नव्या आर्थिक वर्षापासून म्हणजे दि.१ एप्रिल २०२४ पासून आयआरडीएने (भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण) लाईफ इन्शुरन्स व जनरल इन्शुरन्स मध्ये काही ग्राहकाभिमुख बदल केले आहेत यामुळे पॉलिसी धारकांची सोय होणार आहे. काय आहेत ते बदल हे आता आपण पाहू.
१)आता नव्याने मिळणारी कोणतीही इन्शुरन्स पॉलिसी डिजिटल स्वरुपात आपल्या ई-इन्शुरन्स अकाऊंट (ई-आयए) मध्ये मिळणार आहे.
अशा डिजिटल पॉलिसीज कार्वी, कॅम्स, एनडीएमएल, सेन्ट्रल इन्शुरन्स रिपॉझिटरी या चार रिपॉझिटरीज मार्फत दिल्या जातील. थोडक्यात नव्याने मिळणारी कोणतीही इन्शुरन्स पॉलिसी आता डिजिटल स्वरुपात वरील चार पैकी एका रिपॉझिटरीच्या ई-इन्शुरन्स अकाऊंटमध्ये दिल्या जातील. त्यासाठी नवीन इन्शुरन्स पॉलिसी घेताना वरील चार पैकी कोणत्या इन्शुरन्स रिपॉझिटरीकडे आपल्याला आपले ई-इन्शुरन्स अकाऊंट हवे आहे ते कळवावे लागते. त्यानुसार संबंधित इन्शुरन्स कंपनी आपले ई-इन्शुरन्स अकाऊंट उघडते जर आपले आधीच ई-इन्शुरन्स अकाऊंट असेल तर तसे नवीन पॉलिसी घेताना संबंधित इन्शुरन्स कंपनीस कळवावे लागते म्हणजे नव्याने देण्यात येणारी इन्शुरन्स पॉलिसी आपण दिलेल्या ई-इन्शुरन्स अकाऊंटमध्ये डिजीटल(इलेक्ट्रॉनिक)स्वरुपात दिली जाते.
हेही वाचा : Kotak Small Cap Fund Review : कोटकच्या स्मॉलकॅप फंडाची कामगिरी कशी?
ई-इन्शुरन्स अकाऊंट आपण स्वत: ही उघडू शकता (आपल्याला हव्या असलेल्या वरील चार पैकी कोणत्याही एका इन्शुरन्स रिपॉझिटरीवर) त्यासाठी संबंधित रिपॉझिटरीच्या वेबसाईटवर हा फॉर्म उपलब्ध असतो व त्याबरोबरच केवायसी पूर्ततेसाठी आवश्यक असणाऱ्या डॉक्युमेंटसचा तपशील ही असतो. हे खाते ऑन लाइन ऑफलाइन पद्धतीने उघडता येते.मात्र एका व्यक्तीस एकच ई-इन्शुरन्स अकाऊंट उघडता येते तसेच हे खाते एकाच नावाने उघडता येते , संयुक्त नावाने हे खाते उघडता येत नाही. खाते उघडण्यासाठी काहीही खर्च येत नाही.
आपल्या सध्या असलेल्या सर्व इन्शुरन्स पॉलिसीज( उदा: एकाहून अधिक आयुर्विमा पॉलीसिज, आपल्या वाहन विमा तसेच आरोग्य विमा पॉलिसीज) आपण या ई-इन्शुरन्स अकाऊंटमध्ये डिजिटली रुपांतरीत (कन्व्हर्ट ) करू शकतो तसा पर्याय सबंधित रिपॉझिटरीच्या वेबसाईटवर उपलब्ध असतो.
ई-इन्शुरन्स अकाऊंटचे खालील महत्वाचे फायदे आहेत
-आपल्या सर्व इन्शुरन्स पॉलिसीज एकाच खात्यात डिजिटल स्वरुपात असल्याने हरवणे /फाटणे/ खराब होणे ही शक्यता राहत नाही.
