भारतातील पहिली पत मानांकन करणारी संस्था.
३) स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसएचसीआयएल – वर्ष १९८७)
पहिली आणि सर्वांत मोठी कस्टोडियन म्हणून काम करणारी संस्था.
४) टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इंडिया (टीडीआयसीआय- वर्ष १९८६)
देशातील पहिली उद्योगांसाठी भांडवल देणारी संस्था.
५) ओव्हर द काउंटर एक्सचेंज ऑफ इंडिया (ओटीसी -वर्ष १९९०)
६) नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल – वर्ष १९९५) आणखी बऱ्याच संस्थांची नावे देता येतील. मात्र एवढी प्रचंड ताकद, दूरदर्शीपणा असणाऱ्या व्यक्तीबाबत विपरीत का घडावे? या प्रश्नाला उत्तर उपलब्ध नाही. म्हणून फक्त वर्ष १९८४ ते १९९० हा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला इतिहास शब्दबद्ध केला आहे. मुंबईच्या एका कार्यक्रमात सहजपणे पण टोचेल अशी टीका केली. वित्त संस्थांच्या अध्यक्षांनी देशातल्या मोठ्या शहरामध्ये भांडवल बाजाराच्या प्रगतीसाठी भाषणे करण्याऐवजी नाशिकसारख्या छोटया गावात यावे आणि फेरवाणी यांच्या अध्यक्षतेखाली ३१ मार्च १९८८ ला नाशिकला गुंतवणूकदार मेळावा झाला. भांडवल बाजाराशी आणि आर्थिक क्षेत्राशी जोडला गेलेला एक आर्थिक पत्रकार म्हणून फक्त ६ वर्षांचा इतिहास मांडला.