निकच्या एका सहकाऱ्याने १७ जुलै १९९२ ला चुकीचा व्यवहार केला आणि बँकेला थोडे नुकसान झाले. यात सुमारे ४०,००० डॉलरचे नुकसान झाले, जे काही दिवसांनी वाढून १,२०,००० डॉलरपर्यंत वाढले. या ठिकाणी कुठल्याही बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब वरिष्ठांना ही गोष्ट सांगणे अपेक्षित होते, पण निकने तसे न करता हे नुकसान एका आभासी खात्यामध्ये ठेवले. हे खाते शक्यतो संगणकाच्या चुकांसाठी वापरले जायचे. बँकेत हे खाते ८८८८८ अशा क्रमांकाचे होते. पण जेव्हा ‘मार्जिन मनी’ द्यायची वेळ आली, तेव्हा निकने लंडनमधून नवीन गिऱ्हाईक येणार आहे म्हणून अधिक पैसे मागवून घेतले. बँकेच्या मुख्य कार्यालयालाही काही शंका आली नाही आणि त्यांनी हे पैसे ताबडतोब वळते केले. मग काय निकचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आणि चुका करण्यापेक्षा त्याने आता स्वतःच आपले जुगारी वायदे लावायला सुरुवात केली.
डिसेंबर १९९३ पर्यंत ८८८८८ खात्यात तब्बल ३.५ कोटी डॉलर एवढा तोटा झाला होता आणि निकच्या नावासमोर बँकेने ५ कोटी डॉलरचा नफा केला असे दिसत होते. निक खरे तर प्रत्येक वेळेला एवढे वायदा व्यवहार करायचा, ते यशस्वी होण्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच. निक हे अतिजोखमीचे व्यवहार करायचा. कारण त्या खात्यातील तोटा एका झटक्यात नष्ट करणे हे त्याला साध्य करायचे होते. डिसेंबर १९९४ मध्ये न्यूयॉर्क येथे एका समारंभात निकला यशस्वी कर्मचारी म्हणूनदेखील गौरवण्यात आले. मात्र त्या वेळेला ८८८८८ या खात्यात तब्बल ३२.४ कोटी डॉलरचा तोटा दिसत होता.
हेही वाचा >>>निर्ढावलेले आणि हेतुपुरस्सर कर्जबुडवे
१६ जानेवारी १९९५ ला निक याने एक मोठा व्यवहार केला, ज्यात निक्केई २२५ फारसा बदलणार नाही असे गृहीत होते. पण १७ जानेवारीला जपानमध्ये ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा प्रचंड भूकंप आला आणि बाजार गडगडला. बँकेचा तोटा एकाच दिवसात ५ कोटी डॉलरने वाढला. आता निकला कळून चुकले होते की, त्याची लबाडी फार दिवस चालणार नाही. कारण त्याची चौकशी सुरू झाली होती. २३ फेब्रुवारी १९९५ ला निकने बायको आजारी आहे म्हणून अक्षरशः बँकेतून पळ काढला आणि मलेशियात आश्रय घेतला. जेव्हा बँकेला हे कळले, तेव्हा त्याच्या तोट्याची रक्कम तब्बल १४० कोटी डॉलर एवढी मोजण्यात आली. हा हा म्हणता बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचली आणि सोमवारच्या आत म्हणजे २७ फेब्रुवारी १९९५ रोजी बँकेला उरलेले पैसे सिंगापूर एक्सचेंजमध्ये जमा करायचे होते. शनिवार आणि रविवारी खूप साऱ्या वाटाघाटी घडत होत्या. अखेरीस ब्रुनईचे सुलतान बँकेला वाचवण्यास राजी झाले आणि त्यांच्या सल्लागारांना त्यांची सही हवी होती. पण तोपर्यंत ते झोपले आणि मग सुलतानाला कोण उठवणार? सुलतान झोपेतून न उठल्यामुळे अखेरीस बँक बुडाल्याचे रविवारी रात्री जाहीर करण्यात आले. २ मार्च १९९५ ला निकला फ्रँकफर्ट विमानतळावर अटक करण्यात आली. मग त्याला कॅन्सर झाला आणि तरीही सिंगापूरमध्ये शिक्षा भोगून तो परत लंडन येथे सध्या स्थायिक आहे. आज त्याची व्याख्याने ऐकण्यासाठी लोक हजारो डॉलर मोजतात. बिग ब्रदर म्हणजे इंग्लंडमधील बिग बॉसमध्येसुद्धा तो सामील झाला होता. वित्तीय क्षेत्राचे प्रतिनिधित्व अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये करणारा हा बहुतेक एकमेवच असावा. वर्ष २०२५ च्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये त्याने आशिया खंडात विविध देशांत आपली व्याख्याने आयोजित केली आहेत, त्यात अजून भारत नाही. पण तो भारतात आल्यास फारसे आश्चर्य वाटायला नको!
© The Indian Express (P) Ltd