-आपल्या सर्व पॉलिसीजची माहिती एकाच ठिकाणी सहजगत्या उपलब्ध असते.
-नॉमिनी/पत्ता/फोन-मोबाइल नंबर मधील बदल एकाच ठिकाणी म्हणजे ई-इन्शुरन्स अकाऊंटमध्ये केला जातो. सर्व पॉलिसीजमध्ये तो एकाचवेळी आपोआप होत असतो.
-प्रत्येक नवीन पॉलिसीसाठी नव्याने केवायसी पूर्तता करावी लागत नाही.
-डिजिटल इन्शुरन्स पॉलिसीचा क्लेम सुद्धा ऑनलाइन करता येईल यामुळे क्लेम सेटलमेंट सुलभ होईल व वेळेचा अपव्यय होणार नाही.
विशेष म्हणजे जरी नव्याने देण्यात येणारी कोणतीही इन्शुरन्स पॉलिसी आता डिजिटल स्वरुपात देणे बंधनकारक असले तरी पॉलिसी धारकाने विनंती केल्यास आधीच्या प्रमाणे फिजिकल पेपर पॉलिसी सुद्धा दिली जाते. मात्र दोन्ही पॉलिसी एकच असतात.
हेही वाचा : ‘मालमत्तेच्या वृद्धीपेक्षा सुरक्षेची काळजी घेणे महत्त्वाचे’
या आधीचा १५ दिवसांचा फ्री लुक अप पिरीयड आता वाढवून ३० दिवस केला हे यामुळे पॉलिसी मिळाल्या तारखेपासून ३० दिवसांपर्यंत आपणास आपली नको असलेली पॉलिसी रद्द करता येणार आहे.
लाईफ इन्शुरन्सच्या सरेंडर व्हाल्यू असणाऱ्या पॉलिसीची सरेंडर व्हॅल्यू आता खालीलप्रमाणे असेल व ती कशी काढली गेली हे समजणे सोपे झाले आहे . पॉलिसी घेतल्यापासून दुसऱ्या वर्षात सरेंडर केल्यास भरलेल्या एकूण प्रीमियमच्या ३०% इतकी सरेंडर व्हॅल्यू असेल. पॉलिसी घेतल्यापासून तिसऱ्या वर्षात सरेंडर केल्यास भरलेल्या एकूण प्रीमियमच्या ३५% इतकी सरेंडर व्हॅल्यू असेल. पॉलिसी घेतल्यापासून चौथ्या ते सातव्या वर्षादरम्यान सरेंडर केल्यास भरलेल्या एकूण प्रीमियमच्या ५०% इतकी सरेंडर व्हॅल्यू असेल.
जर पॉलिसी कालावधीच्या शेवटच्या २ वर्षात सरेंडर केली तर भरलेल्या एकूण प्रीमियमच्या ९०% इतकी सरेंडर व्हॅल्यू असेल. मात्र यात जर पॉलिसी सात वर्षानंतर परंतु शेवटच्या दोन वर्ष्याच्या आधी सरेंडर केल्यास सरेंडर व्हॅल्यू भरलेल्या एकूण प्रीमियमच्या किती % असेल याचा यात अद्याप उल्लेख नाही.
हेही वाचा : बँकांच्या डिजिटल व्यवहारातील फसवणूक आणि नुकसानभरपाई
थोडक्यात आता अर्जदाराने अर्ज जरी ऑनलाइन अथवा ऑफलाइन केला असला तरी देण्यात येणारी इन्शुरन्स पॉलिसी डिजिटल स्वरूपात दिली जाईल म्हणजे संबंधित पॉलिसी धारकाच्या ई-इन्शुरन्स अकाऊंट (ई-आयए) मध्ये मिळणार आहे. एक एप्रिलपासून लागू झालेल्या बदलांमुळे पॉलिसी धारकांची सुविधा निश्चितच वाढली आहे एवढं मात्र नक्की.