शुक्रवार ६ ऑक्टोबर रोजी रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा निर्णय जाहीर झाला आणि बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे रिझर्व्ह बँकेने कोणतेही व्याजदरामध्ये वाढीचे संकेत दिले नाहीत. यामुळे खरेदीदारांचा उत्साह कायम राहिला आणि सलग दुसऱ्या दिवशी निफ्टी अर्धा टक्का वाढून १९६५३ वर बंद झाला.
सेन्सेक्समध्ये ३६४ अंशांची वाढ होऊन तो ६५९९५ वर बंद झाला. रेपो रेट न बदलणे बाजारासाठी समाधानकारक मानले जात आहे. एकंदरीत आठवड्याचा विचार केला तर बाजार फ्लॅट राहिले.
हेही वाचा… Money Mantra : ICICI बँकेकडून फेस्टिव्ह बोनांझाला सुरुवात, तुम्हाला २६००० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार
बजाज फिन्सर्व, बजाज फायनान्स, टायटन कंपनी, इंडसइंड बँक, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट या शेअर्समध्ये वाढ झालेली दिसली. तर हिंदुस्थान युनिलिव्हर, ओएनजीसी, कोल इंडिया, भारती एअरटेल, एशियन पेंट या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झालेली दिसली.
सेक्टरचा विचार
माहिती तंत्रज्ञान (आयटी), एफएमसीजी, मेटल, ऑटो, पॉवर, हेल्थकेअर या सेक्टरमध्ये एक टक्क्यापर्यंतची तेजी दिसली तर आठवड्याचा हिरो ठरला तो BSE रियालिटी इंडेक्स. त्यामध्ये तीन टक्क्याची घसघशीत वाढ झालेली दिसली. कंपन्याच्या आकारमानानुसार विचार करता मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये हलकी तेजी आलेली दिसली. मिडकॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्स अर्ध्या टक्क्यांनी वर गेले.
५२ आठवड्यातील सर्वोच्च पातळी!
या आठवड्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस हा लार्ज कॅप शेअर धरून जवळपास अडीचशे कंपन्यांच्या शेअर्सनी 2 Week High म्हणजेच ५२ आठवड्यातील सर्वाधिक भावाची पातळी नोंदवली. या आठवड्यात बाजाराशी संबंधित कंपन्यांनी येत्या सहा महिन्यात सकारात्मक वाढीचे संकेत दिले आहेत. जेएसडब्ल्यू ग्रुप, एमजी मोटर्स या आलिशान गाड्यांच्या निर्मिती करणाऱ्या कंपनीत 35 टक्के हिस्सेदारी घेण्याचा विचार करत आहे.
टीसीएस पुन्हा एकदा बायबॅकच्या तयारीत
गुंतवणूकदारांच्या गळ्यातील ताईत असलेल्या टाटा कन्सल्टन्सी कंपनीने पुन्हा एकदा बायबॅक ऑफर आणायचा विचार केला आहे. मागच्या वर्षी म्हणजे 2022 या वर्षात कंपनीने 18000 कोटी रुपयाचे बायबॅक केले होते. यावर्षी पुन्हा एकदा टीसीएसच्या संचालक मंडळाची बैठक होऊन त्यामध्ये बायबॅकची योजना मांडली जाणार आहे. या फेब्रुवारीमध्ये इन्फोसिसने बायबॅक केले होते व अलीकडेच विप्रो या आयटी कंपनीने सुद्धा बायबॅकद्वारे गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा दिला आहे.
रिझर्व्ह बँकेची पॉलिसी आणि बाजार
रिझर्व्ह बँकेने आपल्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये रेपो रेट जैसे थे ठेवण्याची शिफारस केली असल्यामुळे बँकिंग आणि तत्सम समभागांमध्ये आशादायक चित्र निर्माण झाले आहे. एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक, बजाज फायनान्स, स्टेट बँक, मनपूरम फायनान्स, लार्सन अँड टुब्रो अशा कंपन्यांच्या समभागांमध्ये येत्या आठवड्यात चांगली उलाढाल पाहायला मिळेल असे चित्र आहे.
बातमी आणि बाजारभाव
इंडिगो या कंपनीने इंधनावर अधिभार लावण्याचे जाहीर केल्यामुळे कंपनीचा समभाग वाढला. सरकारी मालकीच्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपनीला नवीन ऑर्डर मिळाल्यामुळे एक टक्क्याने वाढ दिसली. टाटा मोटर्स या कंपनीची उप कंपनी असलेल्या युरोपातील जग्वार लँड रोवर कंपनीने दुसऱ्या तिमाहीच्या विक्रीमध्ये २९ टक्के अशी घसघशीत वाढ नोंदवली. परिणामी टाटा मोटर्स शेअर एक टक्क्यांनी वर गेला गेल्या सहा महिन्यात टाटा मोटरचा शेअर ४० टक्क्यांनी वर गेला आहे याच वेळेला निफ्टी-फिफ्टी इंडेक्सने फक्त ११% ची वाढ दर्शवली आहे.
पुढील आठवड्यापासून कंपन्यांचे अर्धवार्षिक निकाल येण्यास सुरुवात होईल. एप्रिल ते जून या तिमाहीत कंपन्यांनी चांगले निकाल नोंदवले होते. हीच परंपरा कायम राहील तर बाजारांवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल.