समीर नेसरीकर 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्थसाक्षरतेसाठी ‘लोकसत्ता – अर्थवृत्तान्त’च्या अविरत प्रयत्नांचे फलितच म्हणा की, गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांचा ‘जोखीम’ या शब्दाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे, तो अधिक सकारात्मक बनला आहे. याचे प्रत्यंतर गुंतवणूकदारांच्या भेटींमधून मिळत राहते. पूर्वी ‘शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक नको’ असे म्हणणारी माणसे ‘इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, कमी जोखीम असलेले ऑप्शन्स आहेत का म्युच्युअल फंडात?’ इथवर आले आहेत. अर्थात हा वयोगट साधारण ४५ ते ७० असा विखुरलेला आहे. त्याहून लहान असणाऱ्या पुढील पिढीने केव्हाच ‘इक्विटी ॲसेट क्लास’ला अंगीकारले आहे.

ज्यांना ‘इक्विटी ॲसेट क्लास’च्या मार्गाने आपली संपत्ती वाढवायची आहे (परंतु तुलनात्मक कमी अस्थिरता असणारा मार्ग पत्करून) किंवा जे गुंतवणूक क्षेत्रात ‘नवीन’ आहेत, त्यांच्यासाठी काही ‘हायब्रीड’ श्रेणीतील म्युच्युअल फंडांची ओळख करून घेऊ.

इक्विटी सेव्हिंग्स फंड : समभाग/ समभागसंलग्न गुंतवणूक कमीत कमी ६५ टक्के आणि रोख्यांमध्ये (डेट) कमीत कमी १० टक्के गुंतवणूक.

कॉन्झर्व्हेटिव्ह हायब्रीड फंड : समभाग/ समभागसंलग्न गुंतवणूक १० ते २५ टक्क्यांदरम्यान आणि रोख्यांमध्ये (डेट) ७५ ते ९० टक्क्यांदरम्यान गुंतवणूक.

ॲग्रेसिव्ह हायब्रीड फंड : समभाग/ समभागसंलग्न गुंतवणूक ६५ ते ८० टक्क्यांदरम्यान आणि रोख्यांमध्ये (डेट) २० ते ३५ टक्क्यांदरम्यान गुंतवणूक.

या तिन्ही फंड श्रेणींमध्ये एका मर्यादेत समभाग गुंतवणूक होत असल्याने (१०० टक्क्यांपेक्षा कमी) ज्यांना भांडवल बाजाराची फळे चाखायची आहेत; परंतु ‘तुलनात्मक जोखीम’ कमी हवी, अशा गुंतवणूकदारांनी वरीलपैकी एक/अधिक श्रेणींचा विचार करावा. प्रत्येक फंड घराण्याच्या दर महिन्याला निधी व्यवस्थापनासंबंधी प्रसिद्ध होणाऱ्या ‘फॅक्ट शीट’मधील ‘यील्ड टू मॅच्युरिटी’ तपासावे, तसेच रोखे गुंतवणुकीचे ‘क्रेडिट प्रोफाइल’ (केंद्र सरकार रोखे, ट्रिपल ए, राज्य सरकार रोखे इत्यादी रोखे गुंतवणुकीचे प्रमाण) अभ्यासावे. ‘पोर्टफोलिओ मॉडिफाइड ड्युरेशन’ किती आहे हे जाणून घ्यावे. इक्विटी सेव्हिंग्स श्रेणीमध्ये ‘आर्बिट्राज’चाही वापर केला जातो. म्युच्युअल फंडात वापरल्या जाणाऱ्या काही शब्दांचा नेमका अर्थ एका स्वतंत्र लेखात मी पुढील काळात मांडेन, त्याची गरज आहे, विशेषतः रोखे बाजारात व्यवहार करताना काही संज्ञा सोप्या भाषेत आणि विस्ताराने आपल्या समजून घेता येऊ शकतील.

इक्विटी सेव्हिंग्स फंड आणि ॲग्रेसिव्ह हायब्रीड फंडांवर ‘इक्विटी’ करप्रणालीप्रमाणे कर द्यावा लागतो, तर कॉन्झर्व्हेटिव्ह हायब्रीड फंड ‘डेट’ करप्रणालीप्रमाणे कर-निर्धारित होतो. या तिन्ही श्रेणींतील काही फंडांची ३१ जानेवारी २०२३ रोजी असणारी कामगिरी सोबतच्या कोष्टकांमध्ये दिली आहे. आपण स्वतः अभ्यास करून अथवा आपल्या गुंतवणूक सल्लागाराकडून अधिक माहिती घेऊन गुंतवणूक करावी.

(लेखक मुंबईस्थित गुंतवणूकविषयक अभ्यासक)

sameernesarikar@gmail.com