लेखाचा मथळा विचित्र वाटेल. स्वाभाविकच तो तसा का, याचे स्पष्टीकरण थोडक्यात द्यावे लागेल. उत्पल शेठचे वडील हेमेंद्र शेठ हे निमेश कम्पानी यांच्या नरिमन पॉइंट येथील कार्यालयात पोर्टफोलिओ मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख होते. १९८५ मध्ये दिवस त्यांच्या कार्यालयात गेल्यानंतर गुजरात अम्बुजा सिमेंट या कंपनीच्या शेअर्सची बाजारात नोंदणी करण्यासाठी प्रारंभिक विक्री सुरू झाली होती. हेमेंद्र शेठ त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला या कंपनीच्या शेअर्स विक्रीला अर्ज का करायला हवा हे समजावून सांगत होते. कंपनीच्या व्यवस्थापनाला सिमेंटचा प्रकल्प चालवण्याचा अनुभव नाही हे जरी मान्य असले तरी ही कंपनी सिमेंट उत्पादनाच्या क्षेत्रात नावारूपाला येईल. कारण सिमेंटची वाहतूक ही कंपनी समुद्रमार्गे करणार आहे, त्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होईल. एफएमसीजी कंपन्या आपल्या वस्तू जाहिरात करून विकतात त्याप्रमाणे ही कंपनी सिमेंट उत्पादन भविष्यात विकणार आहे आणि त्याचबरोबर सरदार सरोवरच्या बांधकामाला मोठ्या प्रमाणात सिमेंट लागणार आहे. त्यानंतर या कंपनीने इतिहास निर्माण केला तो आपल्यापुढे आहेच. पण तो विषय बाजूला ठेवून मुख्य विषयावर लक्ष केंद्रित करू. हेमेंद्र शेठ यांनी पुढे मुंबई शेअर बाजाराचे कार्ड खरेदी करून शेअर दलाल म्हणून कामास सुरुवात केली. नोकरी करताना पाठीशी जेएम सुरक्षा चक्र होते ते राहिले नाही. पण शेअर बाजाराच्या जवळच्या इमारतीत आपले कार्यालय सुरू करून त्यांनी चांगला पैसा कमावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> भेटी करपात्र आहेत का?

वडिलांच्या फर्मसाठी उत्पलने शेअर्स खरेदी- विक्रीऐवजी शेअर विश्लेषक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. हेमेंद्र शेठ यांच्या फर्मचे उपदलाल म्हणून नाशिकला काम करण्याचा प्रस्तुत लेखकाचा काही वर्षे व्यवसाय होता हे या ठिकाणी नमूद केले पाहिजे. १९९३ ला उत्पल नाशिकला आला. नाशिक ओझर चॅप्टर ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स या संस्थेने आयोजित केलेल्या सेमिनारमध्ये हा तरुण पोरगा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट या विषयावर एवढे सुरेख बोलला की, त्याला नाशिक शेअर ब्रोकर असोसिएशन या दुसऱ्या संस्थेने पुन्हा व्याख्यानाला बोलावले. १९९५ ला मार्च महिन्यात त्याने उपदलालांपुढील व्याख्यानांत, उपदलालांसाठी असलेले सेबीचे नियम, उपदलाल व्यवसायाचे भवितव्य यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन केले. मधली काही वर्षे संपर्क राहिला नाही, परंतु उत्पल सेठ पुन्हा प्रकाशझोतात आला. राकेश झुनझुनवाला यांच्या रेअर एंटरप्रायझेस या संस्थेचा वरिष्ठ भागीदार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राकेश हयात असेपर्यंत राकेशचा उजवा हात म्हणून उत्पलने काम बघितले. राकेशला माणसाची पारख होती.

उत्पलने सिडनेहॅम कॉलेजमधून बी.कॉम. पदवी घेतली, आयसीडब्लूए पूर्ण केले, सीएफए या परीक्षेत तर त्याने सुवर्णपदक मिळविले, परंतु हे सर्व असतानासुद्धा तो पडद्यामागे राहिला. कारण त्याची आवड शेअर्स विश्लेषक हीच होती. राकेशकडे जाण्याअगोदर उत्पलने एनाम फायनान्शियलमध्ये काम केले. पुन्हा या ठिकाणी हे स्पष्ट करायला हवे की, एनामचे निमेश शाह आणि वल्लभ भन्साळी ही जोडी म्हणजे बाजारातली चित्रपट सृष्टीतल्या सलीम जावेदसारखी जोडी होती. व्यवहार निमेशने सांभाळायचा तर वल्लभने कंपनीच्या ताळेबंदाची चिरफाड करायची. उत्पलने एएसके, असित, कोटेचा यांच्याकडेसुद्धा काम केले. राकेश आणि उत्पल यांची या ठिकाणी भेट झाली आणि उत्पलचा नवा प्रवास सुरू झाला.

