जगातील पैशांशी संबंधित असणारी कदाचित पहिली तंत्रज्ञानातील क्रांती म्हणून एटीएम मशीनचा उल्लेख करणे वावगे ठरणार नाही. जॉन शेफेर्ड बर्रोर या माणसाने म्हणजे गुंतवणूकदाराने पहिल्यांदा असे काही तरी मशीन असावे असे मांडले. इंग्लंडमधील बारक्ले बँकेने ही संकल्पना उचलून धरली आणि १९६७ मध्ये जगातील पहिले एटीएम अस्तित्वात आले. अर्थात जॉनच्या टीमनेदेखील त्यात काम केले आणि मशीन विकसित केले. जॉनला बँकेतून पैसे काढण्यास १ मिनीटभर उशीर झाला आणि त्याच्या डोक्यात एटीएमची संकल्पना आली, असे सांगितले जाते. त्या वेळेला पैसे देऊन वस्तू काढण्याचे मशीन अस्तित्वात होते, पण एटीएम नव्हते. २७ जून १९६७ रोजी रेग व्हरने या कॉमेडियनने त्याचे उद्घाटन केले. अर्थात हा काही पहिला प्रयत्न नव्हता. १९६० पासूनच जगात अशी मशीन बनवण्याचे विचार सुरू होते. १९६१ मध्ये न्यूयॉर्क शहरात नाणी आणि नोटा ठेव म्हणून मशीनमध्ये ठेवले जायचे. त्याला बँकोग्राफ असे म्हणण्यात आले आणि त्याच्या रीतसर स्वामित्व हक्काची (पेटंट) नोंदणी करण्यात आली. नंतर जसजसे तंत्रज्ञान पुढे जाऊ लागले तसे त्यात काही नवनवीन शोधदेखील लागले, जसे जपानमध्ये यंत्राच्या माध्यमातून कर्ज देण्याची सुरुवात झाली होती.

पहिल्या एटीएममध्ये पैसे मिळवायचे असतील तर बँकेकडून आधीच पेपर चेक घेऊन ठेवावे लागत असे. मग त्यानंतर त्यातून पैसे मिळत होते. म्हणजे आतासारखी कार्डची पद्धत अस्तित्वात यायला वेळ होता. त्याच्याच पुढल्या वर्षी पिनची संकल्पना प्रत्यक्षात आली. तीसुद्धा जॉन शेफेर्ड बर्रोरच्या पत्नीला ६ आकडी क्रमांक लक्षात ठेवणे कठीण होते म्हणून तेव्हापासून ४ आकडी पिन वापरला जातो. आता तर एटीएम मशीन जणू स्वतःच एक बँक म्हणून काम करते. एटीएम मशीन बहुतेक वेळेला गर्दीच्या ठिकाणी किंवा बँकेच्या बाहेरच ठेवले जाते, पण पाकिस्तानात खुन्जेराब पास इथे चक्क समुद्रसपाटीपासून ४६९३ मीटर उंचीवर एटीएम मशीन बसवले गेले आहे. ते कदाचित जगातील सगळ्यात उंच ठिकाणी बसवलेले एटीएम असावे. जगात अमेरिका, रशिया, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांचा प्रति एक लाख लोकसंख्येमागे सर्वाधिक एटीएम केंद्रे असण्याचा मान आहे. २०१७ च्या जागतिक बँकेनुसार प्रति एक लाख लोकसंख्येसाठी सुमारे १५० पेक्षा अधिक एटीएम केंद्रे या देशांमध्ये आहेत.

हेही वाचा – मार्ग सुबत्तेचा : नुकसान व्यवस्थापन

हेही वाचा – जाहल्या काही चुका… : दरवळतो पुरिया…

आता तुम्ही म्हणाल, माहिती चांगली होती, पण भारताचा याच्याशी फार काही संबंध दिसत नाही. तर एटीएम ही संकल्पना आणणाऱ्या जॉन बर्रोर यांचा जन्म २३ जून १९२५ रोजी मेघालयातील शिलाँगमधील गॉर्डन रॉबर्ट हॉस्पिटलमध्ये भारतात झाला होता. त्यांचे वडील चित्तगावमधील पोर्टमध्ये काम करत होते. त्यांची आई डोरोथी या ऑलिम्पिकमधील टेनिस खेळाडू आणि विम्बल्डनच्या महिला दुहेरी विजेत्या होत्या. एटीएमचा शोध नाही, पण त्याच्या जनकाचे जन्मस्थळ मात्र भारत होते.

लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाऊंटंट म्हणून कार्यरत
…………………….
ashishpthatte@gmail.com

@AshishThatte

Story img Loader