डॉ. आशीष थत्ते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतातील पहिले एटीएम अर्थातच भारताची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबईतील अंधेरी येथे बसवण्यात आले. हाँगकाँग अँड शांघाय बँकेने त्याची सुरुवात केली. इंडियन बँक असोसिएशनचे भारतातील एटीएमचे जाळे विस्तारण्यास सुरुवात केली, ज्याचे नाव स्वधन असे होते. नंतर ते बंद होऊन एका नवीन नेटवर्कची निर्मिती करण्यात आली. सुरुवातीला सर्वच एटीएममधून पैसे काढणे मोफत होते. मात्र नंतर ते महाग होऊन आता पैसे काढण्यासाठी बँकेला शुल्क द्यावे लागते. एका अंदाजानुसार २०२१ मध्ये भारतात एकूण २,३८,००० एटीएम होते. यापैकी बहुतांश गर्दीच्या ठिकाणी किंवा बँकेच्या बाहेर आहेत. तरीही काही एटीएम थोडेसे वेगळे आहेत, कारण ते चक्क तरंगते आहेत.

हेही वाचा >>> ‘इन्शुरन्सदेखो’ची १५ कोटी डॉलरची निधी उभारणी

२०२१ मध्ये स्टेट बँकेने जम्मू काश्मीर येथील दल लेकमध्ये तरंगते एटीएम सुरू केले. त्यापूर्वी २००४ मध्ये असेच एक तरंगते एटीएम केरळ येथे एर्नाकुलम व व्यापीन या दोन शहरांच्या मध्ये चक्क एका बोटीत सुरू करण्यात आले होते. भारतीय लष्कराच्या सोयीसाठी काही अधिक उंचीच्या ठिकाणीदेखील एटीएम बसवण्यात आले आहेत. एका अंदाजानुसार शनिवार किंवा रविवारपेक्षाही शुक्रवारच्या दिवशी सगळ्यात जास्त रोख एटीएममधून काढली जाते. आता आंतरराष्ट्रीय डेबिट आणि क्रेडिट कार्ड्समुळे परदेशातही आपण तेथील एटीएम वापरू शकतो. आफ्रिकेतील एरिट्रिया नावाच्या देशात एकही एटीएम मशीन नाही; पण अख्खा देश फक्त रोख रकमेवर चालतो आणि महिन्यातून एका व्यक्तीला फक्त ५,००० नाकफा (स्थानिक चलन) काढण्याची मुभा आहे, तेही बँकेतूनच.

बऱ्याच ठिकाणी एटीएम केंद्रावर सुरक्षारक्षक नसल्यामुळे खूप वेळा चोरीचे प्रकार घडतात. एटीएम वापरताना ग्राहकांनी सावधानता बाळगली पाहिजे. रिझर्व्ह बँक वेळोवेळी बँकेच्या ग्राहकांसाठी मार्गदर्शक सूचना देत असते. जर कुणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला तर काही एटीएममध्ये निळ्या रंगाची शाई बसवलेली असते, जी लगेचच नोटांवर पसरून त्या नोटांची उपयुक्तता नष्ट करते. तुमच्या कार्डाची हुबेहूब नक्कल (क्लोनिंग) करून एटीएमच्या नंबर पटलावर छोटासा कॅमेरा बसवूनदेखील पैशांची अफरातफर केली जाऊ शकते.

हेही वाचा >>> एटीएम’ आणि त्याचा जागतिक इतिहास

एटीएमसंबंधित सर्वाधिक गुन्हे कधी बिहारमध्ये तर कधी तरी महाराष्ट्रात घडतात. एटीएममध्ये असणारी वातानुकूलित यंत्रणा ग्राहकाला संतुष्ट करण्यासाठी नसून एटीएम मशीन सुरळीत चालावे म्हणून असते. एटीएममध्ये सुमारे ८८ लाख रुपये एका वेळी ठेवता येतात; पण भारतात मध्यवर्ती बँकेच्या आदेशानुसार, एका वेळी जास्तीत जास्त १२ लाख रुपये एटीएममध्ये ठेवायला परवानगी आहे. भारतात आणि जगात १२३४ हा सर्वाधिक वापरला जाणारा क्रमांक आहे. तर सगळ्यात कमी ८०६८ हा क्रमांक आहे. काही समाजमाध्यमांमध्ये सांगितले जाते की, उलटा पिन क्रमांक टाकला तर जवळच्या पोलीस स्टेशनला त्याची माहिती मिळते. हा समज चुकीचा आहे. मात्र एखाद्या खोडसाळ चोराने चक्क एटीएम मशीन चोरण्याचा प्रयत्न केला तर लगेचच पकडला जाऊ शकतो; कारण सर्व एटीएम केंद्रे जीपीएसने सुरक्षित केलेली असतात. पुढील वेळेला एटीएममध्ये जाताना या लेखाची आठवण ठेवा!

लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाऊंटंट म्हणून कार्यरत

ashishpthatte@gmail.com

@AshishThatte

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atms in india evolution of atm technology in india first atm in india zws