कळा ज्या लागल्या जीवा मला की ईश्वरा ठाव्या !

कुणाला काय हो त्यांचे ? कुणाला काय सांगाव्या ?

खरेच भा. रा. तांबे यांनी किती सार्थक वर्णन माझ्या मनाचे केले आहे. संपूर्ण वर्षभर कित्येक घोटाळ्यांविषयी लिहिणे किती त्रासदायक होते, हे फक्त मला आणि ईश्वरालाच माहिती. तरीही या लेखमालेतून थोड्याशा कळा तुम्हाला सांगतो. जगात इतके घोटाळे आहेत की, अजून कित्येक लेखमाला होतील. पण कुठेतरी थांबणे आवश्यक आहे. वर्षभराच्या लेखनाने मला समृद्ध केले आहे पण तितकेच व्यथितही केले. काही घोटाळे असे होते जे घडून गेले होते आणि त्यात काही नवीन आता होण्यासारखे नव्हते, जसे की हर्षद मेहता, केतन पारेख, बेर्नी मेडोफ आणि पॉन्झी इत्यादी. काही घोटाळे असे आहेत ज्यात अजून पुढे जाऊन काहीतरी घडू शकते. कारण त्यांचे अर्जवरील न्यायालयात प्रलंबित आहेत. घोटाळ्यांमधील रकमेने सामान्यांचे डोळे पांढरे होतील. फक्त रकमा नाहीत तर ज्याप्रकारे हे घोटाळे केले गेले तेसुद्धा अकल्पनीय आहेत. आपण अगदी सहजपणे तेव्हा म्हणून जातो की, ‘काय माणसं आहेत ही’

घोटाळे करणारे काही गरीब किंवा श्रीमंत असतात असे नाही, ते सगळ्याच वर्गातून येतात. या सगळ्या घोटाळ्यांमध्ये मात्र एक समानता बहुतांशी दिसून येते, ती म्हणजे असे कपटी लोक नेहमीच स्वतःला सुसंस्कृत, यशस्वी आणि प्रभावी असल्याचे दाखवतात किंबहुना असे असल्याशिवाय त्यांचे आर्थिक घोटाळेच घडू शकत नाहीत. काहींनी आपली जुनी देणी देण्यासाठी किंवा कुणाशी तरी सूड उगवायचा म्हणून घोटाळा केला. आपला आधी केलेला घोटाळा उघडकीस येऊ नये म्हणून पुन:पुन्हा घोटाळे करतात. मोठ्या कंपनीत घोटाळा करणारे तर आपली समजूत करूनच बसले असतात की, त्यांना काय फरक पडतो एवढ्या लहान रकमेने? बहुतेक घोटाळ्यांचा अंत अधिक पैसे कमावण्याची हाव ठेवल्यामुळे होतो. कुठल्याही आर्थिक सल्लागाराला किंवा अधिकाऱ्यालासुद्धा भा. रा. तांबे यांच्या याच कवितेतल्या ओळी लागू पडतात. त्या म्हणजे ‘समुद्रीं चौंकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही’. जर अशी मनोवृत्ती सर्वांचीच बाळगली तर कदाचित घोटाळे कमी होतील.

हेही वाचा >>>रुपया ८५.८१ नवीन तळ गाठून सावरला; तरी सत्रांतर्गत २७ पैशांची घसरण

दिसणारे किंवा होऊ घातलेले घोटाळे थांबणे महाकठीण आहे तरीही कंपन्या, सरकारे आणि प्रत्येक व्यक्तीला जागरूक राहावे लागेल. कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करून अधिकाधिक नियंत्रण ठेवणे, मजबूत कायदे आणि शिक्षा, आर्थिक प्रशिक्षण घेणे, व्यावसायिकांची मदत घेणे असे काही उपाय असू शकतात. कंपन्यांमध्ये आणि सरकारांमध्ये जागल्याचे महत्त्व नेहमीच अधोरेखित झाले आहे. यावर्षी बघितलेले कित्येक घोटाळे हे जागल्यांमुळेच उघड झाले आहेत. सरकार आणि कंपन्यांना तसे कायदे बनवणे किंवा माहिती देणाऱ्याचे रक्षण करणे शक्य झाले तरीही असे घोटाळे कमी होऊ शकतात. घोटाळा झाल्यानंतर बोलून काही उपयोग नसतो, पण त्यापूर्वी त्याची चाहूल लागणे महत्त्वाचे असते. यात नियामकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. कारण घोटाळ्याचा तपास, त्याचे पुरावे आणि मग न्यायालयात ते सिद्ध करण्याचे काम करावे लागते. या लेखमालिकेत आपण भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि घोटाळे पुन्हा होऊ नयेत यासाठी घेतलेली भूमिका बघितली आहे.

कितीही घोटाळे झाले तरीही एक आशेचा किरण असतोच म्हणूनच तर हे जग तरून आहे. पुन्हा एकदा भा. रा. तांबे यांच्या कवितेत सांगायचे तर ‘घन तमी शुक्र बघ राज्य करी’ म्हणजेच कितीही घोटाळे झाले तरी, आपण आपल्या गुंतवणुकीची सवय काही सोडायची नसते. लेखमालिकेला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप आभार. या लेखमालेने वर्षभर तुमचेही ‘वित्तरंजन’ नक्की झाले असेल, अशी आशा बाळगून तुमचा निरोप घेतो.

Story img Loader