हेही वाचा >>> बाजारातली माणसं : हेज फंड बाजारातली एक रहस्यकथा – डेव्हीड शॉ

विचारपूर्वक निर्णय घेणारा, कॉकटेल पार्ट्यापासून दूर राहणारा अशा उत्पलने टायटनचे बंगलोर कार्यालय गाठले. टायटनचा अभ्यास केला. राकेशने ताबडतोब मोठ्या प्रमाणात शेअर्सची खरेदी केली. कारण राकेशचे नेहमी सांगणे असायचे – ‘थोडे जास्त पैसे गेले तरी चालेल पण व्यवहार लवकरात लवकर पूर्ण करा. इतरांना विचार करायला वेळच मिळायला नको.’ राकेशने टायटनमध्ये प्रचंड पैसा कमावला हे लिहिण्याची आवश्यकता नसावी. आणखी मेट्रो शूज, भारत अर्थमूर्व्हस, प्राज इंडस्ट्रीज, दारू निर्मितीच्या कंपन्या अशा अनेक कंपन्यांचा उल्लेख करता येईल.

अलीकडे उत्पलने १२३ कोटी रुपये खर्च करून वरळीला १५,७३५ चौरस फुटाचा मोठा फ्लॅट खरेदी केला. त्या फ्लॅटला ८८४ फुटाची बाल्कनी आहे. या इमारतीचे वेगळेपण… शेअर बाजारातल्या अनेक नामांकित व्यक्तींचे तेथे फ्लॅट्स आहेत एवढे लिहिणे पुरेसे आहे.

ॲप्टेक, सिनेमॅक्स या कंपनीच्या संचालक मंडळात उत्पल आहे. चेतन पारिख आणि नवीन अगरवाल यांना बरोबर घेऊन ‘इंडियाज् मनी मोनार्क्स’ हे पुस्तक त्याने प्रकाशित केले आहे. निपा ही चांगली सहचारिणी त्याला मिळाली आहे.

मार्च २००० ला त्याने ट्रस्ट समूह अशा समूहाची स्थापना केली. ऑक्टोबर २०१९ ला ट्रस्ट म्युच्युअल फंडाची सुरुवात झाली ज्या विषयामध्ये उत्पलला विशेष रुची आहे असे गुंतवणूक व्यवस्थापन, वित्तपुरवठा साहाय्य, विलीनीकरण योजना, शेअर्स पुनर्खरेदी या सर्व बाबींचा त्याला चांगला अनुभव असल्याने त्याचा उपयोग होऊ शकेल.

आता थोडेसे म्युच्युअल फंडाविषयी.

गेल्या २/४ वर्षांत कोणत्या संस्थांनी म्युच्युअल फंडाच्या व्यवसायात पदार्पण केले. याचा जर धावता आढावा घेतला तर त्यावरून एक नित्कर्ष असा काढता येईल की, फक्त काही मोठ्या गुंतवणूकदारांसाठी पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सेवा देणाऱ्या संस्थांना छोट्या गुंतवणूकदारांसाठी आपल्याकडे म्युच्युअल फंड ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असावी, अशी इच्छा निर्माण झालेली आहे. त्याची कारणे बरीच असू शकतील. परंतु मुख्य कारण असे आहे की मोठ्या गुंतवणूकदारांच्या तुलनेने छोटे गुंतवणूकदार फंडाशी योजनांशी एकनिष्ठ राहतात. त्याचा जास्त फायदा होतो. आणि म्हणून दीर्घकालीन विचार करता उत्पलने म्युच्युअल फंड व्यवसायात पदार्पण केले हे चांगले झाले. सुरुवातीला कर्जरोख्यांशी संबंधित ज्याला ऋणपत्रांच्या योजना असे वर्गीकरण आहे. अशा योजना आल्या तेसुद्धा योग्य झाले. अलीकडेच स्मॉल कॅप ही योजना ट्रस्ट म्युच्युअल फंडाने आणली मिहिर व्होरा हे या एएमसीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत. स्मॉल कॅपच्या योजनेमुळे जर या फंडाने छोट्या गुंतवणूकदारांना इतर योजनांच्या तुलनेने जास्त चांगली भांडवलवृद्धी मिळवून दिली, तरच उत्पल शेठच्या ३०/४० वर्षांचा अनुभवाचा छोट्या गुंतवणूकदारांना लाभ होईल. तो व्हावा ही अपेक्षा.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about utpal sheth portfolio rare enterprises ceo utpal sheth print eco news zws