भारतातील आघाडीची दुचाकी निर्मिती क्षेत्रातील कंपनी ‘बजाज ऑटो लिमिटेड’ चे पहिल्या तिमाहीचे (एप्रिल २०२३ ते जून २०२३) नफ्याचे आकडे आज २५ जुलै २०२३ रोजी जाहीर झाले. जून २०२३ अखेरीस संपलेल्या पहिल्या तिमाहीत बजाज ऑटोचा नफा १६६५ कोटी रुपये एवढा होता. मागच्या आर्थिक वर्षातील याच कालावधीशी तुलना केल्यास (मागच्या वर्षीचा तिमाही नफा ११७३ कोटी ) हा नफा ४२ टक्क्यांनी वाढलेला दिसतो. मुख्य व्यवसायातून कंपनीला मिळालेला रेव्हेन्यू १०३१० कोटी एवढा आहे. मागच्या वर्षी हाच रेव्हेन्यू ८००५ कोटी रुपये इतका होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा: Money Mantra: मोबाईल बँकिंग आणि UPIचे फायदे

कंपन्यांच्या निकालामध्ये ‘एबीटा मार्जिन’ (EBITDA = Earnings before interest and tax + depreciation + amortization) चे आकडे महत्त्वाचे ठरतात. या तिमाही अखेरीस कंपनीचे एबीटा मार्जिन १९% एवढे होते. परदेशी व्यापारातील डॉलरच्या फरकामुळे झालेला फायदा, उत्पादन खर्चामध्ये घट आणि किमतीमध्ये वेळोवेळी केलेले बदल यामुळे कंपनीला नफ्याचे योग्य प्रमाण राखता आले आहे. कंपनी मोटरसायकल, चेतक स्कूटर, रिक्षा आणि तीन चाकी प्रवासी आणि मालवाहू वाहने आणि केटीएम ही अत्याधुनिक वेगवान मोटरसायकल भारतात विकते. भारतामध्येच नव्हे तर जगातील ७० देशांमध्ये बजाज या कंपनीची उत्पादने विकली जातात.

आणखी वाचा: Money Mantra: ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक्स-भविष्यातील प्रगतीचे इंजिन

कंपनीच्या विक्रीतील मोठा वाटा भारतातील ग्रामीण बाजारपेठेतून येतो. या बाजारपेठांमध्ये तेजी निर्माण झाली की दुचाकीच्या विक्रीत वाढ होते. या तिमाही मध्ये विक्रीच्या वाढीमागील हेच प्रमुख कारण राहिले आहे. त्याचबरोबर लांबलेल्या लग्नसराईच्या मोसमामुळे सुद्धा दुचाकीची विक्री वाढलेली दिसते. १२५CC च्या सेगमेंट मध्ये बजाज ऑटोची विक्री दमदार राहिलेली दिसते. व्यावसायिक वापराची वाहने ज्यामध्ये तीन चाकी वाहने, रिक्षा, पिकअप व्हॅन यांचा समावेश होतो. या सेगमेंटची भारतीय बाजारपेठेमध्ये विक्री दुपटीने वाढली तर दुचाकीतील विक्री वाढ ७३ टक्के होती. आजच्या निकालातील थोडीशी असमाधानकारक बाब म्हणजे दुचाकी आणि व्यावसायिक वापराच्या वाहनांचा निर्यातीचा टक्का घटला आहे. मागच्या वर्षी याच तिमाही मध्ये जेवढी निर्यात झाली होती त्यापेक्षा ३४ टक्क्याने ती निर्यात घटली आहे. याचा नफ्यावर निश्चितच परिणाम झालेला दिसतो. मंगळवारचा बाजार बंद होतेवेळी बजाज ऑटोचा शेअर ३३ रुपयांनी कमी होऊन ४८४८ रुपये या किमतीला बंद झाला.

‘टीव्हीएस मोटर्स’ या कंपनीच्या पहिल्या तिमाहीच्या नफ्यात ४६% वाढ झालेली दिसली. मागच्या वर्षी याच कालावधीसाठी कंपनीने ३२१ कोटी रुपये नफा कमावला होता; तो वाढून ४६८ कोटी एवढा नोंदवला गेला. कंपनीचा दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या निर्यातीचा कल वाढता दिसून आला. जून अखेरीस कंपनीने साडेनऊ लाख इतकी होती वाहने निर्यात केली. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही निर्यात पाच टक्क्यांनी वाढली. इलेक्ट्रिक स्कूटर या श्रेणीमध्ये कंपनीने दमदार प्रगती नोंदवलेली दिसून येते. मागील वर्षी जून अखेरीस फक्त ९००० इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीने विकल्या होत्या तो आकडा वाढवून यावर्षी ३९००० इतका झाला.

कंपनीने दिलेल्या माहितीमध्ये ‘एबीटा मार्जिन’ मध्ये दमदार वाढ नोंदवलेली आहे. कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन १०.६ टक्के एवढे राहिले. या तिमाहीमध्ये कंपनीने एकूण ४.६३ लाख दुचाकींची विक्री नोंदवली. मागील वर्षी या कालावधीत हाच आकडा ४.३४ लाख एवढा होता. याच बरोबरीने या तिमाहीमध्ये कंपनीने साडेतीन लाख स्कूटर विकल्या. मागच्या वर्षीपेक्षा ही वाढ ११ टक्क्यांनी अधिक आहे.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajaj auto tvs motors transport vehicles mmdc psp
Show comments